अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपेक्षा जादा क्षेत्राचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 06:25 PM2020-10-30T18:25:23+5:302020-10-30T18:27:24+5:30

सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, बाजरी, मका यासह खरीप पिकांचे नुकसान झाले

Loss of more than two and a half lakh hectares in Beed district due to heavy rains | अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपेक्षा जादा क्षेत्राचे नुकसान 

अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरपेक्षा जादा क्षेत्राचे नुकसान 

googlenewsNext
ठळक मुद्देशेतकरी व इतर संघटनेकडून नुकसान भरपाईची मागणीशासन निर्देशानंतर पंचनामे

बीड : खरीप हंगामाची पिके काढणीला आलेली असताना ऑक्टोबर व त्यापूर्वी झालेली अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकरी व इतर संघटनांनी पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केल्यानंतर शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यातील पंचनामे करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून, अतिवृष्टीमुळे २ लाख ५५ हजार ८०५ पेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सोयाबीन, तूर, मूग, उडीद, कापूस, बाजरी, मका यासह खरीप पिकांचे नुकसान झाले होते. सोयाबीन काढणीला आलेले असताना  अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. तसेच सलग सुरू असलेल्या पावसामुळे शेतात पाणी साचले. त्यामुळे कपाशीसह इतर पिकांचे नुकसान  झाले होते. 
शासनाने आदेश दिल्यानंतर कृषी विभागाने पंचनामे केले. यामध्ये ११ तालुक्यांपैकी सर्वाधिक नुकसान हे गेवराई, बीड, शिरूर कासार, माजलगाव, धारूर, वडवणी तालुक्यांत झाल्याचे दिसून येत आहे. तर, पाटोदा, अंबाजोगाई  या तालुक्यांत कमी व परळी, आष्टी, केज तालुक्यांत नुकसान झालेले नसल्याचे पंचनाम्यात दिसून येत आहे. अंतिम अहवालामध्ये काही आकडे वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर शासनाने जाहीर केल्याप्रमाणे १० हजार प्रतिहेक्टर प्रमाणे अनुदानाची मागणी केल्यानंतर अनुदानाची रक्कम देखील वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अनुदानाची वाट ते पाहत आहेत.

९८.५० हेक्टरवर बागायती पिकांचे नुकसान 
बीड जिल्ह्यात बागायती क्षेत्रापेक्षा जिरायती क्षेत्र जास्त आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले बागायती क्षेत्र हे फक्त ९८.५० हेक्टर असल्याचे पंचनामा अहवालात दिसून येत आहे. त्या नुकसानभरपाईसाठी १८ हजार प्रतिहेक्टर प्रमाणे १७ लाख ७३ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मात्र, घोषणेप्रमाणे २५ हजार प्रतिहेक्टर देण्यात येणार असल्यामुळे रक्कम वाढणार आहे. 

पंचनामे पूर्ण झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप काही शेतकऱ्यांच्या शेतात अधिकारी, कर्मचारी गेलेलेच नाहीत. नुकसान झालेला एकही शेतकरी अनुदानापासून वंचित राहणार नाही याची खबरदरी प्रशासनाने घ्यावी व दिवाळीपूर्वी अनुदा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी
- कुलदीप करपे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बीड 

पंचनामे जवळपास पूर्ण झाले आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी व महसूल विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पंचनामे केले आहेत. अंतिम अहवाल शासनाला पाठवला जाणार आसून, घोषणेप्रमाणे वाढीव अनुदान रकमेची मागणी केली जाणार आहे. अनुदान येताच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. यासाठी कृषी विभाग वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करीत आहे.
- राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड 

तालुका   बाधित क्षेत्र   शेतकरी   
बीड        ३७६३८     १३५३९३
गेवराई     ९१९०४      १०९६५४
शिरूर का २२९३३      ५४५०५
आष्टी     ०००        ०००
पाटोदा     २३९.६५     ९१९
माजलगाव ५६३१३.६५  ७२१०३
धारूर      २०९५१      ३१५५१
वडवणी     २४९७०      ३१५५१
केज         ००          ००
अंबाजोगाई  ८५६.६०    २१८०
परळी वै.     ००         ००
एकूण- २५५८०५.७५   ४३२७०३

Web Title: Loss of more than two and a half lakh hectares in Beed district due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.