माजी नगराध्यक्ष पतीचा खून आर्थिक व्यवहारातून; तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 05:02 PM2019-08-14T17:02:22+5:302019-08-14T17:05:58+5:30

तीन आरोपींत एका माजी नगराध्यक्ष पतीचाही समावेश

Murder of ex-city president's husband through financial transactions; All three arrested | माजी नगराध्यक्ष पतीचा खून आर्थिक व्यवहारातून; तिघांना अटक

माजी नगराध्यक्ष पतीचा खून आर्थिक व्यवहारातून; तिघांना अटक

Next
ठळक मुद्देआरोपींना १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी 

धारूर (जि. बीड) :  येथील माजी नगराध्यक्षांचे पती तथा नगर परिषदेचे कर्मचारी नामदेव शिनगारे यांच्या खून प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून  आर्थिक वादातून घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस यंत्रणा पुढील तपास करीत आहे. विशेष म्हणजे अटकेतील आरोपी सुखदेव ऊर्फ  बबन फुन्ने हा दुसऱ्या एका माजी नगराध्यक्षांचा पती आहे.

शहरात माजी नगराध्यक्ष सविता शिनगारे यांचे पती  नामदेव शिनगारे यांचा सोमवारी दगडाने ठेचून खून करण्यात आला. याप्रकरणी रात्री उशीरा धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आपल्या तपासाचे चक्र गतिमान करत यामधील आरोपी सुखदेव ऊर्फ  बबन फुन्ने, गणेश शिवाजी घोडके, सुभाष तुकाराम शिंदे यांना अटक केली. तसेच इतर तीन अज्ञात आरोपींचा शोध सुरु आहे. 

आरोपी सुखदेव उर्फ बबन फुन्ने याच्या मुलीच्या लग्नासाठी नामदेव शिनगारे यांनी पैसे दिले होते. ते पैसे परत करण्यावरुन झालेल्या वादात डोक्यात दगड घालून नामदेव शिनगारे यांचा खून करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून शिवाजी घोडके व सुभाष शिंदे यांना अटक केली. तिसरा आरोपी फुन्ने याला मंगळवारी ताब्यात घेतले.

धारूर दुपारपर्यंत बंद 
या प्रकरणातील मुख्य आरोपी सुखदेव ऊर्फ बबन फुन्ने यास अटक करा? अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा नातेवाईकांनी दिला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धारूर शहर कडकडीत बंद होते. रमेश आडसकर यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर दुपारी शवविच्छेदन करण्यात आले तसेच महाविद्यालयासमोरील स्मशानभूमीत शिनगारे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, दरम्यान पोलिसांनी देखील मुख्य आरोपीस ताब्यात घेतले होते. शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

१६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी 
खून प्रकरणातील आरोपी गणेश घोडके व सुभाष शिंदे यांना मंगळवारी पहाटे अटक केल्यानंतर त्यांना धारूर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना १६ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

Web Title: Murder of ex-city president's husband through financial transactions; All three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.