बीडच्या जिल्हा रुग्णालयाचे 'दुखणे' कायम; उपसंचालकांकडून पुन्हा सुचनांचे 'डोस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 04:55 PM2019-11-29T16:55:28+5:302019-11-29T16:57:21+5:30

जिल्हा रूग्णालयात आरोग्य उपसंचालकांकडून पुन्हा तपासणी

Beed district hospital's 'problem' unsolved; 'Dosage' of instructions again from Deputy Director | बीडच्या जिल्हा रुग्णालयाचे 'दुखणे' कायम; उपसंचालकांकडून पुन्हा सुचनांचे 'डोस'

बीडच्या जिल्हा रुग्णालयाचे 'दुखणे' कायम; उपसंचालकांकडून पुन्हा सुचनांचे 'डोस'

Next
ठळक मुद्देकायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत मात्र, आरोग्य विभाग उदासिन

बीड : साधारण सहा महिन्यांपूर्वी आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी जिल्हा रूग्णालयाची तपासणी करून हे करा, ते करा अशा सुचना केल्या होत्या. तसेच सुविधांबद्दलही आश्वासन दिले होते. मात्र, यात कसलीच सुधारणा अद्यापही झालेली दिसत नाही. तोच शुक्रवारी पुन्हा त्यांनी रूग्णालयाची तपासणी करून नव्याने जुन्या प्रश्नांवरच सुचना करण्यात आल्या. कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत मात्र, आरोग्य विभाग उदासिन असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

जिल्हा रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी वेळेवर रूग्णालयात येत नाहीत, आले तर वेळेच्या आत घरी जातात, अ‍ॅप्रन व गळ्यात ओळखपत्र घालत नाहीत, स्टेथोस्कोप वापरत नाहीत, रूग्णांची तपासणी करण्यास टाळाटाळ करतात, वॉर्डमधील ड्रेनेजचा प्रश्न, शौचालयांचा प्रश्न, अपुरे मनुष्यबळ, घाणीचे साम्राज्य आदींबाबत नागरिकांची ओरड होती. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून हा प्रकार निदर्शना आणलेला आहे. 
दरम्यान, याच प्रश्नांना अनुसरून उपसंचालक डॉ.माले यांनी जिल्हा रूग्णलायाच्या प्रत्येक विभागात जावून तपासणी केली होती. त्यांना अनेक त्रुटी आढळल्या होत्या. तसेच असुविधा, अस्वच्छतेबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करून सुधारण्याच्या सुचना केल्या होत्या. याबाबत अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांना सुचनाही केल्या होत्या. मात्र, सहा महिन्यांनतरही रूग्णालयाची परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. 
शुक्रवारी डॉ.माले यांनी पुन्हा रूग्णालयाची तपासणी केली. नेहमीप्रमाणे त्यांनी त्याच त्या मुद्यांवर अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुचना केल्या. जुन्या प्रश्नांवर त्यांना विचारणा करताच त्यांनी बोलण्यास नकार दिला.  सोबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, प्रशासकीय अधिकारी डॉ.ए.आर.हुबेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.कमलाकर आंधळे, मेट्रन विजया सांगळे आदींची उपस्थिती होती. 

रुग्णालयात आजही नाक दाबून प्रवेश
ड्रेनेज, शौचालयांच्या दुरवस्थेमुळे रूग्ण व नातेवाईकांनी नाक दाबून रुग्णालयात प्रवेश करावा लागतो. याबाबत यापुर्वीही अनेकवेळा डॉ.माले यांनी सुधारण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र, काहीच झाले नाही. हाच प्रश्न त्यांना विचारला. यावर त्यांनी आपण पाहणी करून सांगतो, असे म्हणत काढता पाय घेतला. उशिरापर्यंत त्यांनी यावर कसलीच प्रतिक्रिया दिली नाही.

स्त्री विभाग, प्रकल्प प्रेरणात सीएचओंची गर्दी
मानसोपचार तज्ज्ञांचा कक्ष असलेल्या प्रकल्प प्रेरणा विभागात पहिल्यांदाच ५ पेक्षा जास्त सीएचओ (कम्युनिटी हेल्थ आॅफिसर) दिसले. स्त्री रोग विभागतही १० सीएचओ आणि ३ वैद्यकीय अधिकारी पहिल्यांदाच होते. एकाकडेही स्टेथोस्कोप नव्हता, हे विशेष. यावरून सीएचओंचे समन्वयक डॉ.महेश माने यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. 

केवळ एका दिवसापुरती शिस्त
उपसंचालक तपासणी करणार असल्याने सर्वच विभागात शिस्त दिसून आली. ही शिस्त केवळ एका दिवसापुरतीच असते. त्यानंतर परिस्थिती जैसे थे असते. वरिष्ठांचे नियंत्रण नसणे आणि दुर्लक्ष तसेच विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांमध्ये कारवाईची भिती नसल्यानेच असे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात आले. 

नातेवाईक क्लिनीकचाही प्रश्न रखडलेलाच
रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांची आठवड्यातून दोन किंवा एक दिवस तपासणी करावी, यासाठी रुग्णालयात नातेवाईक क्लिनीक उघडा, असे आदेशही डॉ.माले यांनी दिले होते. मात्र, अद्यापही ते सुरू झाले नाही. यावरून उपसंचालकांचा वचक नाही, की बीडच्या अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

पुरेसे मनुष्यबळ अन् निधी द्यावा
आरोग्य विभागात अपुरे मनुष्यबळ आहे. ही परिस्थिती सुधारण्याासाठी पुरेसे मनुष्यबळ आणि सुवधिा पुरविण्यासाठी आवश्यक तो निधी रुग्णालयाला देणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.थोरात व डॉ. राठोड यांनी उपसंचालकांकडे मागणीही केल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Beed district hospital's 'problem' unsolved; 'Dosage' of instructions again from Deputy Director

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.