एच. एस. प्रणॉयने दिला दिग्गज लिन डॅनला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 04:05 AM2019-08-21T04:05:27+5:302019-08-21T04:06:19+5:30

बिगरमानांकित भारतीय प्रणॉयने चीनचा दिग्गज ११ व्या मानांकित खेळाडू लिन डॅनचा एक तास दोन मिनिट रंगलेल्या चुरशीच्या लढतीत २१-११, १३-२१, २१-७ असा पराभव केला.

BWF World Championships: HS Prannoy stuns former champion Lin Dan in round 2, Sai Praneeth advances | एच. एस. प्रणॉयने दिला दिग्गज लिन डॅनला धक्का

एच. एस. प्रणॉयने दिला दिग्गज लिन डॅनला धक्का

googlenewsNext

बासेल (स्वित्झर्लंड) : भारतीय बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने धक्कादायक निकाल नोंदवताना लंडन आॅलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता व अनेकवेळा विश्वविजेता ठरलेल्या दिग्गज लिन डॅनला कडव्या लढतीत पराभूत करत मंगळवारी जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
बिगरमानांकित भारतीय प्रणॉयने चीनचा दिग्गज ११ व्या मानांकित खेळाडू लिन डॅनचा एक तास दोन मिनिट रंगलेल्या चुरशीच्या लढतीत २१-११, १३-२१, २१-७ असा पराभव केला. उभय खेळाडूंदरम्यान आतापर्यंत खेळल्या गेलेल्या पाच लढतींमध्ये प्रणॉयचा हा तिसरा विजय आहे. दुसरीकडे, बी. साई प्रणीत यानेही विजयी आगेकूच करताना दक्षिण कोरियाच्या ली डोंग क्युन याचा २१-१६, २१-१५ असा पराभव केला.
प्रणॉयने १९-११ अशी एकतर्फी आघाडी घेतल्यानंतर सहजपणे पहिला गेम जिंकला. आॅलिम्पिक २००८ मध्येही सुवर्णपदक जिंकलेल्या लिन डॅनने दुसऱ्या गेममध्ये जोरदार पुनरागमन केले. चीनच्या खेळाडूने ५-५ च्या बरोबरीनंतर प्रणॉयला कुठली संधी दिली नाही आणि गेम जिंकत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली.
निर्णायक गेममध्ये प्रणॉयने जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल व सातवेळचा विश्वविजेत्या लिन डॅनविरुद्ध मनोधैर्य कायम राखले. प्रणॉयने ४-४ च्या स्कोअरनंतर तुफानी वेगवान खेळ करताना सहजपणे तिसरा गेम जिंकला आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याचवेळी साई प्रणीतच्याही आपल्या दमदार खेळामुळे भारतीय संघाने जल्लोष केला. सरळ दोन गेममध्ये बाजी मारत प्रणीतने क्युनला स्पर्धेबाहेर केले. दोन्ही खेळाडूंमध्ये झालेल्या पाच सामन्यात तिसऱ्यांदा प्रणीतने विजय मिळवला. (वृत्तसंस्था)

- लिन डॅनने जूनमध्ये आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये प्रणॉयचा पराभव केला होता. उप-उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रणॉयची लढत जपानचा अव्वल मानांकित केंतो मोमोतो व स्पेनच्या लुई एनरिक पेनालवर यांच्यादरम्यानच्या लढतीतील विजेत्या खेळाडूसोबत होईल.

- महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीला चेंग चिंग हुई व यांग चिंग टुन या चिनी ताईपेच्या जोडीविरुद्ध पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली. यामुळे त्यांना विजयी आगेकूच करण्यात कोणतीही अडचण आली नाही.
दुसºया फेरीत मात्र या भारतीय जोडीला स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. कारण यावेळी त्यांना बलाढ्य चीनच्या जू युई व ली यिन हुई या स्पर्धेतील सातव्या मानांकित जोडीच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल.

Web Title: BWF World Championships: HS Prannoy stuns former champion Lin Dan in round 2, Sai Praneeth advances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BadmintonBadminton