मुसळधार पावसाने हाहाकार; अंबाजोगाईसह अनेक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 09:31 AM2021-09-28T09:31:07+5:302021-09-28T09:33:33+5:30

Rain in Beed मांजरा धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडले

Haunted by torrential rains; Many villages including Ambajogai lost contact | मुसळधार पावसाने हाहाकार; अंबाजोगाईसह अनेक गावांचा संपर्क तुटला

मुसळधार पावसाने हाहाकार; अंबाजोगाईसह अनेक गावांचा संपर्क तुटला

Next

अंबाजोगाई- : २३ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सोमवारपासून तर अधिकच धुमाकूळ घातला. अतिवृष्टीमुळे केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील ओढे, नद्या क्षमतेबाहेर वाहत असून अनेक गावात पाणी शिरले आहे. बहुतांशी गावांचा संपर्क तुटला असून अनेक ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची तर गिणतीच राहिली नाही.

अखंडित पावसामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक प्रचंड वाढल्याने मंगळवारी पहाटे धरणाचे सर्वच्या सर्व १८ दरवाजे उघडण्यात आले असून त्यातून नदीपात्रात पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या  गावांनाही पुराचा धोका निर्माण झाला असून नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मांजरा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्याची गेल्या अनेक दशकातील ही पहिलीच वेळ आहे. 

बीड जिल्ह्यात २३ सप्टेंबर पासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवार (दि.२७) पासून तर पावसाने बीड जिल्ह्यात उच्चांकी धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे विशेषतः केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यातील शेकडो गावांची वाताहत झाली आहे. नदी, ओढे ओसंडून वाहत असून विविध पूल पाण्याखाली गेल्याने किंवा वाहून गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून ग्रामस्थांनी कालची रात्र भीतीपोटी अक्षरशः जागून काढली. उंदरी नदीचे पाणी नायगाव मध्ये घुसले असून तट बोरगाव शिवार पूर्ण पाण्यात गेले आहे तर सोनिजवळा पाझर तलावाचे पाणी अनेक घरात घुसले. इस्थळ जि.प. शाळेतही पाणी आले आहे. होळणा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने सोमनाथ बोरगावचाही संपर्क तुटला आहे. शेकडो गावातील शेती आणि मालमत्तेच्या नुकसानीची गिणतीच राहिली नसून सध्या फक्त स्वतःचा, कुटुंबियांचा आणि जनावरांचा बचाव करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. दरम्यान,  केज, कळंब, भूम, वाशी, चौसाळा, नेकनूर, भागात अतिवृष्टी झाल्यामुळे मांजरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने सोमवारी रात्री धरणाचे सहा दरवाजे पूर्ण क्षमतेने म्हणजेच तीन मीटर पर्यंत  उचलण्यात आले होते. मात्र, तरीही येवा सुरूच असल्याने आज मंगळवारी पहाटे धरणाचे आणखी १२ दरवाजे उघडण्यात आले. सद्य स्थितीत धरणाचे सर्वच्या सर्व एकूण १८ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यापैकी सहा दरवाजे तीन मीटरने तर १२ दरवाजे ०.५० मीटरने उघडण्यात आले असून त्यातून ७० हजार ८४६ क्युसेक वेगाने नदीपात्रात पाणीच विसर्ग सुरू आहे. त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना महापुराचा प्रचंड धोका निर्माण झाला असून नागरिकांनी अतिसतर्क राहण्याची आवश्यकता आहे. 

महामार्गासह राज्य रास्ता बंद झाल्याने वाहने खोळंबली

दरम्यान, रात्रीच्या पावसात केज मधील डॉ. थोरात यांच्या रुग्णालयासमोरील तात्पुरता बांधलेला कच्चा पूल वाहून गेला. त्यामुळे केज-अंबाजोगाई रस्ता वाहतुकीसाठी बंद झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या. या भागातील अनेक दुकाने आणि घरात पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. तर, कळंब-अंबाजोगाई रस्त्यावर सावळेश्वर पैठण  येथील पुलावरून पाणी आल्याने हा रास्त देखील बंद झाला आहे. 

अंबाजोगाईत अनेक वस्त्यात पाणी 

सोमवारी रात्रीच्या मुसळधार पावसाने भोईगल्ली, मोची गल्ली व पंचशील नगर भागातील अनेक घरामध्ये पाणी शिरले. भीतीपोटी या भागातील नागरिकांना रात्र जगून काढावी लागली

Web Title: Haunted by torrential rains; Many villages including Ambajogai lost contact

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.