मुंबई: टाटानं आज Nexon EV लॉन्च केली आहे. या कारची किंमत 13.99 लाखांपासून सुरू होईल. कॉम्पॅक्ट एसयूव्ही प्रकारातली ही टाटाची पहिली कार असून देशातली सर्वात स्वस्त एसयूव्ही आहे. Tata Nexon Electric तीन व्हेरिंयटमध्ये ( XM, XZ+ आणि XZ+ LUX) उपलब्ध आहे. Tata Nexon ची स्पर्धा एमजी ZS EV आणि ह्युंदाई कोनाशी होईल. मात्र या दोन्ही कारची किंमत नेक्सॉनपेक्षा जास्त आहे. 

टाटा नेक्सॉनच्या ईव्हीमध्ये 30.2 kWh लिथियम-आयनची बॅटरी देण्यात आली. ही बॅटरी कारच्या फ्लोरखाली आहे. पूरपरिस्थितीतही ही बॅटरी सुरक्षित राहील, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर नेक्सॉन 312 किलोमीटर अंतर कापेल. शून्य ते 100 किलोमीटर प्रति तास इतका वेग घेण्यासाठी नेक्सॉनला 9.9 सेकंद लागतात. नेक्सॉनला स्टँडर्ड 15A AC चार्जरनं 20 टक्क्यांहून 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यासाठी 8 तासांचा कालावधी लागतो. तर फास्ट चार्जरनं नेक्सॉनची बॅटरी ० ते ८० टक्क्यांपर्यंत ६० मिनिटांमध्ये चार्ज होते. नेक्सॉन इलेक्ट्रिकचं डिझाईन पेट्रोल, डिझेल व्हर्जनसारखंच आहे. या कारमध्ये ह्युमनिटी लाइन ग्रील, प्रोजेक्टर लाईट्ससह शार्प हेडलॅम्प्स आणि एलईडी डीआरएल अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. याशिवाय क्रोम बेझल्स, फॉग लॅम्प, नवीन अलॉय वील्झ, टर्न इंडिकेटर्स आणि आऊट साइड रियर व्ह्यू मिरर्स या सुविधादेखील उपलब्ध आहेत. सिग्नेचर टील ब्ल्यू, ग्लेशियर व्हाईट आणि मूनलाईट सिल्व्हर अशा तीन रंगांमध्ये नेक्सॉन ईव्ही उपलब्ध आहे. नेक्सॉन ईव्हीमध्ये टाटानं नवीन ZConnect अ‍ॅप्लिकेशन दिलं आहे. या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनमध्ये ३५ अद्ययावत सोयी सुविधा आहेत. यात एसयूव्हीची संपूर्ण माहिती देणारी आकडेवारी, रिमोट ऍक्सेस, सुरक्षेशी संबंधित सुविधांचा समावेश आहे. 

टाटा नेक्सॉन ईव्हीच्या XM या बेसिक व्हेरिएंटमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, दोन ड्राईव्ह मोड, कीलेस एन्ट्री, पुश बटन स्टार्ट, ZConnect कनेक्टेड कार अ‍ॅप, फ्रंट-रियर पॉवर विंडो आणि इलेक्ट्रिक टेलगेटसारखी फिचर्स देण्यात आली आहेत. तर XZ+ मध्ये ड्यूल टोन कलर ऑप्शन, 16-इंचाचे डायमंड-कट अलॉय वील्झ, 7-इंची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, रियर कॅमरा आणि लेदर फिनिश स्टीयरिंग वील देण्यात आले आहेत. तर टॉप व्हेरिएंटमध्ये XZ+ LUX मध्ये सनरूफ, प्रीमियम लेदर फिनिश सीट्स आणि ऑटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर्स आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स या सुविधा देण्यात आल्या आहेत.नेक्सॉनच्या XM या बेस व्हेरिएंटची किंमत 13.99 लाख, XZ+ ची किंमत 14.99 लाख, तर XZ+ LUX या टॉप व्हेरिएंट 15.99 लाख रुपये आहे. देशात सर्व ठिकाणी कारची किंमत सारखीच असेल. 
 

Web Title: tata nexon ev launched in india know all specifications features and price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.