यात्रेत मांसाहारी जेवणावरून वाद; पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास दोन वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 02:34 PM2021-12-03T14:34:54+5:302021-12-03T14:39:03+5:30

विष्णू भापकर व इतर दोन महिला मांसाहारी जेवणाचे ताट घेऊन पोलिसांच्या तंबूत जेवणासाठी बसू लागले. यावेळी पोलीस नाईक रेवणनाथ गंगावणे यांनी त्यास विरोध करत ही जेवणाची जागा नाही, असे सांगितले.

Disputes over non-vegetarian meals during the yatra;Two-year sentence for beating police | यात्रेत मांसाहारी जेवणावरून वाद; पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास दोन वर्षांची शिक्षा

यात्रेत मांसाहारी जेवणावरून वाद; पोलिसाला धक्काबुक्की करणाऱ्यास दोन वर्षांची शिक्षा

Next

बीड : गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील देवीच्या यात्रेत बंदोबस्तावरील पोलिसांच्या तंबूत मांसाहारी जेवणाचे ताट घेऊन घुसणाऱ्यास पोलिसांनी विचारणा केली. त्याचा राग मनात धरून त्याने पोलिसाला धक्काबुक्की केली. या प्रकरणी तलवाडा ठाण्यात शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी २ डिसेंबर रोजी आरोपीला दोषी ठरवून दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली.

विष्णू श्रीरंग भापकर (रा. लखमापुरी पो. सुखापुरी ता. अंबड जि. जालना) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १० मे २०१६ रोजी तलवाडा (ता.गेवराई) येथे त्वरिता देवी यात्रा होती. यासाठी विष्णू भापकर हा कुटुंबासह आला होता. तलवाडा ठाण्याच्या वतीने देवी मंदिर परिसरात तंबू रोवून बंदोबस्तावरील अंमलदारांना विश्रांतीसाठी सोय केली होती.

दरम्यान, या यात्रेत देवीला बकरे कापून नवसपूर्ती करण्याची परंपरा आहे. यावेळी विष्णू भापकर व इतर दोन महिला मांसाहारी जेवणाचे ताट घेऊन पोलिसांच्या तंबूत जेवणासाठी बसू लागले. यावेळी पोलीस नाईक रेवणनाथ गंगावणे यांनी त्यास विरोध करत ही जेवणाची जागा नाही, असे सांगितले. यावर चिडलेल्या भापकरने शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. सोबतच्या दोन महिलांनीही त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी मोठा जमाव जमला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जमाव पांगविण्यात आला. तलवाडा ठाण्यात विष्णू भापकरसह अन्य दोन महिलांवर गुन्हा नोंद करण्यात आला. तत्कालीन उपनिरीक्षक आर.आर. गडवे यांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी सहायक उपनिरीक्षक सी.एस. इंगळे, रमेश उबाळे महिला पोलीस नाईक सी.एस. नागरगोजे यांनी त्यांना साहाय्य केले.

सात साक्षीदार तपासले
या प्रकरणात सरकार पक्षाकडून सहायक सरकारी वकील अनिल तिडके यांनी सात साक्षीदार तपासले. साक्षी-पुरावे ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्या. हेमंत महाजन यांनी विष्णू भापकरला दोषी ठरवले तर दोन महिलांची निर्दोष मुक्तता केली. भापकरला दोन वर्षे कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Web Title: Disputes over non-vegetarian meals during the yatra;Two-year sentence for beating police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.