नोकरीवरून काढल्याने ड्रायव्हर संतापला, तलवार घेऊन थेट उद्योजकाच्या घरात घुसून केला हल्ला

By राम शिनगारे | Published: August 17, 2022 06:27 PM2022-08-17T18:27:43+5:302022-08-17T18:30:48+5:30

माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ धाव घेत आरोपीला घटनास्थळीच पकडले

The driver, angry over dismissal, directly came into the businessman's house with a sword and attacked | नोकरीवरून काढल्याने ड्रायव्हर संतापला, तलवार घेऊन थेट उद्योजकाच्या घरात घुसून केला हल्ला

नोकरीवरून काढल्याने ड्रायव्हर संतापला, तलवार घेऊन थेट उद्योजकाच्या घरात घुसून केला हल्ला

googlenewsNext

औरंगाबाद : गाडीवरील चालकाला दारूचे व्यसन असल्यामुळे काढून टाकल्याच्या रागातून त्याने उद्योजकाच्या घरी धारदार तलवार घेऊन येत कुटुंबातील सदस्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास सिडको, एन ३ भागात घडली. आरोपी तलवार घेऊन घरी गेल्याची माहिती गुन्हे शाखेच्या गस्तीवरील पथकास मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत आरोपीस पकडण्यात आल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

बबन उर्फ पाटलोबा बालाजी फड (५६, रा. आविष्कार कॉलनी, मूळ गाव किनगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे आरोपीचे नाव आहे. सिडको एन ३ मध्ये राहणारे उद्योजक संजय नागरे यांच्याकडे आरोपी बबन हा तीन महिन्यांपूर्वी चालक म्हणून कामाला होता. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे त्यांनी त्यास कामावरून कमी केले होते. याविषयी राग असल्यामुळे मंगळवारी सायंकाळी बबनने तलवार घेऊन नागरे यांचे घर गाठले. 

तेव्हा नागरे हे दोन मुलांसह हॉलमध्ये बसलेले होते. तेव्हा बबन याने तुला ठार मारतो, तुकडे तुकडे करतो असे म्हणून नागरे यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या मुलाने बबनचा हात पकडल्याने वार चुकला. त्याच वेळी ही माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांना मिळाली. त्यांनी याच भागात गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकास नागरे यांच्या घरी जाण्याचे आदेश दिले. त्यानुसार उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, सहायक फौजदार विठ्ठल जवखेडे, जमादार दत्तात्रय गडेकर, परभत म्हस्के, संदीप बीडकर, विजय भानुसे आणि संदीप राशनकर यांनी धाव घेतली. तेव्हा बबन हा हॉलमध्ये तलवारीसह उभा होता. त्यास पकडण्यात आले. त्याच्याकडून तलवार, दुचाकी (एम.एच. २०, बीव्ही ०२४३) जप्त करीत पुंडलिकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात उद्योजक संजय नागरे यांच्या तक्रारीवरून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदविला.

Web Title: The driver, angry over dismissal, directly came into the businessman's house with a sword and attacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.