Hundreds of farmers crop insurance amount deposited in others accounts | शेकडो शेतकर्‍यांच्या पिकविम्याची रक्कम दुसर्‍यांच्या खात्यावर
शेकडो शेतकर्‍यांच्या पिकविम्याची रक्कम दुसर्‍यांच्या खात्यावर

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव ( बीड ) : प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी गतवर्षी पीक विमा भरला. त्यात प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेत भरण्यात आला. परंतू या बॅकेच्या गलथान कारभारामुळे अनेक शेतकर्‍यांची विम्याची रक्कम चक्क दुसर्‍याच्या खात्यावर जमा झाली आहे. परिणामी अनेक शेतकरी विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहीले असून बॅक प्रशासन मात्र स्वतःची चूक झाकत विमा कंपनीकडे बोट दाखवत आहे. 

जिल्हा बॅक अन् शेतकरी हे एक जिव्हाळ्याचे नाते आहे. त्यामुळे जिल्हा बॅकेत व्यवहार करण्यास शेतकरी प्राधान्य देतात. परंतू जिल्हा बॅकेकडून गलथान कारभार करून शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचे काम होत आहेत. असाच प्रकार जिल्हा बॅकेच्या माजलगाव मुख्य शाखेत  उघड झाला आहे. मागील हंगाम 2018 मध्ये शेतकर्‍यांची पीक विमा भरतांना जिल्हा बॅकेचे पासबुक, आधार कार्ड, 7/12 व 8 अ ही कागदपत्रे ऑनलाईन केले होते. त्यानूसार आता आपल्याला वीमा मंजुर झाला असल्याने आपल्या खात्यात विम्याची रक्कम आली. या आशेवर शेतकरी बॅकेत चकरा मारू लागले. परंतू बॅक अधिकार्‍यांकडून तुमच्या खात्यात पैसेच आले नाहीत असे उत्तरे देण्यात आली. यावर शेतकर्‍यांनी आम्ही पीक विमा अचूक भरलेला आहे. मग आमच्या खात्यात वीम्याची रक्कम कशी आली नाही, अशी विचारणा बॅक अधिकार्‍यांना केली. अधिकार्‍यांनी टोलवा-टोलवी करून उद्या या, परवा या असे सांगत वेळकाढूपणा केला. 

यावर शेतकर्‍यांनी सातत्याने बॅकेकडे चकरा मारून थकले व शेवटी शेतक-यांनी  नेमके आमचेच पैसे का आले नाही ? ते तरी सांगा यावर बॅक अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांचे पासबुक तपासले असता त्यात खाते क्रमांक चुकीचे आढळून आले. यावर त्यानी खाडाखोड करून अचूक खाते नंबर टाकले. यावर ही अधिकारी-कर्मचारी न थांबता तुमच्या विमा न येण्यास विमा कंपनी जबाबदार असल्याचे सांगितले. परंतू, वास्तविक जिल्हा बॅकेच्या गलथान पणामुळे खाते नंबरच चुकीचे असल्याने ती रक्कम दुसर्‍यांच्या खात्यावर गेली. या बॅकेच्या अक्षम्य चुकीमुळे मात्र शेतकरी वेठीस धरला जात असून हक्काच्या विम्याच्या रक्कमेपासून वंचित राहत आहे. हा प्रकार शनिवारी दि.20 रोजी दिंद्रुड मंडळातील कोथरूळ व उमरी येथील शेतकर्‍यांमुळे उघडकीस आला आहे. 

जिल्हा बॅकेच्या माजलगाव शाखेत मी वीम्याची रक्कम घेण्यासाठी पासबुक घेवून गेलो. यावेळी माझ्या पासबुक खातेक्रमांक संगणकात टाकून पाहिले. तुमच्या खात्यात 51 हजार रूपये जमा असल्याचे सांगितले. यावर मी पैसे काढण्यासाठी स्लिम भरून दिली, मात्र अचानक बॅक अधिकार्‍यांनी हे तुमचे खाते नाही. दुसर्‍यांचे असल्याचे सांगितले.  
- भास्कर नाईकनवरे, शेतकरी उमरी

शेतकर्‍यांच्या बॅक खात्याबाबत ज्या चुका झाल्या आहेत. त्या बाबत माहिती घेवून शेतकर्‍यांना त्यांचे पैसे मिळवून देवू. 
- डी.के.शिंदे, व्यवस्थापक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक


Web Title: Hundreds of farmers crop insurance amount deposited in others accounts
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.