'Don't let the funds run out' - Pankaja Munde | ‘निधी कमी पडू देणार नाही’ -पंकजा मुंडे
‘निधी कमी पडू देणार नाही’ -पंकजा मुंडे

ठळक मुद्देअंबाजोगाईत विविध विकास कामांचे लोकार्पण

अंबाजोगाई : बीड जिल्ह्यात विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच अंबाजोगाईसाठी योगेश्वरी देवीचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून ते मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.
अंबाजोगाईत सोमवारी दुपारी बस स्थानकाच्या इमारतीचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण. तालुका क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉल, जीम हॉल, कार्यालय इमारत, धावमार्ग व मैदानाच्या लोकार्पण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर आ.संगीता ठोंबरे, विभाग नियंत्रक जालिंदर शिरसट, क्रीडा संचालक उर्मिला मोराळे, उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, तहसीलदार संतोष रुईकर, गयाबाई कराड, सविता लोमटे, संतोष हांगे, राजेश कराड, सुनील लोमटे, संजय गंभीरे, अविनाश तळणीकर, कमलाकर कोपले, दिलीप काळे व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षात बीड जिल्ह्यात विकासाची गंगा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. पुढच्या पाच वर्षात तर जिल्ह्यत विकासासाठी सुवर्णकाळ राहील. रेल्वे, पाणी, रस्ते ही कामे मार्गी लावली.आगामी काळात सिंचन, रोजगार, उद्योगवाढीसाठी चालना देणार आहे. जिल्हा विकासात अग्रेसर ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले.
या प्रसंगी बोलतांना आ.संगीता ठोंबरे म्हणाल्या, अंबाजोगाई शहरातील क्रीडा संकुल व बस स्थानक हे रखडलेले प्रश्न आपण मार्गी लावले. कोट्यवधी रुपये निधी खर्च करून शहरात विकास कामे केल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी उर्मिला मोराळे, जालिंदर शिरसाट यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक राम कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनंत लोमटे यांनी मानले. या कार्यक्रमास महिला व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
मोर्चा हास्यास्पद : धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
पीकविमा व वैद्यनाथ कारखाना या प्रश्नावर मोर्चा काढला. शासन विम्याची रक्कम आठवड्यात देईल. साखर कारखान्याने ८० टक्के ऊसाची रक्कम सभासदांना दिली आहे.
उर्वरित २० टक्के रक्कमेचा हप्ता दिवाळीपूर्वी दिला जाईल. हे माहीत असताना ही मोर्चा काढणे हे हास्यास्पद आहे.
ज्यांनी कारखान्याच्या जमिनी विकल्या,ज्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे नोंद आहेत. त्यांनी मला शिकवू नये. असे त्यांनी ठणकाऊन सांगितले.
अंबाजोगाई-परळी रखडलेल्या रस्त्यांसाठी परत निधी प्राप्त झाला असून हे काम लवकरच मार्गी लागेल, असे सांगून पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी शासन सर्वतोपरी तत्पर असल्याचे पालकमंत्री मुंडे याप्रसंगी म्हणाल्या.


Web Title: 'Don't let the funds run out' - Pankaja Munde
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.