ओला दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्या - नमिता मुंदडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 03:48 PM2021-09-27T15:48:50+5:302021-09-27T15:52:06+5:30

MLA Namita Mundada : बुट्टेनाथसह १८ साठवण तलावांच्या निर्मितीचीही केली मागणी

Declare a wet drought and provide Rs 50,000 per hectare - Namita Mundada | ओला दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्या - नमिता मुंदडा

ओला दुष्काळ जाहीर करून प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्या - नमिता मुंदडा

Next
ठळक मुद्देविविध मागण्यांसाठी आ. नमिता मुंदडांचे धरणे आंदोलनशेकडो शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग

अंबाजोगाई : मागील आठवड्यापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने केज, अंबाजोगाई, बीड, तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्यावी, १०० टक्के नुकसान झाल्यामुळे विम्याची १०० टक्के रक्कम देण्याचे आदेश द्यावेत या मागणीसाठी केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता अक्षय मुंदडा यांनी सोमवारी (दि.२७) अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालासमोर थेट रस्त्यावर बसून धरणे आंदोलन केले. यावेळी सर्वाधिक नुकसानग्रस्त तिन्ही तालुक्यातून शेकडो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. प्रचंड घोषणाबाजी करत आंदोलकांनी आपली व्यथा आणि मागण्या प्रशासनासमोर मांडल्या.
 
केज, अंबाजोगाई, बीड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात २३ सप्टेंबर पासून अतिवृष्टी सुरु आहे. केज, कळंब, भूम, वाशी, चौसाळा, नेकनूर, भागात अतिवृष्टी झाल्यामुळे मांजरा नदीला महापूर आला आहे. मांजरा प्रकल्पाचे दरवाजे उघडले आहेत. परंतु पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे व मांजरा प्रकल्पात पाणी साठा जास्त झाल्यामुळे धरणाच्या वरील गावांतील शेतीत पाणी शिरले आहे. त्यामुळे शेतजमिनीचे व सोयाबीन, ऊस, व इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच मांजरा प्रकल्पाच्या खाली मांजरा नदीस अतिवृष्टीमुळे व मांजरा प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे महापूर आला आहे. त्यामुळे शेतजमिनीचे व शेतातील पिकांचे सोयाबीन, ऊस, व खरीप हंगामातील सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांचे नुकसान प्रचंड झाले आहे. कधी ओला दुष्काळ, कधी सुका दुष्काळ हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नशिबी कायम  आहे. पिकले तर त्याला खर्चावर आधारित भाव ही मिळत नाही त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तसेच बीड जिल्ह्यातील राज्यमार्ग, वस्ती रस्ते, शेती रस्ते, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, पाणंद रस्ते व पुलांचे अत्यंत नुकसान झाले आहे. पाझर तलावे, बंधारे फुटली आहेत. 

त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे गांभीर्य लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत द्यावी. १०० टक्के नुकसान झाल्यामुळे विम्याची १०० टक्के रक्कम देण्याचे आदेश द्यावेत. गतवर्षी झालेल्या नुकसानीचा प्रलंबित पीकविम्याचे तातडीने वाटप करावे, जाहीर करूनही न दिलेली यावर्षीच्या जोखमीच्या विम्याचे २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना त्वरित द्यावी. अंजनपूर, कानडी बोरगाव येथील बंधाऱ्याचे तुटलेले ५ दरवाजे त्वरित बसवावेत व कालवा दुरुस्तीचे (लाईनिंग) चे काम त्वरित करावे. राज्यमार्ग, वस्ती रस्ते, शेती रस्ते, जिल्हा मार्ग, ग्रामीण रस्ते, पानंद रस्ते, व पुलांची दुरुस्ती, पाझर तलाव फुटले आहेत त्यांना भेगा पडल्या आहेत, त्यांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणवर निधी उपलब्ध करून द्यावा व घरांची पडझड झाली आहे त्याबाबत तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करण्याबाबत आदेश द्यावेत या मागणीसाठी आ. नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवारी अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. शेकडो शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होत ओला दुष्काळासह इतर सर्व मागण्या मान्य करण्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सर्व मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले. 

या आंदोलनात आ. मुंदडा यांच्यासह ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, अक्षय मुंदडा, ऋषिकेश आडसकर, भगवान केदार, अच्युत गंगणे, विजयकांत मुंडे, शिवाजी गित्ते, सतीश केंद्रे, प्रदीप गंगणे, जीवनराव किर्दंत, मधुकर काचगुंडे, डॉ. अतुल देशपांडे, हिंदुलाल काकडे, दिलीप भिसे, सुरेंद्र तपसे, महादेव सूर्यवंशी, शिवाजी पाटील, मन्मथ पाटील, हिंदुलाल काकडे, शिवराज थळकरी, सारंग पुजारी, ॲड. दिलीप चामनर, शरद इंगळे, धनंजय घोळवे, सुनील घोळवे, विजयकुमार इखे, पंकज भिसे, सुरज पटाईत, युवराज ढोबळे, धनराज पवार, सुनील गुजर, सुरेश मुकदम, बाळासाहेब जाधव, जावेद शेख, रवी नांदे, विकास जाधव, संतोष जाधव ,अंगदराव मुळे, कल्याण काळे, प्रशांत आद्नाक, वैजनाथ देशमुख, ॲड. संतोष लोमटे, भूषण ठोंबरे, डॉ. निशिकांत पाचेगावकर, डॉ. धर्मपात्रे, शिवाजी गित्ते, राजेभाऊ मुंडे, शिवाजी जाधव, राहुल मोरे, मेघराज समवंशी, बाळासाहेब पाथरकर, गणेश राऊत, शिरीष मुकडे, शिवाजी डोईफोडे, अनिरुद्ध शिंदे यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. 

बुट्टेनाथ सह १८ साठवण तलावांच्या निर्मितीची मागणी
प्रत्यक्षात अतिवृष्टीमुळे नदी नाल्याला आलेल्या महापुराचे पाणी वाहून जाते त्यामुळे केज, अंबाजोगाई, बीड, तालुक्यातील बुट्टेनाथ सह १८ साठवण तलाव व वाण, होळना तसेच ईतर नद्यावर बँरेजेस व बंधारे बांधणे आवश्यक आहे. वाहून जाणारे पाणी थांबवले तर अशी भयंकर पूर परिस्थिती निर्माण होणार नाही व बारामहिने शेतीला पाणी मिळेल व पिण्याच्या पाण्याची सोय होईल. त्यासाठी त्वरित मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणीही आ. मुंदडा यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

Web Title: Declare a wet drought and provide Rs 50,000 per hectare - Namita Mundada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.