योग्य पद्धतीने पसंतीक्रम दिला नाही तर मत ठरू शकते अवैध; जाणून घ्या पदवीधरच्या मतदानाचे नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 05:31 PM2020-11-27T17:31:42+5:302020-11-27T18:00:26+5:30

केवळ मतदान केंद्रावर मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच वापर मत नोंदवण्यासाठी करायचा आहे.

Voting may be invalid if preference is not given properly; Learn the rules of graduate voting | योग्य पद्धतीने पसंतीक्रम दिला नाही तर मत ठरू शकते अवैध; जाणून घ्या पदवीधरच्या मतदानाचे नियम

योग्य पद्धतीने पसंतीक्रम दिला नाही तर मत ठरू शकते अवैध; जाणून घ्या पदवीधरच्या मतदानाचे नियम

googlenewsNext

येत्या 1 डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधीमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठीच्या एकूण पाच जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये पदवीधरच्या 3 आणि शिक्षक मतदार संघासाठीच्या 2 जागांसाठी मतदान केले जाणार आहे. या 5 मतदारसंघातील सदस्यांची मुदत 19 जुलै 2020 रोजी संपुष्टात आली आहे. कोरोनामुळे हा निवडणूक कार्यक्रम लांबणीवर पडला होता . यामध्ये पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती या शिक्षक मतदारसंघासाठी लोकप्रतिनिधींची दि. 1 डिसेबर रोजी मतदानाव्दारे निवड करण्यात येणार आहे. पदवीधर निवडणूकीसाठी मतदान करण्यासाठी मतदार  भारतीय नागरीक आणि मतदार संघाचा रहीवासी असावा ही प्राथमिक अट आहे. मुख्य म्हणजे निवडणूकीची अधिसूचना जाहीर होण्याच्या तारखेपूर्वी तीन वर्षे आधी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला नागरीक या निवडणूकीत मतदान करण्यासाठी नाव नोंदवू शकतो. प्रत्येक निवडणूकीच्या वेळी नवीन नोंदणी असते. त्यासाठी विहीत फॉर्म 18 भरावयाचा असतो.

मतदानासाठी केवळ केंद्रावरीलच पेन वापरावा : 
या निवडणूकीत मतदानयंत्र (ईव्हीएमचा) वापर केला जात नाही तर मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवून मतदान केल्या जाते. मतपत्रिका मतपेटीत घडी करुन टाकल्या नंतर त्याची एकत्रित मोजणी करण्यात येते. यामध्ये निवडणूक रिंगणात जितके उमेदवार असतील तेवढ्या क्रमांकापर्यंत पसंती क्रम नोंदवता येतो. यासाठी केवळ आणि केवळ मतदान केंद्रावर मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेनचाच वापर मत नोंदवण्यासाठी करायचा आहे. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपेनचा वापर करता येत नाही. 

पसंतीक्रम नोंदवून करायचे आहे मतदान 
मतदाराने आपल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ' पसंतीक्रम नोंदवावा ' या रकान्यात 1 हा अंक लिहून मत नोंदवायचे आहे. यामध्ये निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता. पहिला पसंतीक्रम नोंदवल्यानंतर आपले पुढील पसंतीक्रम उर्वरीत उमेदवारांसमोरील रकान्यात 2,3,4 इत्यादी प्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवता येतील. मात्र एका उमदेवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारा समोर पुन्हा नोंदवू नये. आपले पसंतीक्रम हे केवळ 1,2,3 इत्यादी अशा अंकामध्येच नोंदवावेत. ते अक्षरी म्हणजे एक, दोन, तीन इत्यादी पद्धतीने नोंदवू नये. तसेच हे अंक भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरुपात जसे 1,2,3 इत्यादी किंवा रोम अंक स्वरुपात जसे I,II,III किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1,2,3 या स्वरुपात नोंदवणे योग्य आहे.

पहिल्या पसंतीचे मत नोंदवणे अत्यावश्यक 
आपली मतपत्रिका वैध ठरावी याकरीता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंती क्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही. मात्र पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवल्या शिवाय आपले मतदान वैध ठरत नाही. तसेच एकच पसंतीक्रम दोन किंवा अधिक उमेदवारांसमोर नोंदवण्यास तो वैध ठरत नाही. याशिवाय मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये. त्याचप्रमाणे मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना टिकमार्क “    ” किंवा “X” क्रॉसमार्क अशी खून करु नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल.

मराठवाड्यात ३ लाख ७४ हजार मतदार :
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या या निवडणूकीत विभागात 3 लाख 74 हजार 45 मतदार आहेत. विभागात एकूण 813 मतदान केंद्र आहेत.
औरंगाबाद : मतदार -1 लाख 06 हजार 379, मतदान केंद्र - 206
जालना : मतदार - 29 हजार 765, मतदान केंद्र - 74
परभणी : मतदार - 32 हजार 681, मतदान केंद्र - 78
हिंगोली : मतदार - 16 हजार 764, मतदान केंद्र 39
नांदेड : मतदार - 49 हजार 285, मतदान केंद्र 123
बीड : मतदार - 64 हजार 349, मतदान केंद्र- 131
लातूर : मतदार - 41 हजार 190, मतदान केंद्र - 88
उस्मानाबाद : मतदार - 33 हजार 632, मतदान केंद्र - 74 

( संकलन : वंदना आर.थोरात, माहिती अधिकारी, औरंगाबाद  )

Web Title: Voting may be invalid if preference is not given properly; Learn the rules of graduate voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.