औरंगाबाद ते पैठण महामार्गाचे काम सुरू होण्यास लागणार सहा महिने

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 07:32 PM2022-05-21T19:32:03+5:302022-05-21T19:32:23+5:30

भूसंपादनानंतर होणार निविदा प्रक्रिया : आक्षेप, हरकतींची सुरू आहे सुनावणी

Work on Aurangabad to Paithan highway will start in six months | औरंगाबाद ते पैठण महामार्गाचे काम सुरू होण्यास लागणार सहा महिने

औरंगाबाद ते पैठण महामार्गाचे काम सुरू होण्यास लागणार सहा महिने

googlenewsNext

- विकास राऊत
औरंगाबाद :
औरंगाबाद ते पैठणसह २२५३ कोटी रुपयांच्या चार महामार्गांचे भूमिपूजन २४ एप्रिल रोजी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले असले तरी प्रत्यक्षात त्या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू होण्यासाठी किमान सहा महिने लागणार आहेत. औरंगाबाद ते पैठण सुमारे १६०० कोटींचा हा महामार्ग चौपदरी करण्यात येणार आहे.

भूसंपादन प्रक्रियेबाबत आलेले आक्षेप, हरकतींच्या सुनावण्यानंतर निविदा प्रक्रिया होणार आहे. निविदा मागविल्यानंतर पुढे आणखी किती दिवस जातील, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे भूमिपूजन झाल्याबरोबर महामार्गाचे काम सुरू होईल, असे नागरिकांना वाटत होते,परंतु प्रत्यक्षात काम सुरू होण्यास सहा महिने लागणार आहेत. २४ एप्रिल २०२२ रोजी सोलापूर-धुळे हायवेअंतर्गत औरंगाबाद ते तेलवाडी व इतर तीन मिळून ३३१७ कोटींच्या चार महामार्ग प्रकल्पांच्या लोकार्पणासह औरंगाबाद ते पैठण महामार्गाचे भूमिपूजन करण्यात आले.

औरंगाबाद ते पैठण एनएच क्रमांक ७५२-ईचे रुंदीकरण १२ वर्षांपासून रखडले असून आता भूसंपादनासह चौपदरी डांबरीकरणाचे भूमिपूजन झाले आहे. भारतमाला प्रकल्पाचा भाग असलेला या महामार्गासाठी अंदाजित १६०० कोटी खर्च करण्यात येणार आहेत. १२ वर्षांपासून ‘लोकमत’ने वारंवार या रस्त्याच्या रुंदीकरणाचा पाठपुरावा शब्दबद्ध केला. पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एनएचएआय या तीन यंत्रणांच्या टोलवा-टोलवीत १२ वर्षे गेले. २०१० ते २०१३ या काळामध्ये पीडब्ल्यूडीकडून ३०० कोटींतून रस्ता करण्यासाठी दोन वेळा निविदा काढल्या. नंतर एमएसआरडीसीचा डीपीआर मग, एनएचएआयकडे कामाची जबाबदारी दिली गेली. अखेर केंद्रीय दळणवळण खात्यांच्या योजनेत औरंगाबाद ते पैठण या मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश झाला. तरीही सहा महिने प्रत्यक्ष कामासाठी लागणार आहेत.

५० हून अधिक आले आहेत आक्षेप
या महामार्गासाठी १०० हेक्टरच्या आसपास भूसंपादन करण्यात येणार असून, त्याविरोधात ५० हून अधिक आक्षेप आले आहेत. काही आक्षेप निकाली काढले असून अलायमेंट चेंज करण्यासह इतर आक्षेप निकाली काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. आक्षेपांचा निपटारा झाल्यानंतर भूसंपादन सुरू होईल. त्यानंतर निविदेसाठी एनएचएआय मुख्यालय दिल्लीतून निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात होईल.

९० टक्के भूसंपादन झाल्यानंतर काम सुरू होईल
भूमिपूजनाला आता एक महिना झाला आहे. भूसंपादन प्रक्रिया आता सुरू होण्यात आहे. मोजमाप झाल्यानंतर तीन ते चार महिने लागतील. ९० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू होत नाही. निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भूसंपादनाची रक्कम अदा करण्यात येईल. निविदा प्रक्रिया एनएचएआय मुख्यालयातून होणार आहे. त्यानंतर कंत्राटदार ठरेल,मग काम सुरू होईल. भूमिपूजन झाले की,लगेच काम सुरू होत नाही, बाकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यावर काम सुरू होते.
- अरविंद काळे, प्रकल्प संचालक, एनएचएआय.

Web Title: Work on Aurangabad to Paithan highway will start in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.