प्रेमात केली ‘टॅटू’ची हौस; ब्रेकअप होताच 'आठवणी' मिटविण्यासाठी डॉक्टरकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 02:07 PM2021-10-19T14:07:47+5:302021-10-19T14:12:08+5:30

साधा टॅटू काढायचा असेल तर एका इंचसाठी ५०० रुपये खर्च आहे, तर थ्रीडी टॅटूला एका इंचसाठी १ हजार रुपये खर्च आहे.

The lust for ‘tattoos’ made in love; As soon as the breakup occurs, run to the doctor to erase the 'memories' | प्रेमात केली ‘टॅटू’ची हौस; ब्रेकअप होताच 'आठवणी' मिटविण्यासाठी डॉक्टरकडे धाव

प्रेमात केली ‘टॅटू’ची हौस; ब्रेकअप होताच 'आठवणी' मिटविण्यासाठी डॉक्टरकडे धाव

Next
ठळक मुद्दे‘टॅटू’चाही वैताग येऊन आठवणी मिटविण्यावर भर  जिल्हा रुग्णालयात महिन्याला ४ ते ५ मुला-मुलींची धाव

बीड : तारुण्यात प्रेमात अडकलेले मुले-मुली आठवणी म्हणून एकमेकांचे नावे हातावर टॅटूच्या स्वरूपात काढतात. कोणी चित्रेही काढतात. परंतु प्रेमभंग झाल्यावर याच आठवणी त्यांना त्रासदायक ठरू लागतात. कधी काळी हौस म्हणून काढलेले टॅटू आता या तरुणाईला नको वाटू लागला आहे. त्यामुळे महिन्याकाठी जिल्हा रुग्णालयात ४ ते ४ मुले-मुले टॅटू नको म्हणून काढण्यासाठी येतात. त्रास होत असल्याने आठवणी मिटविल्या जात असल्याचे दिसत आहे.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं ‘सेम’ असतं ! मंगेश पाडगावकरांच्या या ओळी आहेत. परंतु मागील काही दिवसांतील घटनांवरून सर्वांचेच सारखे प्रेम आहे, असे मुळीच नाही. कॉलेजात असताना अथवा इतर ठिकाणी झालेले प्रत्येकाचे प्रेम यशस्वी होते, असे नाही. काही दिवस सोबत राहिल्यानंतर मनाविरोधात विवाह होतात. नंतर बंधने येतात. मग जुन्या आठवणी त्रास देऊ लागतात. तर काहींना धोका मिळतो. प्रेम असताना ठेवलेल्या आठवणी त्रास देऊ लागतात. त्या मिटविण्यासाठी आता प्रेमभंग झालेली तरुणाई पुढे येऊ लागली आहे. यात काही ३० पेक्षा जास्त वयाच्या लोकांचाही समावेश असल्याचे समजते. जिल्हा रुग्णालयात टॅटूच्या संदर्भात येणाऱ्यांची संख्या महिन्याकाठी चार ते पाच असल्याचे सांगण्यात आले. परंतु काही लोक खाजगी रुग्णालयातच जास्त धाव घेत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हा आकडा आणखी वाढण्याची नाकारता येत नाही.

एका इंचसाठी ५०० ते १ हजार खर्च
टॅटू काढण्याची क्रेझ वाढली आहे. जास्त प्रमाणात महाविद्यालयीन मुला-मुलींचा समावेश आहे. साधा टॅटू काढायचा असेल तर एका इंचसाठी ५०० रुपये खर्च आहे, तर थ्रीडी टॅटूला एका इंचसाठी १ हजार रुपये खर्च आहे. नाव, स्टार, पाकोळी, मोराचे पिस असे चित्र टॅटू स्वरूपात जास्त काढले जात असल्याचे आर्टिस्ट सचिन पवार यांनी सांगितले.

टॅटू मिटविण्यासाठी चार ते पाच वेळा उपचार
शरीरावर काढलेला टॅटू छोटा असेल तर आठवडा ते तीन आठवड्याच्या अंतराने तीन ते चार वेळा उपचार घेऊन मिटवावा लागतो. आणि मोठा व जास्त खोल असेल तर त्याला अनेकदा उपचार करूनही तो पूर्णपणे निघत नाही. उपचारादरम्यान मोठा त्रास होतो. तसेच हे उपचार खर्चिक असतात.

लेझर ट्रिटमेंट करून काढता येतो
टॅटूच्या अनुषंगाने महिन्याकाठी ४ ते ५ रुग्ण येतात. आपल्याकडे ही सुविधा नाही. परंतु लेझर ट्रिटमेंट करून हा काढता येतो. यंत्राद्वारे किरणे सोडून तो मिटविला जातो. छोटा असेल तर तीन ते चार वेळा उपचार आणि मोठा असेल तर जास्त वेळा उपचार करावे लागतात.
- डॉ. आय. व्ही. शिंदे, त्वचारोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय बीड

Web Title: The lust for ‘tattoos’ made in love; As soon as the breakup occurs, run to the doctor to erase the 'memories'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड