कोरोनामुळे निर्माण झालेला कचरा ठरतोय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 04:18 PM2020-09-23T16:18:20+5:302020-09-23T16:19:15+5:30

सद्यस्थितीत शहरातील २६ खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोनाच्या रूग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे पीपीई कीट, मास्क, हातमोजे यासारखा कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे.कोरोनापुर्वी बायोमेडिकल वेस्टसाठी प्रतिबेड ५.७० रूपये एवढा दर होता. काेरोनाच्या कचऱ्यासाठी हा दर प्रतिकीलो १०० रूपये एवढा आकारला जात आहे.

The waste generated by the corona is becoming dangerous | कोरोनामुळे निर्माण झालेला कचरा ठरतोय धोकादायक

कोरोनामुळे निर्माण झालेला कचरा ठरतोय धोकादायक

googlenewsNext

औरंगाबाद : प्रतिकिलो १०० रूपये एवढा दर मोजूनही कोरोनाचा जैविक कचरा रोजच्या रोज उचलण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड शहरातील खाजगी रूग्णालयांकडून केली जात आहे. कोरोनामुळे निर्माण  झालेला कचरा सांभाळणे सर्वच रूग्णालयांसाठी धोकादायक ठरत असून या कचऱ्यातून जर कोणाला संसर्ग  झाला,  तर यासाठी जबाबदार कोण, असा सवाल रूग्णालयांकडून उपस्थित केला जात आहे.

सद्यस्थितीत शहरातील २६ खाजगी रूग्णालयांमध्ये कोरोनाच्या रूग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे पीपीई कीट, मास्क, हातमोजे यासारखा कचरा मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहे. वॉटर ग्रेस कंपनीकडून नोंदणी केलेल्या रूग्णालयातून कचरा उचलला जातो. कोरोनापुर्वी बायोमेडिकल वेस्टसाठी प्रतिबेड ५.७० रूपये एवढा दर होता. काेरोनाच्या कचऱ्यासाठी हा दर प्रतिकीलो १०० रूपये एवढा आकारला जात आहे. याव्यतिरिक्तही कचरा उचलण्यासाठी १५ हजार रूपये महिन्याकाठी द्यावे लागत आहेत. त्यामुळे लाखो रूपये माेजूनही कचऱ्याचा प्रश्न निकाली निघत नसल्याचे मराठवाडा हॉस्पीटल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

तर दुसरीकडे नोंदणी केलेल्या रूग्णालयांतून कोरोनाचा कचरा नियमितपणे उचलला जात असल्याचा दावा वॉटर ग्रेस कंपनीने केला आहे. महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचेही याकडे दुर्लक्ष होत असल्याची ओरड काही ठिकाणी होत आहे. 

रूग्णालयातील बायोमेडिकल वेस्ट नेण्यासाठी जी अपेक्षित व्यवस्था पाहिजे, तशी व्यवस्था सध्या उपलब्ध नाही. अधिक पैसे देऊनही कचरा दररोज उचलला जात नाही. जर कुठे मोकळ्या जागेत बायोमेडिकल वेस्ट सापडले तर त्यासाठी एखाद्या रूग्णालयाला जबाबदार धरता कामा नये, असे डॉ. हेडगेवार हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अश्विनकुमार तुपकरी यांनी सांगितले. तर कचरा वेळेवर न उचलल्या गेल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे मत मराठवाडा हॉस्पिटल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. हिमांशू गुप्ता यांनी मांडले.

Web Title: The waste generated by the corona is becoming dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.