BJP activists confused by Pankaja Munde's posters in social media | 'आमचं ठरलंय, जय महाराष्ट्र'; पंकजा मुंडे यांच्या पोस्टर्समुळे भाजप कार्यकर्ते संभ्रमात
'आमचं ठरलंय, जय महाराष्ट्र'; पंकजा मुंडे यांच्या पोस्टर्समुळे भाजप कार्यकर्ते संभ्रमात

ठळक मुद्देपंकजा मुंडे यांनी १ डिसेंबर रोजी सोशल मीडियावरुन कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली होती.

- संजय खाकरे

परळी (जि. बीड) :  आमचं ठरलंय, जय महाराष्ट्र, चलो गोपीनाथ गड, असे संदेश भाजपा कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर  फिरत असल्याने शहरातील भाजपाचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. १२ डिसेंबर रोजी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथ गडावर होणाऱ्या कार्यक्रमात माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे काय निर्णय घेतात याकडे पुन्हा एकदा राज्याचे लक्ष लागलेले आहे. 

पंकजा मुंडे यांनी १ डिसेंबर रोजी सोशल मीडियावरुन कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली होती. १२ तारखेला पंकजा मुंडे कोणता निर्णय घेणार, या चर्चेला उधाण आले होते. त्यानंतर भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी स्वपक्षीयांमुळेच भाजपच्या काही उमेदवारांचा पराभव झाल्याचे विधान केले होते. 
त्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  प्रत्युत्तर दिले होते. ही चर्चा रंगत असतानाच गोपीनाथ गडावरील कार्यक्रमाच्या चार दिवस आधी रविवारी आमचं ठरलंय, जय महाराष्ट्र, चलो गोपीनाथ गड, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय निरीक्षकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

विशेष म्हणजे सोशल मीडियावर अशा घोषणेचे पोस्टरवजा फोटोही व्हायरल झाला आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते एकमेकांना फोन करून पुढच्या रणनीतीवर चर्चा करीत आहेत. परंतु यासंदर्भात अधिकृत माहिती मात्र प्राप्त झालेली नाही. काहींच्या म्हणण्यानुसार पंकजा मुंडे या भाजपमध्येच राहणार. परंतु  जय महाराष्ट्राचा नारा सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यानंतर कार्यकर्ते संभ्रमात आहेत.

१२ तारखेकडे लक्ष
परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या मुंबईला गेल्या. त्यानंतर त्या परळीत आल्याच नाहीत. आता १२ डिसेंबरच्या अनुषंगाने परळीत येणार असून कार्यकर्त्यांशी हितगुज साधणार आहेत. सध्या मात्र भाजपमध्येच राहणार की शिवसेनेत जाणार अशी चर्चा परिसरात सुरू झालेली आहे.

Web Title: BJP activists confused by Pankaja Munde's posters in social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.