ना प्रवासाचा इतिहास ना बाहेरील संपर्क; मग परळीच्या महिलेला कोरोनाचा संसर्ग कोठून झाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 04:03 PM2020-06-06T16:03:28+5:302020-06-06T16:03:54+5:30

आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेसमोर तपासाचे आव्हान

Neither travel history nor outside contact; So where did the woman from Parli get the corona infection? | ना प्रवासाचा इतिहास ना बाहेरील संपर्क; मग परळीच्या महिलेला कोरोनाचा संसर्ग कोठून झाला ?

ना प्रवासाचा इतिहास ना बाहेरील संपर्क; मग परळीच्या महिलेला कोरोनाचा संसर्ग कोठून झाला ?

Next
ठळक मुद्देबीड जिल्ह्यात सध्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६७ झाली आहे.

- संजय खाकरे

परळी : परळी येथील महिला औरंगाबादमध्ये उपचारासाठी गेल्यावर कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. परंतु महिलेस कसलाही प्रवास इतिहास नाही किंवा घरातच राहिल्याने नातेवाईकांशिवाय इतरांच्या संपर्कातही नाही. मग या महिलेला कोरोनाची लागण कशी व कोठून झाली ? असा प्रश्न आहे. याचा शोध घेण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. शनिवारी दिवसभर या महिलेलच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. सध्या या महिलेवर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहेत.

बीड जिल्ह्यात सध्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६७ झाली आहे. यातील ५३ कोरोनामुक्त झालेले असून एकाचा मृत्यू झालेला आहे. बीड जिल्ह्यात १२ तर औरंगाबादमध्ये एक महिला उपचार घेत आहे. आतापर्यंतचे पिंपळा, धारूर व परळीची महिला वगळता सर्वच रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. शुक्रवारी बीड जिल्ह्यात एक तर परळीची महिला औरंगाबादमध्ये पॉझिटिव्ह आढळली होती. या महिलेला किडनीचा आजार आहे. ती नातेवाईकांसह ३ जून रोजी लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात गेली होती. परंतु तेथील डॉक्टरांनी औरंगाबादला जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे ते घरी आले. ४ जून रोजी सकाळी उठून ते औरंगाबादला गेले. तेथे तिचा स्वॅब घेतला आणि शुक्रवारी सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली.

दरम्यान, ही महिला आजारी आणि त्यातच लॉकडाऊन असल्याने मागील महिनाभरापासून घरातून बाहेर पडलेली नाही. तसेच मुलगा व मुलगी यांच्याशिवाय इतरांच्या संपर्कातही आलेली नाही. त्यामुळे तिला कोरोनाचा संसर्ग कोठून झाला, असा प्रश्न आहे. याचा शोध घेणे आरोग्य विभागाकडून सुरू आहे. तिच्या नातेवाईकांसह संपर्कातील इतर लोकांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. याचा तपास लावण्याचे आव्हान आता आरोग्य विभागासमोर आहे.

कंटेनमेंट झोन अन् सर्वेक्षण सुरू
परळी शहरातील भिमनगर हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. ९ पथकांमार्फत तेथील सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे कामही सुरू असल्याचे परळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे यांनी सांगितले.

असा होऊ शकतो संसर्ग
कोरोनाबाधित महिलेचा मुलगा व मुलगी यांची गॅस एजन्सी आहे. तेथे बाहेरून लोक येतात. ते लोक या दोघांच्या आणि हे दोघे या महिलेलच्या संपर्कात आल्याने संसर्ग होऊ शकतो. किंवा लातूर व औरंगाबादमध्ये गेल्यावर संसर्ग झाल्याचा संशय आहे. आता मुलगा व मुलीचाही स्वॅब घेण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरच याला दुजोरा मिळेल, अन्यथा आणखी गुंतागुंत होऊन बसणार आहे. ती सोडवून कोरोना संसर्ग कसा झाला? याचा शोध घेण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे. 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू
परळीच्या बाधित रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरूच आहे. हाय रिस्क व लो रिस्क असे विभाजन केले असून त्यांचे स्वॅब घेतले जातील. तिला संसर्ग कसा झाला? हे आताच सांगणे कठीण आहे. शोध घेण्याचे काम सुरूच आहे. तसेच परिसरात कंटेनमेंट झोन करून सर्वेक्षण करण्यात येत आहे.
- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

Web Title: Neither travel history nor outside contact; So where did the woman from Parli get the corona infection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.