World Anti-Tobacco Day: tobacco addiction ended when heard 46 thousand rupees cost of tobacco addiction in ten years | जागतिक तंबाखूविरोधी दिन : दहा वर्षांत ४६ हजारांचा खर्च ऐकून सुटले तंबाखूचे व्यसन
जागतिक तंबाखूविरोधी दिन : दहा वर्षांत ४६ हजारांचा खर्च ऐकून सुटले तंबाखूचे व्यसन

ठळक मुद्देवर्षभरात ३०७ जणांनी सोडले व्यसनपुरुषांमध्ये मुखकर्करोगाचे प्रमाण अधिक 

- संतोष हिरेमठ 
औरंगाबाद : तंबाखूची १३ रुपयांची एक पुडी घेऊन खाताना काहीही वाटत नव्हते. मात्र, एका पुडीपोटी वर्षाला ४ हजारांवर आणि दहा वर्षांला ४६ हजार रुपये खर्च होतात. शिवाय एवढी रक्कम खर्च करून कर्करोगाचा धोका आपण विकत घेत असल्याची जाणीव झाली अन् त्याच वेळी तंबाखू सोडण्याचा निर्धार केला. अनेक महिन्यांपासून तंबाखूपासून दूर आहे, असा अनुभव तंबाखूच्या व्यसनापासून मुक्त झालेल्या एकाने व्यक्त केला. हा अनुभव व्यक्त करताना त्याच्या चेहऱ्यावर कमालीचे समाधान झळकत होते.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात तंबाखूमुक्ती समुपदेश केंद्र चालविण्यात येते.  तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्यांना या केंद्राद्वारे मार्गदर्शन केले जाते. गेल्या वर्षभरात केंद्रातील समुपदेशक आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने ३०७ जणांनी तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन कायमस्वरुपी सोडून दिले. एखाद्याचे समुपदेशन केल्यानंतर सहा महिने त्या व्यक्तीला मार्गदर्शन केले आणि सहा महिने तो व्यसनापासून दूर राहिला तरच त्याला व्यसनमुक्त म्हणून घोषित केले जाते. सध्या चार ते पाच महिन्यांपासून व्यसन न केलेल्या ८०१ व्यक्ती आहेत. या व्यक्तीदेखील लवकरच व्यसनमुक्त होतील.

संगत, कामाचा ताणतणाव, काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात व्यसनाला बळी पडल्याचे व्यसन करणारे सांगतात. सुरुवातीला थोड्याशा प्रमाणात असलेल्या व्यसनाची तीव्रता कधी वाढते आणि त्यातून शरीरावर कोणते परिणाम होत आहेत, याची कल्पनाही येत नाही. मात्र, शेवटी पश्चाताप करण्याची वेळ येते. ही सर्व परिस्थिती तंबाखूमुक्ती समुपदेश केंद्रात समुपदेशनासाठी आलेल्यांना सांगितली जाते. त्यातून त्यांचे मनपरिवर्तन होते आणि हळूहळू व्यसनापासून दूर जातात. यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा सल्लागार डॉ. अमोल काकड, समुपदेशक योगेश सोळुंके आदींचे मार्गदर्शन मिळते. डॉ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले, समुपदेशन आणि व्यसनाचे दुष्परिणाम सांगितल्यानंतर ५० टक्के व्यक्ती व्यसनापासून दूर जातात. तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे ही काळाची गरज आहे.

पुरुषांमध्ये मुखकर्करोगाचे प्रमाण अधिक 
शासकीय कर्करोग रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात २१ सप्टेंबर २०१२ ते ३० आॅगस्ट २०१८ या कालावधीत २ लाख १२ हजार १६६ रुग्णांनी उपचार घेतले. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये मुखकर्करोगाचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या वर्षभरात मुखकर्करोगाच्या २५९ रुग्णांचे निदान झाल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. एस. पी. डांगे यांनी दिली.

तंबाखूची आठवण  आली की ‘अद्रक ’
समुपदेशनानंतर खूप बदल झाला. तंबाखूची आठवण आली की लिंबू आणि काळे मीठ लावून वाळविलेले अद्रकचे तुकडे खात असे. माझे व्यसन सुटले. आता मी इतरांनाही तंबाखूचे दुष्परिणाम सांगतो, असा अनुभवही एकाने सांगितला.


Web Title: World Anti-Tobacco Day: tobacco addiction ended when heard 46 thousand rupees cost of tobacco addiction in ten years
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.