मृत्यूचा सापळा अनुभवायचाय... औरंगाबादच्या बीड बायपासवर जा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2020 02:14 PM2020-11-13T14:14:41+5:302020-11-13T14:57:14+5:30

अविरत  वर्दळीचा बीड  बायपास सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत जड वाहनांनी व्यापला जातो.  

Want to experience the death trap ... Go to Aurangabad's Beed bypass ... | मृत्यूचा सापळा अनुभवायचाय... औरंगाबादच्या बीड बायपासवर जा...

मृत्यूचा सापळा अनुभवायचाय... औरंगाबादच्या बीड बायपासवर जा...

googlenewsNext
ठळक मुद्देधोकादायक अन् जीव गुदमरविणाऱ्या १२ किलोमीटर कार प्रवासासाठी लागले ५३  मिनिटेबायपासवर प्रवेश खुला होताच जडवाहनचालक लहान वाहनाकरिता राखीव असलेल्या लेनवर अतिक्रमण करतात आणि प्रवास करतात.

- बापू सोळुंके

औरंगाबाद : मृत्यूचा सापळा अनुभवायचा असेल, तर औरंगाबादच्या बीड बायपासवर एकदा जाऊनच या. बेफाम  जाणारी जड वाहने व त्यांच्या कचाट्यातून मार्ग काढणारे दुचाकीस्वार व पादचारी, असे चित्र येथे दररोजच पाहावयास मिळते. अनेक जण या रस्त्यावरून नेहमीच जीवघेणा प्रवास करीत आहेत. वाहनांच्या या गर्दीतून  सामान्य माणसाला केवळ १२ किलोमीटरचा रस्ता पार करण्यास तब्बल एक तास वेळ वाया घालवावा लागत आहे. भीतीयुक्त आणि त्रस्त झालेले वाहनचालकांचे चेहरे आणि वाहनचालकांची कसरत ‘लोकमत’ने बुधवारी केलेल्या रिॲलिटी चेकमध्ये दिसून आली. 

अविरत  वर्दळीचा बीड  बायपास सकाळी ११ ते सायंकाळी ५ या कालावधीत जड वाहनांनी व्यापला जातो.  बीड बायपासच्या दोन्ही बाजूंना नागरी वसाहती वाढत आहेत. बायपास परिसर, देवळाई, सातारा गाव आणि परिसरातील लाखो नागरिकांना बायपास ओलांडून शहरात ये-जा करावी लागते. बायपासवर गतवर्षी सतत प्राणांतिक अपघात व्हायचे. यामुळे बायपासवरील जड वाहनांना सकाळी ७ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत प्रवेश मनाई करण्यात आली आहे. बीड, जालन्याकडून येणारी जडवाहने ७ ते  सकाळी ११ पर्यंत  झाल्टा फाट्याजवळ, तर धुळे, नगरकडून येणारी जड वाहने पैठण लिंक रोडजवळ रोखली जातात. ११ वाजता वाहनांना बायपासवर प्रवेश दिला जातो तेव्हा जडवाहनचालकांची  जीवघेणी स्पर्धा सुरू होते. ही स्पर्धा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू असते. 

१२ किलोमीटर पार करण्यास लागली ५३ मिनिटे
बुधवारी सकाळी ११.२९  वाजता महानुभाव आश्रम चौकीपासून झाल्टा फाट्याच्या दिशेने कार प्रवासाला सुरुवात केली. तेव्हा बायपासवर जडवाहनांनी ताबा घेतल्याचे दिसून आले. या प्रवासादरम्यान महूनगर टी-पॉइंट, बजाज रुग्णालय, एमआयटी चौक, वखार महामंडळासमोर, गोदावरी टी-पॉइंट, सातारा पोलीस ठाण्याचा दुभाजक कट, रेणुकामाता मंदिर, आयप्पामंदिर दुभाजक कट, देवळाई चौक,  नाईकनगर दुभाजक कट आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. जडवाहनांच्या रांगेमधून कारला पुढे जाण्यासाठी रस्ता देत नव्हती. परिणामी, काही ठिकाणी बायपासलगतच्या कच्चा रस्त्यावरून कार न्यावी लागली. झाल्टा  फाट्यापर्यंत जाण्यासाठी १२.२२ तब्बल ५३  मिनिटे लागली, तर झाल्टा फाट्यापासून महानुभाव आश्रमपर्यंत ५९ मिनिटे लागली. 

जडवाहनचालक पाळत नाहीत नियम 
बायपासवर प्रवेश खुला होताच जडवाहनचालक लहान वाहनाकरिता राखीव असलेल्या लेनवर अतिक्रमण करतात आणि प्रवास करतात. डाव्या लेनवर जडवाहन आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. मात्र, वाहनांची संख्या अधिक असल्याने पोलिसांना वाहतूक नियमन करताना कारवाईकरिता वेळ देता येत नाही. शिवाय बायपासवर साईन बोड नसल्याचा फटकाही बसतो. यामुळे या रस्त्यावरील जडवाहनांना सकाळपासून प्रवेश दिल्यास जडवाहनांची स्पर्धा कमी होऊ शकते.

रात्रीचा प्रवास महाभयंकर
बायपासवर रात्री ९ नंतर जडवाहतूक सुरू होते. तेव्हा छोट्या वाहनाने बायपासवरून जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे असते. ट्रकचालक सर्व रस्ता व्यापतात आणि कार असो वा दुचाकीला ते रस्ता देत नाहीत. असा एकदा अनुभव आल्यापासून बायपासवरील हॉटेल आणि ढाब्यावर जेवणासाठी गेल्यावर रात्री ९ वाजेपूर्वीच जेवण आटोपून   घरी परततो. 
-महेंद्र घोडेले, व्यावसायिक

Web Title: Want to experience the death trap ... Go to Aurangabad's Beed bypass ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.