MG Hector SUV Review : हेक्टरवर तरुणाई एवढी का भाळली? 40 लाखांच्या एसयुव्हीची फिचर्स 15 लाखांत? वाचा

By हेमंत बावकर | Published: December 31, 2019 10:08 AM2019-12-31T10:08:22+5:302019-12-31T12:25:51+5:30

MG Hector SUV Review : भारतीय बाजारपेठेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मॉरिस गॅराजच्या MG Hector ने कार वेटिंगचे विक्रम मोडीत काढले आहेत. सहा महिन्यांत टाटाच्या हॅरिअरची धुळधान उडवत मंदीच्या काळातही चांगली कामगिरी केली आहे.

MG Hector Review: Why hector is trending in India ? How's the petrol, diesel SUV... must read | MG Hector SUV Review : हेक्टरवर तरुणाई एवढी का भाळली? 40 लाखांच्या एसयुव्हीची फिचर्स 15 लाखांत? वाचा

MG Hector SUV Review : हेक्टरवर तरुणाई एवढी का भाळली? 40 लाखांच्या एसयुव्हीची फिचर्स 15 लाखांत? वाचा

Next

- हेमंत बावकर

भारतीय बाजारपेठेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मॉरिस गॅराजच्या MG Hector ने कार वेटिंगचे विक्रम मोडीत काढले आहेत. सहा महिन्यांत टाटाच्या हॅरिअरची धुळधान उडवत मंदीच्या काळातही चांगली कामगिरी केली आहे. मात्र, एका नाराज झालेल्या राजस्थानच्या ग्राहकाने हीच कार चक्क गाढवाला बांधून ओढायला लावल्याची नामुष्कीही याच कंपनीवर आली होती. मुळची ब्रिटनची पण चीनच्या कंपनीची मालकी असलेली ही एमजी हेक्टर कार लोकमतच्या टीमकडे रिव्ह्यूसाठी आली होती. पेट्रोल अॅटोमॅटीक आणि डिझेल मॅन्युअल अशा दोन्ही मॉडेलच्या एसयुव्ही सुमारे 500 किमी चालविण्यात आल्या.


भारत हा तरुण देश आहे. हेच एमजीने हेरले. जिथे इंटरनेटचा युजर सर्वाधिक, नवीन पिढी, आयटी क्षेत्रातही अग्रगण्य अशा देशात त्यांनी पहिली इंटरनेटवाली कार लाँच केली. अगदी सनरूफ उघडण्य़ापासून ते संगीत लावण्यापर्यंतच्या जवळपास 50 प्रकारच्या कमांड नुसत्या 'हॅलो एमजी' म्हटल्यावर देता येतात. 10.4 इंचाचा एचडी डिस्प्ले, 360 व्ह्यू पार्किंग कॅमेरा, ड्युअल पेन पॅनारोमिक सनरुफ, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, इलेक्ट्रीक पार्किंग ब्रेक, ट्रॅक्शन कंट्रोल अशा अद्ययावत सुविधा अवघ्या 15 ते 20 लाखांत देण्याची किमया या कंपनीने साधली आहे. एखाद्या 35 ते 40 लाखांच्या एसयुव्हीची फिचर्स या कारमध्ये आहेत. 

हेक्टरचे पेट्रोल अॅटोमॅटीक व्हर्जन पिकअपसाठी काहीसे धडपडते. ट्रॅफिकमध्ये असल्यावर तर एक्सीलेटरवर काही सेकंद ताकद लावावी लागते तेव्हा कुठे कार पुढे जाण्यासाठी सुरुवात करते. अशावेळी अॅटो होल्ड मोड सुरू ठेवणेच उत्तम. कारण कार पिकअप घेत नाही म्हणून जास्त जोर लावल्यास अचानक पिकअप घेण्याची शक्यता आहे. यामुळे पुढच्या वाहनाला धोका होऊ शकतो. एक्स्प्रेस हायवेवरून जाताना कारने चांगला परफॉर्मन्स दिला. चढणीला, घाटात काहीवेळा गिअर कमी झाले. मात्र, पिकअप किंवा वेगावर एवढा परिणाम जाणवला नाही. मायलेज 10 ते 14 च्या आसपास मिळाले. तर ट्रॅफिकमध्ये 7 चे मायलेज मिळाले. कंपनीने पेट्रोलसाठी 1.5 लीटरचे टर्बो इंजिन दिले आहे. याचा आणि कारच्या वजनाचा विचार करता हा आकडा समाधानकारक आहे. 


डिझेल मॅन्युअल गिअरच्या मॉडेलनेही निराश केले नाही. पिकअपच्या बाबतीत कार पेट्रोल अॅटोमॅटीकपेक्षा उजवीच होती. अगदी 100 चा वेग सहज गाठत होती. खडबडीत रस्ते, चढणीला गाडीने सारखे गिअर बदलायला भाग पाडले नाही. मुख्य म्हणजे गाडीने सेकंड गिअरवरही पिकअप घेतला. डिझेल असल्याने कारने जवळपास 16.9 किमी प्रति लीटरचे मायलेज दिले. या कारमध्ये 2.0 लीटरचे टर्बो इंजिन देण्यात आले आहे. इंजिन नॉईसही कमालीचा कमी केलेला आहे. बाहेरचा रस्त्यावरील आवाजही फार कमी येतो. 


