विद्यापीठाचा ‘जिवनसाधना’ पुरस्कार रा. श्री. मोरवंचीकर यांना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 06:53 PM2019-08-22T18:53:01+5:302019-08-22T18:56:46+5:30

वर्धापन दिनी २३ ऑगस्टला प्रदान केला जाणार

The University's 'Living Life' Award Mr. Announcement to Moravanchikar | विद्यापीठाचा ‘जिवनसाधना’ पुरस्कार रा. श्री. मोरवंचीकर यांना जाहीर

विद्यापीठाचा ‘जिवनसाधना’ पुरस्कार रा. श्री. मोरवंचीकर यांना जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यापीठाच्या इतिहास विभागात दिर्घ सेवा १३ जणांच्या प्रस्तावातून झाली निवड

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे देण्यात येणारा ‘जिवनसाधना’ पुरस्कार ज्येष्ठ इतिहासकार डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारचे वितरण विद्यापीठाच्या वर्धापन दिनी शुक्रवारी (दि.२३) होणार आहे. याशिवाय विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील चार जिल्ह्यातुन प्रत्येक एक आदर्श परीक्षा केंद्राची निवड करण्यात आल्याची माहिती कुलगुरू डॉ. प्रमोद येवेले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यापीठाच्या ६१ व्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी कुलगुरू डॉ. येवले यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. प्रविण वक्ते, कुलसचिव डॉ.  साधना पांडे, वित्त व लेखाधिकारी राजेंद्र मडके,परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा, विद्यार्थी विकास संचालक डॉ.मुस्तजिब खान उपस्थित होते.  यावेळी बोलताना डॉ. येवले म्हणाले, विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे संचालक डॉ. सच्चिदानंद जोशी, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे सल्लागार डॉ. दिलीप मालखेडे प्रमुख पाहुण म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे दोन्ही पाहुणे हेतु ठेवून बोलाविण्यात आले आहेत. तंत्रशिक्षण परिषदेसोबत विद्यापीठ विविध सेवासंदर्भात करार करणार आहे. तर कला केंद्राचे संचालक डॉ. जोशी यांच्या माध्यमातुन विद्यापीठात असलेली विविध प्रकारच्या गुणवत्तेला संधी मिळविण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. येवले यांनी स्पष्ट केले.

मागील काही वर्षांपासून विद्यापीठातर्फे भरमसाठ प्रमाणात जिवनगौरव पुरस्कारांची खिरापत वाटण्यात येत होती. ही खिरापत बंद करत केवळ विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील एका व्यक्तीला जिवनसाधना पुरस्कार देण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला होता. यानुसार संस्था, व्यक्तींकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. एकुण १३ जणांनी प्रस्ताव पाठविले. त्यातील विद्यापीठाच्या इतिहास विभागात दिर्घ सेवा करणारे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. रा.श्री. मोरवंचीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चार आदर्श परीक्षा केंद्र जाहीर  विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्कृष्ट परीक्षा घेणाऱ्या चार परीक्षांची निवड पुरस्कारसाठी करण्यात आली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातुन देवगिरी महाविद्यालय, जालनामधून बद्रीनारायण बारवाले, बीडमधून माजलगावचे सुंदरराव सोळुंके महाविद्यालय आणि उस्मानाबाद जिल्ह्यातुन आर.पी. महाविद्यालयाची निवड केल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. या महाविद्यालयांना सन्मानित केले जाणार आहे.  याशिवाय १८० विद्यार्थ्यांनी पारितोषिकांनी सन्मानित केले जाणार आहे.

१४ सप्टेंबर रोजी दीक्षांत सोहळा  विद्यापीठाचा दोन वर्षांपासून रखडलेला दीक्षांत सोहळा १४ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुण म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा ३० आॅगस्टपूर्वी राज्यपालांच्या उपस्थितीत घेण्याचा मानस होता. मात्र राज्यपालांची मुदत ३१ आॅगस्ट रोजी संपत असल्यामुळे त्यांनी सोहळ्यास उपस्थित राहण्यास नकार दर्शविला. त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी डॉ. पटवर्धन यांची वेळ मिळाल्यामुळे सोहळा आयोजित केल्याचेही कुलगुरूंनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेचे संयोजन संजय शिंदे यांनी केले.

Web Title: The University's 'Living Life' Award Mr. Announcement to Moravanchikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.