कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:41 IST2025-12-02T14:40:37+5:302025-12-02T14:41:11+5:30
car sales Nov' 2025: नोव्हेंबर २०२५ मधील भारतीय कार विक्री आकडेवारी: मारुती सुझुकीने सर्वाधिक मासिक विक्री केली, तर टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राने अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान पटकावले. स्कोडाची ९०% वाढ. संपूर्ण अहवाल वाचा.

कार बाजारात मोठा उलटफेर; ह्युंदाई चौथ्या क्रमांकवर फेकली गेली, पहिली मारुती, दोन, तीन नंबरला कोण?
भारतीय प्रवासी वाहन बाजारात नोव्हेंबर २०२५ मध्ये जोरदार वाढ नोंदवण्यात आली असून, बहुतांश प्रमुख उत्पादकांनी वर्षागणिक दमदार वाढ दर्शवली आहे. मारुती सुझुकीने बाजारात आपले निर्विवाद वर्चस्व कायम राखत विक्रमी मासिक विक्री नोंदवली आहे, तर टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांनी विक्रीच्या चार्टमध्ये अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले आहे. ह्युंदाई कंपनी चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.
मारुती सुझुकीने नोव्हेंबरमध्ये २,२९,०२१ युनिट्सची विक्री करून आपला दबदबा कायम ठेवला. यामध्ये १,७४,५९३ युनिट्सची घरगुती विक्री आणि ४६,०५७ युनिट्सची विक्रमी निर्यात समाविष्ट आहे. टाटा मोटर्सने ५९,१९९ युनिट्सची विक्री करत २६% वर्षागणिक वाढ नोंदवली आणि विक्रीच्या क्रमवारीत दुसरे स्थान कायम राखले. तर, महिंद्रा अँड महिंद्राने ५६,३३६ युनिट्सची विक्री करून २१.८८% वाढीसह तिसरे स्थान पटकावले आहे.
ह्युंदाईला मात्र चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे. ह्युंदाईने ९% वाढीसह एकूण ६६,८४० युनिट्सची विक्री नोंदवली आहे. यामध्ये भारतात 50,340 कार विकल्या आहेत. उर्वरित 16,500 हा आकडा निर्यात केल्याचा आहे. टोयोटा किर्लोस्करने २८% वाढीसह ३३,७५२ युनिट्सची विक्री केली. किआ इंडियाने २५,४८९ युनिट्सची विक्री करून २४% वाढ नोंदवली, जी त्यांच्यासाठी नोव्हेंबरमधील सर्वोत्तम विक्री ठरली. स्कोडा ऑटो इंडियाने वाढ नोंदवत ५,४९१ युनिट्सची विक्री केली आहे. रेनॉल्टनेही ३,६६२ युनिट्सची विक्री करत ३०.२७% वाढ नोंदवली आहे.