सुटे भाग बनविणाऱ्या कंपन्या अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 05:19 AM2019-08-27T05:19:01+5:302019-08-27T05:20:11+5:30

वाहन उद्योगात मंदीचे संकट गहिरे : मानेसरमधील तीन लाख कामगार बेकार होण्याची शक्यता

Companies that make small parts are in trouble of ressesion | सुटे भाग बनविणाऱ्या कंपन्या अडचणीत

सुटे भाग बनविणाऱ्या कंपन्या अडचणीत

Next

गुरूग्राम : हरयाणातील मानेसरच्या बेल्सोनिका कॉर्पोरेशन या वाहनांसाठी सुटे भाग तयार करणाºया उद्योगातील ४०० कामगारांना नोकरीतून कमी करण्यात आले. मोटारींचे सुटे भाग तयार करणाºया कंपन्यांवर थेट व अप्रत्यक्ष अवलंबून असलेल्या कामगारांना आपली नोकरी कधीही जाईल, अशी भीती वाटत आहे.


देशभरातील वाहनउद्योगांना लागणाºया सुट्या भागांच्या एकूण उत्पादनापैकी ५० टक्के उत्पादन मानेसर येथे होते. मारुती सुझूकी लिमिटेड, हीरो मोटोकॉर्प लिमिटेड, होंडा मोटरसायकल अ‍ॅण्ड स्कूटर इंडिया प्रायव्हेट या तीन प्रमुख कंपन्यांसाठी वाहनांचे सुटे भाग बनविण्याचे सुमारे ६५० कारखाने मानेसरमध्ये आहेत. त्यामध्ये बेल्सोनिका कॉर्पोरेशन, मुंजाल शोवा, रिको आॅटो युनियन, ल्यूमॅक्स ग्रुप, नॅपिनो आॅटो या मोठ्या कंपन्या दुचाकी, चार चाकी वाहनांसाठी लागणारे सुटे भाग तयार करतात. मानेसरच्या या कंपन्यांमध्ये सुमारे
६ लाख कामगार आहेत.


काही वाहनउद्योगांनी दहा दहा दिवस कारखाने बंद ठेवले असून कर्मचारीकपातीचाही इशारा दिला आहे. हे सारे घडते आहे; कारण देशात गेल्या काही महिन्यांमध्ये वाहनांच्या विक्रीमध्ये मोठी मंदी आली आहे. त्यामुळे या उद्योगावर सध्या निराशेचे सावट पसरले आहे.
सोसायटी आॅफ इंडियन आॅटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जुलै महिन्यात वाहनांची विक्री ३९ टक्क्यांनी घसरली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून वाहनविक्रीत घसरण सुरू असून ती थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. मंदीचा फटका तेथील कामगार, या उद्योगांवर अवलंबून असलेले लघुउद्योग, विक्रेते अशा साऱ्यांनाच बसत आहे. देशभरात अदमासे ३ लाख लोक वाहनउद्योगातील मंदीमुळे बेकार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (वृत्तसंस्था)

मारुतीचे उत्पादन ५० टक्क्यांनी कमी
वाहनविक्रीतील मंदी इतकी तीव्र आहे की त्याच्या झळा लागल्यामुळे मानेसरमधील कंपन्यांत गेल्या सहा महिन्यांमध्ये सुमारे एक लाख लोकांना नोकरी गमवावी लागली असल्याचे मारुती सुझुकी कामगार युनियनचे सरचिटणीस कुलदीप झांगू यांनी म्हटले आहे. कामगारकपातीमुळे वाहनउद्योग व तेथील कामगार संघटना यांच्यातील तणावही वाढला आहे. मारुती सुझुकीने तीन हजार कंत्राटी कामगारांना नोकरीवरून काढून टाकले आहे. आणखी ४०० जणांना विनापगारी सहा महिन्यांच्या रजेवर जाण्यास सांगण्यात आले आहे. या उद्योगाच्या दोन्ही प्लांटमधील उत्पादन ५० टक्क्यांनी कमी झाले आहे.



नाशिकमधील ‘बॉश’चे उत्पादन आठ दिवस बंद; कंत्राटी कामगारांचेही हाल
 दिवसेंदिवस वाहन विक्रीत प्रचंड घट होत असल्याने वाहन उद्योग मंदीत सापडला आहे. नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनी बॉशने मागील महिन्यात सहा दिवस उत्पादन बंद ठेवले होते. आता सोमवारपासून आठ दिवस उत्पादन बंद ठेवले जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रावर मंदीचे सावट दिवसेंदिवस गडद झाल्याने महिंद्रासारख्या मोठ्या उद्योगांवर आधारित लघुउद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून वाहनउद्योग संकटात आहे, कामगारांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळत आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून प्रखरतेने जाणवायला सुरुवात झाली आहे. वाहनांची मागणी अचानक घटल्याने वाहन उत्पादनावर परिणाम झाला आहे. वाहन उद्योगांवर अवलंबून असलेल्या लघुउद्योगांनाही त्याचा फटका बसला आहे.
वाहन विक्रीमध्ये प्रचंड घट झाल्याने नाशिकमधील महिंद्रा आणि बॉश कंपनीवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. गेल्या महिन्यात सहा दिवस बॉश कंपनीचे कामकाज बंद होते आणि चालू महिन्यात आठ दिवस उत्पादन बंद ठेवण्यात आले आहे. त्याचा परिणाम वेंडर असलेल्या लघुउद्योगांवर झाला आहे.
 

नाशिकच्या कारखान्यातील काही उत्पादन थांबवण्यात आले असून, ते नाशिकऐवजी जयपूरच्या कारखान्यात होत आहे. त्याबदल्यात नवीन उत्पादन होेणे अपेक्षित होते. तसेच कंपनी व्यवस्थापनाने बदलत्या परिस्थितीनुसार नवीन उत्पादन नाशिक प्लांटमध्ये आणणे आवश्यक होते. आठ दिवस उत्पादन बंद ठेवल्याने त्याचा परिणाम १३५० कायम कामगारांप्रमाणेच ९०० हंगामी कामगारांवर झाला आहे. कायम कामगारांना पगारी सुटी असली तरी ९०० हंगामी कामगार आणि जवळपास ६०० कंत्राटी कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. नाशिकमधील अन्य कारखान्यांतील कामगारांवरदेखील उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने औद्योगिक मंदीवर त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- प्रवीण पाटील, अध्यक्ष, बॉश कामगार संघटना

Web Title: Companies that make small parts are in trouble of ressesion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन