Whose involvement in the Mahaportal, who contributes to corruption? | महापोर्टलमध्ये कोणाची भागीदारी, भ्रष्टाचारात कोणाकोणाला जातो वाटा ?

महापोर्टलमध्ये कोणाची भागीदारी, भ्रष्टाचारात कोणाकोणाला जातो वाटा ?

ठळक मुद्देदिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम

औरंगाबाद : महापोर्टलद्वारे नोकर भरतीमध्ये घोटाळ्याचे प्रकार होत असूनही सरकारचा याद्वारे भरती करण्याच्या अट्टहास का. यातील भ्रष्टाचाराच्या वाटण्या कोणाकोणापर्यंत जातात. यात भागीदारी कोणाची आहे हे जाहीर करा असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिले. तसेच महापोर्टल बंद करून सर्व भरती एमपीएससीद्वारे सुरु करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. ते क्रांती चौक येथील शेतकरी आक्रोश मोर्चात बोलत होते.

मेगा पोलीस भरती झाली पाहिजे, महापोर्टल ऑनलाईन परीक्षा रद्द झाली पाहिजे, महापोर्टल बंद करा आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे  सोमवारी क्रांती चौक येथून शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, राज्यात पोलिसांची हजारो पदे रिक्त असूनही सरकार कमी प्रमाणात भरती करत आहे. काही जिल्ह्यात एक, दोन तर काही जिल्ह्यात काहीच पदांची भरती नाही अशा प्रकारे सरकारने बेरोजगार युवकांची चेष्टाच केली आहे. हजारो पदे रिक्त असताना सरकार मेगा भरती का काढत नाही असा सवाल शेट्टी यांनी केला. तसेच दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाने पिडीत आहे  तर काही भागात आलेल्या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आहे. या अस्मानी संकटावर दिलासा देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रा काढून शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले असल्याची खरमरीत टीकाही यावेळी शेट्टी यांनी केली. 

दादागिरी सहन केली जाणार नाही 
नुसत्या घोषणा देऊन मुख्यमंत्री शेतकऱ्यांचा प्रश्न दुसरीकडे वळवत आहेत. तसेच शेतकरी, बेरोजगारी यावर जो प्रश्न विचारतो त्याचा आवाज दडपण्यात येतो. युवती आघाडीच्या प्रदेक्षाध्यक्ष पूजा मोरे यांना मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत ज्या प्रकारे वागणूक देण्यात आली ती लोकशाहीवर प्रेम करणाऱ्यांना संताप देणारी आहे. अशा प्रकारची दादागिरी सहन केली जाणार नाही असा इशाराही यावेळी शेट्टी यांनी दिला. 

Web Title: Whose involvement in the Mahaportal, who contributes to corruption?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.