१२ वीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:45 PM2020-02-18T12:45:30+5:302020-02-18T12:59:48+5:30

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा पुढाकार;

Thousands of police deployed to prevent copy in the 12th examination in Aurangabad | १२ वीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

१२ वीच्या परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

googlenewsNext
ठळक मुद्देउपद्रवी केंद्रावर असेल पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे स्थायी पथकइयत्ता बारावी बोर्ड परीक्षांना १८ फेब्रुवारीपासून तर दहावी परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात होत आहे.

औरंगाबाद : इयत्ता बारावीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. परीक्षा केंद्रात घुसून परीक्षार्थींना कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा पोलिसांकडून नोंदविला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपद्रवींना धडा शिकविण्यासाठी परीक्षा केंद्रांवर पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्थायी पथकासह सुमारे एक हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. 

इयत्ता बारावी बोर्ड परीक्षांना १८ फेब्रुवारीपासून तर दहावी परीक्षेला ३ मार्चपासून सुरुवात होत आहे. या दोन्ही परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी पोलीस विभागाची मदत व्हावी, याकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि ग्रामीण पोलीस यांची संयुक्त बैठक सोमवारी दुपारी पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एम. गोंदावले, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, अप्पर अधीक्षक गणेश गावडे, उपशिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील आणि अन्य पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

या बैठकीविषयी माहिती देताना पोलीस अधीक्षक म्हणाल्या की, ग्रामीण भागातील उपद्रवी परीक्षा केंद्रांची माहिती आम्हाला शिक्षण विभागाकडून मिळाली आहे. या परीक्षा केंद्रांवर कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाईल. या कारवाईला विरोध करणाऱ्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंदविला जाईल. उपद्रवी परीक्षा केंद्रांवर एक पोलीस अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांचे स्थायी पथक असेल. ग्रामीण भागातील सर्वच परीक्षा केंद्रांवर सुमारे एक हजार पोलीस तैनात असतील. यातील काही गस्तीवर राहतील. तसेच अप्पर अधीक्षक, उपअधीक्षक हे अचानक विविध परीक्षा केंद्रांना भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षेच्या कालावधीत महावितरणची दक्षता
बारावीच्या परीक्षेला मंगळवारपासून प्रारंभ होत आहे. त्यानंतर दहावीचीही परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेच्या कालावधीत वीजपुरवठा खंडित होणार नाही, यासाठी महावितरणकडून दक्षता घेण्यात येत आहे. यासंदर्भात अधिकारी-कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्याचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक सुरेश गणेशकर यांनी सांगितले.वीज बिलाच्या थकबाकीमुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत थकीत वीज बिल वसुलीची मोहीम तीव्र केली जाते. याचा परिणाम परीक्षेच्या कालावधीत होण्याची शक्यता असते. तरीही महावितरणकडून आवश्यक ती खबरदारी घेऊन विजेअभावी विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. नागरिकांनी थकीत बिल भरून सहकार्य करावे, असेही आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

संस्थाचालक , पर्यवेक्षकांवरही असेल नजर
गतवर्षी काही परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार घडले होते. शिक्षक, संस्थाचालक यांच्या मदतीने सामूहिक कॉपीचे प्रकार होतात. असे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्र ज्या संस्थेत आहे, त्या शिक्षणसंस्थेच्या संचालक, प्राचार्य, शिक्षक आणि पर्यवेक्षक यांच्यावरही पोलिसांची नजर असेल.

Web Title: Thousands of police deployed to prevent copy in the 12th examination in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.