Why not respond when challenges are great? : Abhay Bang | आव्हाने विराट असताना प्रतिसाद का नाही? : अभय बंग
आव्हाने विराट असताना प्रतिसाद का नाही? : अभय बंग

ठळक मुद्देसहा वर्षांपासून हा अहवाल थंडबस्त्यात आहे.

औरंगाबाद : आज संपूर्ण जगासमोर ग्लोबल वॉर्मिंगपासून ते जातीयता, सांप्रदायिकता यासारखी विराट आव्हाने आ वासून उभी असताना त्याला प्रतिसाद का मिळत नाही, प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अनेक सभ्यता लोप पावत आहेत, महात्मा नाही तर नायक, वैश्विकदृष्टी असलेले  नवे नेतृत्व का उभे राहत नाही, राजकीय आंदोलने का उभी राहत नाहीत, असे अनेक मूलभूत प्रश्न आज येथे प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी उपस्थित केले.

ते यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात न्या. नरेंद्र चपळगावकरलिखित ‘अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’ या ग्रंथ प्रकाशनाप्रसंगी बोलत होते. अनंत भालेराव यांच्यावरील या ग्रंथातून प्रतिसादाची आणि नवे नायक निर्माण होण्याची प्रेरणा मिळो, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.
लेखकीय मनोगत व्यक्त करताना न्या. चळगावकर हे भावुक झाले. अनंतरावांच्या अनेक आठवणींमध्ये ते रममाण झाले. प्रारंभी, अभंग प्रकाशनचे संजीव कुलकर्णी यांनी प्रास्ताविक  केले. विश्वाधार देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सविता पानट यांनी आभार मानले. निशिकांत भालेराव, श्याम देशपांडे, नीमा कुलकर्णी आदींनी पाहुण्यांचे स्वागत केले. शंभर कोरे कागद व पेन, असे या स्वागताचे स्वरूप होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पं. विद्यासागर, विजय कुवळेकर, सुरेश द्वादशीवार व दिलीप माजगावकर यांनी शुभेच्छा संदेश पाठवले होते. यावेळी निळू दामले, गोपाळ साक्रीकर, राधाकृष्ण मुळी, भास्कर ढवळे, गोविंद जोशी यांचा सत्कार करण्यात आला. चपळगावकर पती-पत्नीचा विशेष सत्कार डॉ. बंग यांच्या हस्ते करण्यात आला. अनंत भालेराव यांच्या चाहत्यांची या कार्यक्रमास मोठी गर्दी उसळली होती.

केळकर समितीचा अहवाल लागू करा 
स्वप्नांचा अभाव हे एक मोठे आव्हान हल्ली निर्माण झालेय. मराठवाडा तर कायम पाणीटंचाई, कायम दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यामुळे ग्रासला गेलेला आहे. केळकर समितीने मराठवाड्यासाठी सव्वादोन कोटी लाख रुपयांच्या तरतुदींची शिफारस केलेली आहे.या समितीचा एक सदस्य म्हणून मी काम केलेले आहे.सहा वर्षांपासून हा अहवाल थंडबस्त्यात आहे. त्यावर ना मराठवाड्यातून आवाज उठतो, ना विदर्भातून? हा अहवाल नाकारला, तर काय गमावू याचा कुणी विचार केलाय का? या अहवालातून मराठवाडा व विदर्भ ही उपराज्ये सुचवलेली आहेत; पण त्याबद्दल कुणी काहीच बोलत नाही, याबद्दलची खंत बंग यांनी व्यक्त केली. 


Web Title: Why not respond when challenges are great? : Abhay Bang
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.