Beed: जिल्हा परिषद शाळेत चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; माजलगावात शिक्षकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 19:28 IST2025-12-02T19:27:38+5:302025-12-02T19:28:46+5:30
आरोपी शिक्षक हा दोन महिन्यांपूर्वीच या शाळेवर बदलून आला होता. यापूर्वी कार्यरत असलेल्या शाळेवरही त्याने असाच प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे.

Beed: जिल्हा परिषद शाळेत चार विद्यार्थिनींचा लैंगिक छळ; माजलगावात शिक्षकावर गुन्हा
माजलगाव : तालुक्यातील ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरी ते चौथीच्या चार शालेय मुलींना धमक्या देऊन त्यांचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी विष्णू झोंबाडे नावाच्या शिक्षकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यास अटक केली.
माजलगाव शहरापासून जवळच असलेल्या या शाळेत मागील पंधरा दिवसांपासून शिक्षक विष्णू झोंबाडे हा धमक्या देऊन इयत्ता तिसरी ते चौथीच्या वर्गातील मुलींचा लैंगिक छळ करत होता. या चार मुलींपैकी एका मुलीने ही माहिती आपल्या कुटुंबाला सांगितल्यानंतर हादरलेल्या कुटुंबीयांनी सोमवारी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. ग्रामीण पोलिसांनी तत्काळ शिक्षक विष्णू झोंबाडे यास अटक करून त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
पालकांमध्ये संताप व मागणी
या घटनेमुळे पालकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आरोपी शिक्षक हा दोन महिन्यांपूर्वीच या शाळेवर बदलून आला होता. यापूर्वी कार्यरत असलेल्या शाळेवरही त्याने असाच प्रकार केल्याची माहिती समोर येत आहे. “शैक्षणिक पवित्र कार्य असताना शिक्षक असे करत असतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य काय?” असा प्रश्न पालक व्यक्त करत आहेत. दरम्यान, आरोपीस कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आपण पोलिस अधीक्षकांची मंगळवारी भेट घेणार असल्याची माहिती पीडित मुलींच्या पालकांनी दिली आहे. पालकांनी आमच्या शाळेवर महिला शिक्षिका नियुक्त करावी, अशी मागणी केली आहे.