बुलेटप्रूफ, ग्रेनेडप्रूफ अन् बरंच काही..; अशी आहे पुतिन यांची कार, किंमत किती? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 15:50 IST2025-12-02T15:49:38+5:302025-12-02T15:50:16+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर येणार आहेत.

बुलेटप्रूफ, ग्रेनेडप्रूफ अन् बरंच काही..; अशी आहे पुतिन यांची कार, किंमत किती? जाणून घ्या...
India-Russia:रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 4 आणि 5 डिसेंबरला भारत दौऱ्यावर येत आहेत. मात्र यावेळी केवळ त्यांच्या राजनैतिक भेटीकडेच नाही, तर त्यांच्या खास कार Aurus Senat कडेही सर्वांची नजर असेल. जगात “चाकांवर धावणारा किल्ला” म्हणून ओळखली जाणारी ही लिमोझीन रशियाच्या महत्त्वाकांक्षी Cortege Program अंतर्गत तयार केली असून, 2018 पासून पुतिन यांची अधिकृत कार आहे. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनाही रशियाने ही कार भेट दिली होती.
शक्तिशाली इंजिन अन् बरंच काही...
बाहेरुन प्रचंड आणि अत्यंत सुरक्षित दिसणारी Aurus Senat आतून तितकीच दमदार आहे. यात 4.4 लिटर ट्विन-टर्बोचार्ज्ड V8 हायब्रिड इंजिन आहे, जे काही सेकंदांत कारला हाय स्पीड पुरवते. वेग वाढला तरी गाडीची स्थिरता ढळत नाही, हीच तिची सर्वात मोठी ताकद आहे. दीर्घ प्रवासातही हे इंजिन अतिशय स्मूथ कार्य करते.
आतून राजेशाही अनुभव
Aurus Senat चे केबिन म्हणजे एखाद्या पाचतारांकित हॉटेलसारखेच. उच्च दर्जाचे लेदर, अस्सल लाकडी काम, शांत वातावरण आणि मागील सीटवरील आलिशान फीचर्स यामुळे ही कार जगातील सर्वात लक्झरी प्रेसिडेंशियल गाड्यांमध्ये गणली जाते.
मसाज, हीटिंग, वेंटिलेशन-प्रत्येक सुविधा अशा प्रकारे डिझाइन केली आहे की, प्रवासादरम्यान बाहेरील आवाज किंवा तणाव अजिबात जाणवत नाही. पुतिन यांचे बहुतेक महत्त्वाचे राजनैतिक प्रवास या शांत वातावरणातच पार पडतात.
बॉम्ब आणि बुलेटप्रूफ
ही कार तिच्या सुरक्षात्मक वैशिष्ट्यांमुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. कारची बॉडी विशेष आर्मर्ड स्टीलची बनलेली असून ती गोळ्या, ग्रेनेड आणि स्फोटांना तोंड देऊ शकते. टायर ‘रन-फ्लॅट’ तंत्रज्ञानाचे असून गोळी लागली किंवा पंचर झाले तरी कार लांब अंतर सहज पार करू शकते.
प्रगत इलेक्ट्रॉनिक सुरक्षा प्रणाली संभाव्य धोक्यांचा वेळीच शोध घेते आणि कारवरचे नियंत्रण सुरक्षित ठेवते.
भव्य आकार आणि अधिकृत डिझाइन
Aurus Senat आकाराने सामान्य कारपेक्षा खूप मोठी आणि प्रभावशाली आहे. तिचा भव्य आकार आणि सुरक्षित डिझाइन हेच राष्ट्राध्यक्षांसाठी अतिरिक्त सुरक्षाकवच ठरते. रशियामध्ये उच्च-स्तरीय कार्यक्रमांदरम्यान ही लिमोझीन सुरक्षा ताफ्याचा अविभाज्य भाग असते.
मर्यादित उत्पादन
या लिमोझीनचे उत्पादन दरवर्षी अत्यंत मर्यादित संख्येत केले जाते. ती सामान्य बाजारात उपलब्ध नसून केवळ सरकारी वापरासाठी किंवा काही मोजक्या आंतरराष्ट्रीय भागीदारांना दिली जाते. Aurus Senat ची किंमत अडीच कोटी रुपयांच्या आसपास आहे.