The sister who came to Maheri for Padva was murdered by her brother | धक्कादायक ! पाडव्यानिमित्त माहेरी आलेल्या बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने केला खून

धक्कादायक ! पाडव्यानिमित्त माहेरी आलेल्या बहिणीचा भावाने मित्राच्या मदतीने केला खून

केज : पाडव्यानिमित्त आईला भेटायला माहेरी आलेल्या बहिणीचा भावानेच मित्राच्या मदतीने खून केल्याची घटना तालुक्यातील बोरगाव येथे मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली. शितल लक्ष्मण चौधरी (२८)  असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी केज पोलिस स्थानकात भावासह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‌याबाबत अधिक माहिती अशी की, शितल लक्ष्मण चौधरी ही पुणे येथे आपल्या मुलीसह राहते. पाडव्यानिमित्त शीतल आईला भेटण्यासाठी केज तालुक्यातील बोरगाव येथे काही दिवसांपूर्वी मुलीसह आली होती. मंगळवारी मध्यरात्री तिचा भाऊ दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर यांनी शीतलच्या डोक्यात वार करून तिचा खून केला. याप्रकरणी मृताचा चुलत भाऊ नानासाहेब जालींदर गव्हाणे  याने दिलेल्या फिर्यादीवरून केज पोलिस ठाण्यात दिनकर उर्फ दिनु गोरख गव्हाणे व त्याचा मित्र दिगंबर धनंजय वळेकर यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

घटनेची माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. ‌दरम्यान, भावाने टोकाची भूमिका घेत बहिणीचा खून का केला ? याचा उलगडा झाला नसून पोलिसांचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिस निरीक्षक त्रिभुवन यांनी दिली.

Web Title: The sister who came to Maheri for Padva was murdered by her brother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.