Woman arrested with infamous robber Shrimanya; 28 lakhs were looted in lieu of fleeing | कुख्यात दरोडेखोर श्रीमंत्यासह महिलेला अटक; २८ लाखांच्या ऐवज लुटीत होता फरार
कुख्यात दरोडेखोर श्रीमंत्यासह महिलेला अटक; २८ लाखांच्या ऐवज लुटीत होता फरार

ठळक मुद्दे कोळपेवाडीत सोन्याचांदीच्या दुकानदारावर भरदिवसा गोळीबार केला होता या घटनेत दरोडेखोरांनी सुमारे २८ लाखांचा ऐवज पळविला होता. 

औरंगाबाद: अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित कोळपेवाडीच्या आठवडी बाजारात सोन्याचांदीच्या दुकानदारावर भरदिवसा गोळीबार करून सुमारे २८ लाखांचा ऐवज लुटून पसार असलेला कुख्यात दरोडेखोर श्रीमंत्या उर्फ योगेश ईश्वर काळे याला महिलेसह गुन्हेशाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने पडेगावच्या डोंगरालगत गुरूवारी सकाळी अटक केली. पुढील कारवाईसाठी आरोपींना अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, गतवर्षी आॅगस्टमध्ये कोळपेवाडी(ता. कोपरगाव) येथील आठवडी बाजारात कुख्यात दरोडेखोर पपड्या उर्फ संजय उर्फ राहुल व्यंकटी, महादेव उर्फ गणपती काळे (रा. वर्धा) आणि श्रीमंत्या उर्फ योगेश काळे याच्यासह आंतरराज्यीय दरोडेखोरांनी दुकानासमोर सुतळी बॉम्ब (फटाके) फोडून आरोपींनी दुकानावर दरोडा टाकला. यावेळी त्यांनी केलेल्या गोळीबारात लक्ष्मी ज्वेलसचे मालक शाम विठ्ठल घाडगे हे ठार झाले, तर त्यांचा भाऊ गणेश घाडगे हे जखमी झाले होते. या घटनेत दरोडेखोरांनी सुमारे २८ लाखांचा ऐवज पळविला होता. 

याप्रकरणी कोपरगाव पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली होती. यावेळी श्रीमंत्या मात्र पोलिसांना चकमा देत पळून गेला होता. श्रीमंत्या गेल्या काही महिन्यांपासून पडेगाव डोंगराच्या पायथ्याशी बांधलेल्या पत्र्याच्या घरात राहात होता. त्या घराला ये-जा करण्यासाठी कोणताही रस्ता नव्हता. शिवाय तेथे पाण्याचीही व्यवस्था नव्हती. पोलिसांची नजर जाऊ नये, याकरीता तो अशा पद्धतीने त्याच्या मुलीसोबत राहात होता. एवढेच नव्हे तर तो मोबाईल वापरत नव्हता.

दरम्यान, कुख्यात श्रीमंत्या पडेगाव येथे राहात असल्याची माहिती गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांना मिळाली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे, अमोल देशमुख, उपनिरीक्षक विजय पवार, रामदास गायकवाड, वाल्मिक जगदाळे, विठ्ठल सुरे, अमर चौधरी, धर्मराज गायकवाड, संजयसिंह राजपूत, राहुल खरात, ओमप्रकाश बनकर, नाना फुंदे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे यांनी अहमदनगर गुन्हेशाखेचे उपनिरीक्षक राहुल खंडागळे यांना सोबत घेऊन गुरूवारी सकाळी श्रीमंत्याच्या घराबाहेर सापळा रचला. पोलिसांनी त्याचे दार वाजविताच मुलीने दार उघडले आणि पोलीस घरात घुसले तेव्हा झोपलेल्या श्रीमंत्याच्या मुसक्या आवळल्या. 


Web Title: Woman arrested with infamous robber Shrimanya; 28 lakhs were looted in lieu of fleeing
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.