लोकमत न्यूज नेटवर्क
चेन्नई : वापरलेल्या कारच्या (युज्ड कार) बाजारात सध्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या (स्वयंचलित गिअर) गाड्यांची मागणी प्रचंड वाढलेली आहे. विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी एक तृतीयांशपेक्षा जास्त गाड्या ऑटोमॅटिक गिअरच्या आहेत, असे एका पाहणीत आढळून आले आहे.
२०१६ मध्ये जुन्या कारच्या बाजारात ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या गाड्यांची स्वीकारणीयता १७ टक्के होती ती २०२० मध्ये वाढून ३७ टक्के झाली आहे. नव्या कार बाजारात ती केवळ २० टक्केच आहे, हे विशेष.
ऑनलाइन कार बाजारस्थळ ‘द्रुम’ने हे सर्वेक्षण केले आहे. देशातील २० हजार डिलर, १.१ अब्ज भेटकर्ते आणि ३.२ लाख विक्री वाहने यांचा डेटा तपासून सर्वेक्षणातील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
‘द्रुम’चे संस्थापक सीईओ संदीप अगरवाल यांनी सांगितले की, वापरलेल्या वाहन बाजारात मॅन्युअल गिअर आणि ऑटोमॅटिक गिअर या गाड्यांच्या किमतींतील फरक नव्या गाड्यांइतका मोठा नाही. त्यामुळे खरेदीदार ऑटोमॅटिक गाड्यांना प्राधान्य देत आहेत. त्यातही मध्यम आणि उच्च किमतीच्या गाड्यांत ऑटोमॅटिकची विक्री अधिक आहे. कमी किमतीच्या गाड्यांत दोन्ही प्रकारांना समसमान प्राधान्य मिळताना दिसून येत आहे. महिंद्रा फर्स्ट चॉइस व्हीलचे सीईओ आशुतोष पांडे यांनी सांगितले की, टिअर-१ आणि टिअर-२ शहरांत सेडान श्रेणीतील ऑटोमॅटिक कारला चांगली मागणी आहे. एसयूव्ही श्रेणीत मात्र मॅन्युअल ट्रान्समिशनला अजूनही मागणी आहे. एसयूव्हीमध्ये अजून ऑटोमॅटिक वाहने मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहेत, त्याचा हा परिणाम आहे. आपल्या संस्थेच्या एकूण विक्रीपैकी २५ टक्के विक्री ऑटोमॅटिक कारची आहे.
मेट्रो आणि नॉन-मेट्रो शहरांत ऑटोमॅटिक गाड्यांच्या विक्रीचे प्रमाण ५० : ५० विभागले गेले आहे. जयपूर, इंदूर, कोइम्तूर, मंगळुरू, अहमदाबाद आणि वारंगळ यांसारख्या शहरांतही दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, पुणे, मुंबई आणि हैदराबाद यांसारख्या मेट्रो शहरांच्या बरोबरीने ऑटोमॅटिक गाड्या विकल्या जात आहेत.
Web Title: Automatic car market in the old car market
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.