खड्ड्यांमध्ये कशी वाटली? 
खड्डांच्या रस्त्यातून जाताना कारने काहीसे नाराज केले. अगदी पेंडॉलसाठाच्या खांबांना पाडलेल्या खड्ड्यावरून जाताना कारमध्ये धक्के जाणवत होते. तर पाईपलाईनसाठी मारलेल्या चरावरून जातानाही कार खड्ड्यात गेल्यासारखी भासत होती. म्हणजेच गचके जाणवण्या इतपत कारचे सस्पेन्शन आहे. शिवाय धाड् असा आवाजही केबिनमध्ये येतो. एमजीने भारतीय मॉडेलमध्ये जवळपास 350 बदल केले आहेत. मात्र, या सस्पेंन्शनकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वळणावर कारने वेगामध्येही कमालीचा बॅलन्स केला. ब्रेकिंगही चांगले म्हणजेच कमी अंतरावर होत होते. बॉडीरोल जाणवत होता. स्पीडब्रेकरच्या स्ट्रीपवरही गचके जाणवत होते. पण खडबडीत रस्त्यांवर गाडी अगदी 'मख्खन' सारखी जात होती. 

चांगले काय? 
एमजीची कार हायब्रिडमध्येही येते. इन्फोटेन्मेंट सिस्टिम, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टिअरिंगवरील कंट्रोल, 360 कॅमेरा, हिल होल्ड, ईएसपी, 6 एअरबॅग, टायर प्रेशर सेन्सर, एबीएस, ईबीडी, ब्रेक असिस्ट सारख्या फिचरनी युक्त कार आहे. कारमध्ये लगेज स्पेसही चांगली आहे. डिक्कीही आपोआप उघडते, बंद होते. जोर लावावा लागत नाही. दरवाजावर बॉटल होल्डर, आर्मरेस्टमध्ये जागा चांगली देण्यात आलेली आहे. केबिनमध्ये लेदरचा वापर करत प्रिमिअम  फिल देण्यात आला आहे. 26.4 सेमीचा डिस्प्ले आकर्षित करणारा आहे. सनरुफ पूर्ण उघडत नसला तरीही दोन फोल्डींग असल्याने त्याची लांबी मोठी आहे. हे दोन्ही फिचर या सेगमेंटमध्ये नवीनच आहेत. पाच सीटर असली तरीही तिला रिअर एसी देण्यात आलेला आहे. शिवाय 5 अँपीअरचे फास्ट चार्जिंग आणि मोबाईल ठेवण्यासाठी पॉकेटही दिले आहे. एसी चांगल्याप्रकारे, वेगात केबिन थंड करतो. साऊंड सिस्टिमही चांगली आहे. टचस्क्रीनवर सारेकाही असल्याने डॅशबोर्डवरची बटने खूपच कमी झालेली आहेत.


निराश करणारे काय? 
खड्ड्यांमधून जाताना कारने निराश केले. पण अगदी तुळतुळीत डांबरी रस्त्यावरूनही जाताना कारने आश्चर्याचा धक्का दिला. दोन्ही कार 120 च्या वेगात असताना त्यांचे स्टिअरिंग व्हायब्रेट होत होते. पहिल्या कारमध्ये ही समस्या आली तेव्हा व्हील अलायमेंट करायचे असेल असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, डिझेलच्या कारमध्येही हीच समस्या जाणवली. चकचकीत रस्त्यावर स्टिअरिंग डाव्या-उजव्या बाजुला जोरात व्हायब्रेट होत होते. अशावेळी स्टिअरिंग घट्ट पकडणे खूप गरजेचे असते. ही समस्या दोन्ही कारमध्ये जाणवल्याने कंपनीने याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कदाचित कारचे टायरही फुटण्याची शक्यता आहे. सावधगिरी म्हणून पुढे 80 च्या वेगाने कार हाकावी लागली. ही समस्या एक्स्प्रेस हाय़वेला जाणवली नाही. परंतू स्टिअरिंगला रस्त्यावरील चढ उतार लगेचच जाणवत होते. 


इनबिल्ट मॅपनेही काहीसे निराश केले. ठरवून दिलेला एकच रस्ता न पकडता चौका चौकात दिशा बदलली जात होती. तर काहीवेळा मार्ग वळसा घालून जाणारे दाखविले जात होते. गुगल मॅपशी तुलना केली असता ही त्रुटी जाणवत होती. यामुळे या मॅपवर अवलंबून राहण्यापेक्षा अँड्रॉईड ऑटो वापरलेला फायद्याचा. कारण नवख्या व्यक्तीला रस्ते माहित नसल्याने तो उगाचच नागमोडी रस्ते बदलत फिरत राहण्याची शक्यता अधिक आहे. 

एकंदरीत 30 ते 40 लाखांच्या एसयुव्हींची फिचर्स या एमजी हेक्टरमध्ये असल्याने आणि प्रिमिअम फिल दिल्याने ही कार भारतीय बाजारात सरस ठरत आहे. एवढी सारी फिचर्स 14 ते 22 लाखांत उपलब्ध असल्याने ही कार घेण्यास हरकत नाही. पण मागणी खूप असल्याने वेटिंग पिरिएड काहीसा निराश करायला लावू शकतो. कारसाठी तीन ते सहा महिन्यांचा वेटिंग पिरिएड आहे. 

Web Title: MG Hector Review: Why hector is trending in India ? How's the petrol, diesel SUV... must read

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.