अवघ्या ३५ दिवसांत उभारले विद्यापीठ गेट; नामविस्तार होताच अशी बदलली पाटी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 12:57 PM2022-01-14T12:57:18+5:302022-01-14T12:57:31+5:30

Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University: नामविस्तार दिन विशेष : विद्यापीठाचे गेट अन् त्यावरील नाव चिरकाल प्रेरणादायी

University Gate built in just 35 days; Remembering the work of the endless ocean of knowledge Dr. Babasaheb Ambedkar | अवघ्या ३५ दिवसांत उभारले विद्यापीठ गेट; नामविस्तार होताच अशी बदलली पाटी...

अवघ्या ३५ दिवसांत उभारले विद्यापीठ गेट; नामविस्तार होताच अशी बदलली पाटी...

googlenewsNext

- विजय सरवदे

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकरमराठवाडा विद्यापीठ (Dr. Babasaheb Ambedkar Marathawada University: ) जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत या विद्यापीठाचे गेट आणि त्या गेटवरील बाबासाहेबांचे नाव हे सदैव प्रेरणादायी राहील. शहरांपासून खेड्यापाड्यात, वाड्या-वस्त्यांवरील घराघरांत ज्ञानाचा प्रकाश नेणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ( Dr. Babasaheb Ambedkar) स्मरण करून नामविस्तार दिनी गेटचे मनोभावे पूजन केले जाते.

विद्यापीठाचे तत्कालीन अभियंता कुलदीपसिंग छाबडा यांनी गेटच्या उभारणीची आठवण सांगितली. सन १९५८ मध्ये मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. त्यानंतर १४ जानेवारी १९९४ रोजी या विद्यापीठाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार झाला. सुरुवातीला विद्यापीठ ओळखले जाईल, अशी एखाद्यी प्रतिकृती किंवा ‘लोगो’ नव्हता. तब्बल १२ वर्षांचा काळ तसाच गेला. डॉ. आर. पी. नाथ यांनी ऑक्टोबर १९७१ मध्ये कुलगुरूपदाचा पदभार घेतला. डिसेंबरमध्ये विद्यापीठाचा पदवीदान समारंभ होता. या कार्यक्रमासाठी तत्कालीन राज्यपाल नवाब अली यावर जंग यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यानिमित्त विद्यापीठाला प्रवेशद्वार (गेट) असावे, अशी संकल्पना डॉ. नाथ यांनी मांडली. तत्कालीन निवासी अभियंता कुलदीपसिंग छाबडा यांनी ६ नोव्हेंबर १९७१ रोजी लोडबेअरिंग पद्धतीने गेट उभारणीचे काम सुरू केले आणि १० डिसेंबरला अर्थात अवघ्या ३५ दिवसांत या सुंदर वास्तूचे लोकार्पणही झाले. या वास्तूद्वारे विद्यापीठाचा लोगोही साकारण्यात आला. या गेटची उंची २९.३ फूट आणि रुंदी ३६ फूट आहे. गेटच्या भिंती ६ फूट रुंद आहेत. हेच गेट यापुढे अनेक पिढ्यांना नामांतर लढ्यातील अत्याचाराची, त्यागाची, शौर्याची आणि झुंजार लढ्याची सदैव आठवण करून देत राहील.

पाटी बदलण्यासाठी मनपाचे सहकार्य
कुलगुरू डॉ. विठ्ठलराव घुगे यांनी सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मराठवाडा विद्यापीठास मिळावे, यासाठी १९७७ ते १९९४ तब्बल १७ वर्षे प्रदीर्घ लढा लढावा लागला. १४ जानेवारी १९९४ रोजी नामविस्ताराचा निर्णय झाला. या निर्णयाची अंमलबजावणी होऊ न देण्याचा इशारा शहरातील एका गटाने दिला होता. त्यामुळे मनपा व पोलिसांच्या सहकार्याने मध्यरात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत गेटवरील नाव बदलण्यात आले. १४ जानेवारी १९९४ रोजी सकाळी नऊ वाजता उच्चशिक्षण सचिव लखनपाल यांनी सांगितले की, विद्यापीठ नामविस्तार ठराव मंत्रिमंडळाने मंजूर केला आहे. तुम्हाला सायंकाळपर्यंत शासन निर्णयाची प्रत मिळेल. ही प्रत मिळताच तत्काळ अंमलबजावणी करा. त्यानंतर लगेच सर्व अधिकाऱ्यांना संभाव्य परिस्थितीची कल्पना देत सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. नामविस्ताराचे समर्थक खासदार बापूसाहेब काळदाते यांच्या उपस्थितीत सायंकाळी विद्यापीठात नामविस्तार साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी विद्यापीठातील सर्व जुनी स्टेशनरी रद्द केली आणि दोन दिवसांत नवीन स्टेशनरी तयार करण्यात आली.

Web Title: University Gate built in just 35 days; Remembering the work of the endless ocean of knowledge Dr. Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.