तीर्थखांबावर गुढी उभारून जोपासली परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 07:22 PM2021-04-13T19:22:56+5:302021-04-13T19:24:00+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शोभा यात्रा रद्द करून येथील ऐतिहासिक तीर्थखांबावर मंगळवारी गुढी उभारून परंपरा जोपासण्यात आली. 

tradition of erecting Gudi on Tirthakhamba | तीर्थखांबावर गुढी उभारून जोपासली परंपरा

तीर्थखांबावर गुढी उभारून जोपासली परंपरा

googlenewsNext

पैठण : शककर्ता शालिवाहन राजाच्या दैदिप्यमान कारकिर्दीचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पैठण येथे मराठी नववर्षाचा जनक व पैठण भूमिपुत्र शालिवाहन राजाच्या प्रतिमेसह शालिवाहन शक शुभारंभ शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी शोभा यात्रा रद्द करून येथील ऐतिहासिक तीर्थखांबावर मंगळवारी गुढी उभारून परंपरा जोपासण्यात आली. 

पैठणच्या सातवाहन घराण्याने जवळपास ४५० वर्षाहून अधिक काळ शासन केले. त्यांच्या साम्राज्याची राजधानी पैठण नगरी होती. सातवाहन सम्राट पुलुमावी याने उज्जैनच्या विक्रमादित्याच्या प्रचंड सैन्याचा पराभव करून विजयाचे स्मरण रहावे म्हणून मराठी कालगनणेस चैत्र शुध्द प्रतिपदेस प्रारंभ केला. पैठण शहरात असलेल्या शालीवाहनाच्या राजवाड्याच्या बाजूला भव्य अशी दगडी शिल्पाची गुढी उभारली. आज यास तीर्थखांब म्हणून ओळखले जाते. मराठी नववर्षाच्या या दिनासोबत शालिवाहनांचा वैभवशाली ईतिहास जोडलेला असल्याने पैठण नगरीस आजच्या दिनाचे महत्व काही औरच असते. मात्र, कोरोनाचे संकट समोर असल्याने आजचा उत्सव रद्द करून पैठणकरांनी परंपरा खंडीत होऊ नये म्हणून तीर्थखांबावर माजी नगराध्यक्ष शेखर पाटील यांनी मंगळवारी गुढी उभारून अभिवादन केले.

यावेळी उत्सव समितीचे सागर पाटील, रमेश खांडेकर, दिनेश पारीख, ईतिहास संशोधक जयवंत पाटील, आयुधसिंग पाटील, शंभु रूपेकर, हर्षवर्धन पाटील, महेश रूपेकर, धनराज चितलांगी, राजू रूपेकर, विष्णू ढवळे, संजय रूपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी इतिहास संशोधक बाळासाहेब पाटील यांचे  स्मारक करावे, तीर्थस्तंभास राष्ट्रीय स्मारक घोषित करावे अशी मागणी केली. पैठण येथे ८ एप्रिल १९७८च्या वर्षप्रतिपदेला शालिवाहन समारोह साजरा करण्यास प्रारंभ करण्यात आला होता. या पहिल्याच कार्यक्रमाला विद्यापीठाचे कुलगुरू बी. आर. भोसले आणि इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. पंढरीनाथ रानडे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. इतिहास संशोधक व संग्राहक कै. बाळासाहेब पाटील यांनी शालिवाहन शक वर्षारंभ दिनी समारोह साजरा करण्याची परंपरा चालू ठेवली. त्यांच्यानंतर अनेक इतिहास अभ्यासक आणि नागरिकांनी शालिवाहन काळाचे स्मरण व चिंतन व्हावे या हेतूने ही परंपरा जोपासली आहे.

शालिवाहन काळाचे नव्या दृष्टिकोनातून आकलन गरजेचे
तत्कालीन सातवाहन साम्राज्याखाली संपूर्ण दक्षिण भारतीय द्विपकल्प येत असे. सातवाहनाची वाहने हत्ती घोडे त्रिसमुद्राचे पाणी पीत असत असे म्हटल्या जात होते यातून त्यांच्या साम्राजाचे आकलन होते. यामुळेच ' त्रिसमुद्रतोय पितवावन ' अशी उपाधी शालिवाहन राजास दिली गेली होती. सातवाहनाच्या साम्राज्याचा पाऊल खुणा आजही त्याची राजधानी असलेल्या पैठण नगरीत अस्तित्वात आहेत.  या वैभवशाली इतिहासाचे नव्या दृष्टीकोनातून आकलन करण्याची आता गरज असल्याचे जाणवत आहे. यात सातवाहनकालीन लोकसाहित्य आज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून या साहित्याचे ऐतिहासिक आकलन करणे गरजेचे आहे. तसेच सातवाहनकालीन शिलालेखांचे संकलनकरून तत्कालीन समाज व संस्कृतीवर प्रकाश टाकावा लागणार आहे. सातवाहनकालिन बौध्द लेणी महाराष्ट्रभर असून या लेणीसमूहातून प्रकट होणाऱ्या कला, साहित्य व संस्कृतीचा अभ्यास अद्याप झालेले नाही. यातून सातवाहनकालीन लोकसंस्कृतीसह सामाजिक आर्थिक पैलूचे नव्याने आकलन होऊ शकते. असे इतिहासकारांचे मत आहे. शालीवाहन राजाने आपल्या नावाने शक सुरू केला. त्यामुळे शककर्ता शालिवाहन अशी उपाधी दिली जाते. शालिवाहनाच्या काळात भूगोल, खगोल, ज्योतिष पंचांग, गणित ई. विषय प्रगतीपथावर होते. त्याचप्रमाणे शिक्के, मणी, आभुषणे, भांडी, पैठणी वस्त्र, नाणी, स्थापत्यकला, साहित्य आदींची भरभराट झाली होती. शिवाय, वैदिक धर्म, बौध्दधर्म व जैनधर्म आदी गुण्यागोविंदाने नांदत असत.

Web Title: tradition of erecting Gudi on Tirthakhamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.