सोयाबीन न उगवल्यामुळे मरणेच सोपे वाटले ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 08:41 PM2020-07-02T20:41:11+5:302020-07-02T20:42:09+5:30

सोयाबीन बियाणे उगवले नाही म्हणून २८ जून रोजी सकाळी येथील कृषी दुकानदारासमोर लालासाहेब दादाराव तांदळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी त्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तांदळे यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

It was easy to die without growing soybeans! | सोयाबीन न उगवल्यामुळे मरणेच सोपे वाटले ! 

सोयाबीन न उगवल्यामुळे मरणेच सोपे वाटले ! 

Next
ठळक मुद्देयंदा निसर्गाने साथ दिली, तर माणसाने दिला धोका बायकोच्या अंगावरील गंठण विकून केली होती पेरणी

- अमोल जाधव 

नांदुरघाट (जि.बीड) : यंदा निसर्गाने साथ दिली. मात्र, माणसानेच धोका दिला. बायकोचे गंठण विकून सोयाबीन पेरले होते. चांगला पाऊस होऊनही ते उगवले नाही. त्यामुळे जगण्यापेक्षा मरणे सोपे वाटले म्हणून स्वत:ला पेटविण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दांत फक्राबाद येथील शेतकरी लालासाहेब तांदळे यांनी आपली व्यथा मांडली.

सोयाबीन बियाणे उगवले नाही म्हणून २८ जून रोजी सकाळी येथील कृषी दुकानदारासमोर लालासाहेब दादाराव तांदळे यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बुधवारी त्यांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तांदळे यांच्या व्यथा जाणून घेतल्या. लालासाहेब दादाराव तांदळे (७०) हे  फक्राबाद (ता. वाशी, जि.उस्मानाबाद) येथील रहिवासी. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेले हे गाव. गावची बाजारपेठ नांदुरघाट. बहुतांश व्यवहार बीड जिल्ह्यातच होतात. लालासाहेब यांना २ एकर २७ गुंठे जमीन. एवढ्याच जमिनीवर ७ माणसे उदरनिर्वाह करतात. त्यांच्यासह पत्नी, एकुलता एक मुलगा वचिष्ट, त्याची पत्नी, २ नाती, १ नात असे सात माणसांचे कुटुंब. मुलगा शेतीच राबतो, तर सून मजूरीने जाते. पैसा नसल्याने बायकोच्या गळ्यातील गंठण आणि कानातले झुंबर विकून संपूर्ण जमिनीत सोयाबीन पेरले होते. सात दिवसांनी पाहिले तर बियाणे उगवलेच नाही. फक्त २० टक्के बियाणे उगवले. आता दुबार पेरणीसाठी कुठून पैसे आणायचे? कोणी उसनवारी देईना. घरात मोडायला दागिना नाही. शासन, कंपनी, दुकानदार दुबार पेरण्यासाठी बियाणे देईना. यामुळे मनाने खचलेल्या व नैराश्य आलेल्या लालासाहेब यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबायचा ठरवला. 
शेतात आत्महत्या करून उपयोग काय, म्हणून दहा लिटर डिझेल घेऊन दुकानासमोरच जीव देण्याचा निर्णय घेतला. यात दुकानदाराचा दोष नाही, परंतु कंपनीला कोठे शेधायचे? २८ जून रोजी दुकानासमोर अंगावर डिझेल टाकून घेतले आणि काडी पेटवणार तोच काही लोकांनी पळत येऊन काडीपेटी काढून घेतली आणि अंगावर पाणी टाकले... जीवंत राहिल्याचा आनंद मानायचा की मेलो नाही याचे दु:ख, हा लालासाहेब यांचा प्रश्न. एवढे झाल्यावरही मनातील काहूर कमी होईना. माझ्यापुढे दोनच पर्याय होते, एक तर बियाणे मिळविणे किंवा मृत्यूला कवटाळणे. बियाणाचे आश्वासन एकाने दिल्याने जगण्यासाठी पुन्हा बळ एकटवले...
मग शेतकऱ्याने काय करायचे?
लालासाहेब सांगत होते, ‘घरामध्ये आम्ही दोघेही नवरा-बायको आजारी. गाठ आली म्हणून बार्शी येथील दवाखान्यात १४ महिने अ‍ॅडमिट होतो.  चार महिन्यांपूर्वी बायकोचा हात मोडला. तिला काहीच करता येत नाही. ती दम्याने बेजार असते. 
दोघेही उतारवयात पूर्ण खचून गेलो आहोत. घरात खाणारी सात तोंडे एकटा पोरगा काय करणार?  माझ्यासारख्या बहुतांश शेतकऱ्यांची अवस्था हीच आहे. मागे कर्जमाफी मिळाली. त्यामुळे मनावरील ताण कमी झाला होता. आता नवी उमेद आली होती. कष्ट करून जगत होतो. पण, सोयाबीन न उगवल्याने पुन्हा मोठा खड्डा पडला. अशावेळी शेतकऱ्याची मन:स्थिती ढासळते व तो मृत्यूला जवळ करतो. तुम्हीच सांगा, त्याच्याजवळ दुसरा कुठला मार्ग असतो, हा लालासाहेब यांचा प्रश्न.
 

Web Title: It was easy to die without growing soybeans!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.