विचार सक्षम असणे गरजेचे ; दीड वर्षात ४६ तरुण-तरुणींचा दिव्यांगांसोबत विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 12:49 PM2019-12-03T12:49:57+5:302019-12-03T13:13:32+5:30

सामाजिक जोखडाला झुगारून देत युवक युवतींचा धाडसी निर्णय

We need to strong thinking; In 1 and a half years, 46 young men and women get married to the disabled | विचार सक्षम असणे गरजेचे ; दीड वर्षात ४६ तरुण-तरुणींचा दिव्यांगांसोबत विवाह

विचार सक्षम असणे गरजेचे ; दीड वर्षात ४६ तरुण-तरुणींचा दिव्यांगांसोबत विवाह

googlenewsNext
ठळक मुद्देशरीरापेक्षा विचार सक्षम असणे गरजेचे असल्याचे जोडीदारांचे मतशासनाकडूनही राबविण्यात येत आहेत प्रोत्साहनपर विविध योजना

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : विवाह दोन व्यक्तींच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाचा क्षण. विवाह म्हटला की, मुला-मुलींसाठी स्थळ पाहणी करताना शिक्षण, नोकरी, घराणे याबरोबरच वय, उंची आणि सौंदर्याकडे आजही चौकसपणे पाहिले जाते. शोभेशी उंची नसली तरी नकार दिला जातो. सामाजिक जोखडाला झुगारून देत औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या दीड वर्षात ४६ सुदृढ युवक-युवतींनी दिव्यांगांना आपले जीवनसाथी करून आनंदाने संसार फुलवला.

परंपरेने रूढ जोडीदार निवडीचे अनेक निकष आजही पाळले जातात. उपवरांचे वय, उंची, शिक्षण याबाबत पुरुष हा स्त्रियांपेक्षा वरचढ असावा अशीच परंपरा आहे. पुढे कुळ, गोत्र, सौंदर्य, शिक्षण, घराणे, पगार, नोकरी अथवा व्यवसाय, सामाजिक स्तर, संपत्ती, शेती, वगैरे गोष्टी तपासल्या जातात. या सगळ्यानंतर जन्मपत्रिका जुळते का? हे पाहूनच विवाहाची पुढची पायरी गाठली जाते. मात्र, या सगळ्या गोष्टींना छेद देत अनेकांनी भावी जोडीदार म्हणून दिव्यांगांची निवड केली. 

कुटुंबियांचे पाठबळ
लग्न म्हटले की, दोन जीवांचे मिलन, दो हंसो का जोडा असे म्हटले जाते; परंतु भिन्न परिस्थिती असेल तर विवाह जुळणे अशक्य होते. दिव्यांगांसोबत विवाह करण्याचा निर्णय घेताना अनेकांना कुटुंबियांचे पाठबळ आणि एकमेकांच्या संमतीमुळेच विवाह जुळल्याचे काहींनी सांगितले. प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे म्हणाले, दिव्यांगांच्या विवाहाचा प्रश्न मोठा आहे. दिव्यांगत्व, त्यांच्या रोजगाराच्या प्रश्नाने विवाहाचे प्रमाण कमीच आहे. दिव्यांग वधू-वरांच्या विवाहालादेखील या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.

माझ्यापेक्षा ‘तिचा’ होकार ठरला महत्त्वपूर्ण
अपघातामुळे उजव्या पायाला दिव्यांगत्व आलेले विलास गायके यांचा वर्षभरापूर्वी गायत्री यांच्यासोबत विवाह झाला. विलास गायके म्हणाले, जेव्हा माझ्या लग्नासाठी स्थळ पाहणी सुरू झाली, तेव्हा मी माझ्या होकारापेक्षा मुलीच्या होकाराला अधिक महत्त्व देण्याचा निश्चय केला होता. माझ्या दिव्यांगत्वाची कल्पना असूनही, गायत्रीने लग्नासाठी होकार दिला. तेव्हा तिने शरीर सक्षम असण्यापेक्षा विचार सक्षम पाहिजेत, असे म्हटले होते. हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे, असे मला वाटते. आज आमचा संसार आनंदात सुरू आहे. माझे शिक्षण एम.ए.पर्यंत झालेले असून, मी सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असल्याचे विलास गायके यांनी सांगितले.

शासनाचीही मदत
दिव्यांगांसाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये शासनाने दिव्यांग-अव्यंग व्यक्तीच्या विवाहांना प्रोत्साहन अनुदान योजना सुरू केली. यात दिव्यांगाशी सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास ५० हजार रुपये मदत केली जाते.४दिव्यांगांच्या सामाजिक सुरक्षेचा एक भाग म्हणून आणि दिव्यांगांना कौटुंबिक जीवन सुलभ पार पाडता यावे यासाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत जिल्ह्यात ही योजना राबविली जात आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात ३३ जणांनी दिव्यांगांसोबत विवाह केला, तर यावर्षी आतापर्यंत १३ जणांचा विवाह झाला. ४यामध्ये ८ जणांना योजनेचा लाभ मिळण्यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समाज कल्याण विभागातर्फे देण्यात आली. या योजनेची अनेकांना आजही कल्पना नाही. त्यामुळे दिव्यांगांसोबत केलेल्या विवाहांची संख्या अधिक असण्याची शक्यताही वर्तविण्यात येते.

Web Title: We need to strong thinking; In 1 and a half years, 46 young men and women get married to the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.