Traffic police will not issue the challan of vehicles till august 15th of vadodara | महापूर: बडोद्यात चलन फाडणार नाहीत वाहतूक पोलीस
महापूर: बडोद्यात चलन फाडणार नाहीत वाहतूक पोलीस

सुरत : गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये महापूर आला होता. यामुळे वाहतूक अधिकाऱ्यांनी बडोद्यातील लोकांसाठी वाहतुकीचे नियम शिथिल केले आहेत. 15 ऑगस्टपर्यंत कोणताही नियम तोडला तरीही चलन फाडण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


महापूराच्या पाण्याने आधीच लोक त्रस्त आहेत. यामुळे कोणाच्या इलेक्ट्रीक वस्तू, कोणाची वाहने तर अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू वाहून गेल्या आहेत. त्यातच घरे, दुकानांमधील वस्तू भिजल्याने नुकसान झाले आहे. यामुळे त्रासामध्ये असलेल्य़ा लोकांना दिलासा देण्यासाठी वाहतूक विभागाने 15 ऑगस्टपर्यंत सूट दिली आहे. याकाळात एकही चलन फाडले जाणार नाही. 


बडोदा शहरामध्ये गेल्या आठवड्यात 21 इंचांपर्यंत पाणी भरले होते. यामुळे वाहतूक पोलिसांनी 15 ऑगस्टपर्यंत वाहतूक नियम तोडणारे किंवा वाहतूक कायद्याचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरोधात कोणताही दंड आकारला जाणार नाही. यामागे पोलिसांचे म्हणणे आहे की, नागरिक आधीच अनेक संकटांनी त्रस्त झाले आहेत. यात त्यांना आणखी त्रास देण्याची इच्छा नाही. 


बडोदा शहरात आलेल्या महापूरामध्ये 7 हजार कार आणि 50 हजार दुचाकी पाण्यामध्ये बुडाल्या होत्या. गेल्या 31 जुलैला एकाच दिवशी 20 इंच एवढा पाऊस झाला. या कार आणि बाईक दुरुस्त करण्यासाठी जवळपास 23 कोटी खर्च येण्याची शक्यता आहे. तर यासाठी दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता आहे.


मॅकॅनिकनी सांगितल्यानुसार कमी पाण्यात आणि कमी वेळासाठी बुडालेल्या कार दुरुस्त करण्यासाठी कमी वेळ लागणार आहे. मात्र, ज्या कार जास्त काळ आणि पूर्णपणे पाण्यात बुडाल्या होत्या त्यांच्या इंजिनातही पाणी गेले आहे. या कार दुरुस्त करण्यासाठी दीड महिना लागण्याची शक्यता आहे.   
 

Web Title: Traffic police will not issue the challan of vehicles till august 15th of vadodara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.