तज्ज्ञ डॉक्टर नसतानाही कोविड रुग्णांवर उपचार; बिलेही अवाच्या सव्वा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2020 06:57 PM2020-10-14T18:57:03+5:302020-10-14T18:59:05+5:30

coronavirus in Aurangabad शहरात एकूण ४६ ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ११ केंद्रे ही शासकीय, महापालिकेची आहेत. 

Treatment of covid patients in the absence of a specialist doctor; Bills are also high | तज्ज्ञ डॉक्टर नसतानाही कोविड रुग्णांवर उपचार; बिलेही अवाच्या सव्वा

तज्ज्ञ डॉक्टर नसतानाही कोविड रुग्णांवर उपचार; बिलेही अवाच्या सव्वा

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक ठिकाणी ‘ऑन कॉल डॉक्टर खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची अक्षरशः लूट केली

- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोविड महामारीत काही खाजगी रुग्णालयांनी रुग्णांची अक्षरशः लूट केली. प्रत्येक ठिकाणी रुग्णांवर उपचार करण्यासाठी किमान एम.डी. मेडिसिन डॉक्टर असायलाच हवा, हा निकष धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल करून घेण्यात येत आहेत. विशेष बाब म्हणजे रुग्णांच्या बिलात एम.डी. मेडिसिन डॉक्टरने पाच वेळेस तपासणी केल्याचा उल्लेख करून बिले काढली जात आहेत. महाराष्ट्र शासनाने खाजगी रुग्णालयांना कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी काही निकष ठरवून दिले. त्यानुसार शहरात एकूण ४६ ठिकाणी कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील ११ केंद्रे ही शासकीय, महापालिकेची आहेत. 

‘लोकमत’ने मंगळवारी शहरातील काही खाजगी रुग्णालयांचा आढावा घेतला.  तेथे रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर दिसून आले नाहीत. काही ठिकाणी ऑन कॉल एम.डी. मेडिसिन डॉक्टर नियुक्त केले आहेत. तर काही ठिकाणी स्वतः चेस्ट फिजिशियन एम.डी. मेडिसिनची भूमिका बजावत आहेत. महापालिकेने खाजगी रुग्णालयांना कोविड सेंटरची परवानगी देताना निकषांची अंमलबजावणी होते की नाही. हे बारकाईने तपासले नाही. खाजगी रुग्णालयांनी छोट्या जागेमध्ये  जास्त बेड टाकून रुग्ण भरती करणे सुरू केले आहे. आय.सी.यू. बेड किती जागेत, किती अंतरावर असावेत, याचे कोणतेही निकष पाळलेले नाहीत. काही खाजगी रुग्णालये एम.डी. मेडिसिन डॉक्टरच्या नावावर बिलात मोठी रक्कम उकळत आहेत. रुग्णांच्या नातेवाईकांनी एम.डी. मेडिसिन डॉक्टर किती वेळेस आला ते सीसीटीव्हीमध्ये दाखवा, अशी मागणी करताच  रुग्णालयांनी माघार घेतली. असाच एक प्रकार घाटीजवळच्या एका कोविड सेंटरमध्ये घडला.

...अशी आहे विदारक अवस्था
सांगवीकर हॉस्पिटल

मुकुंदवाडी येथील सांगवीकर रुग्णालयात अत्यंत छोट्या जागेत आय.सी.यू. उभारले आहे. रुग्णालयाच्या दर्शनी भागात शुल्क आकारणीचा बोर्ड आहे. बोर्डावर जेवढी रक्कम दर्शविण्यात आली आहे. त्यापेक्षा दहा पट जास्त बिल तयार करण्यात येते. विशेष बाब म्हणजे रुग्णालयात एम.डी. मेडिसिन डॉक्टर नाही. रुग्णालय चालक डॉ. पांडुरंग सांगवीकर म्हणतात की, मी स्वतः चेस्ट फिजिशियन आहे. मग एम.डी. मेडिसिन कशासाठी? 

निमाई हॉस्पिटल
टीव्ही सेंटर भागातील निमाई हॉस्पिटल येथे तीन बालरोगतज्ज्ञ आहेत. ऑन कॉल पद्धतीवर डॉ. सत्यजित शिराळे यांची नेमणूक केली आहे. जेव्हा गरज असते तेव्हा संबंधित डॉक्टर येतात, असा दावा रुग्णालयाकडून करण्यात आला. १० ऑक्सिजन बेड, ८ आयसीयू बेड आहेत. 

धनवई हॉस्पिटल
टीव्ही सेंटर रोडवरील  धनवई आणि सिंग या रुग्णालयात मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयात २४ तास एम.डी. मेडिसिन डॉक्टर उपलब्ध आहेत. 

न्यू लाईफ बाल रुग्णालय
न्यू लाईफ बाल रुग्णालयात एम.डी. मेडिसिन म्हणून डॉ. दिनेश चांडक काम पाहत आहेत. रुग्णांवर उपचार करताना कोणतीही अडचण नाही. महापालिकेने डी.सी.एच.सी. म्हणून आम्हाला परवानगी दिल्याचे डॉ. पांडुरंग नखाते यांनी सांगितले. 

रुग्णांवर उपचार महत्त्वाचे
प्रत्येक रुग्णालयात २४ तास एमडी मेडिसिन असणे आवश्यक नाही. ऑन कॉल पद्धतीवर डॉक्टर बोलावले तरी काही हरकत नाही. महामारीत रुग्णांवर उपचार आवश्यक आहेत. ज्याठिकाणी एमडी मेडिसिन डॉक्टर उपलब्ध नाही आणि त्यांनी रुग्णांची तपासणी केलेली नसताना त्यांच्या बिलात एम.डी. मेडिसिनच्या नावावर पैसे उकळण्यात येत असतील, तर  रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी. प्रत्येक रुग्णालयातील बिलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र लेखापरीक्षक नेमण्यात आले आहेत. 
-डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

Web Title: Treatment of covid patients in the absence of a specialist doctor; Bills are also high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.