तेरा करम है मौला, मावळा मी शिवरायांचा ये स्वराज्य है मेरा

By सुमेध उघडे | Published: February 19, 2020 12:56 PM2020-02-19T12:56:22+5:302020-02-19T13:01:08+5:30

छत्रपती शिवाजी महाराज जयंती : उदयोन्मुख गायकाचा कवालीतून शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मावळ्यांवर प्रकाश

Tera karam hai maula, I'm the mawala of Shivaji Maharaj, Swarajya is mine | तेरा करम है मौला, मावळा मी शिवरायांचा ये स्वराज्य है मेरा

तेरा करम है मौला, मावळा मी शिवरायांचा ये स्वराज्य है मेरा

googlenewsNext
ठळक मुद्दे पहिल्यांदाच मराठी कवालीमधून शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभावाची प्रतिमा मांडली आहे.

- सुमेध उघडे 

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. शिवरायांचे स्वराज्य हे सर्व जातीधर्मातील जनतेचे स्वराज्य होते. शिवरायांनी आपल्या राज्यात कधीही भेदाभेद केला नाही. त्यांना साथ देणारे जसे हिंदू अठरा पगड जातीचे होते, तसेच मुस्लिम मावळेसुद्धा होते. यावर कवालीच्या माध्यमातून शहरातील उदयोन्मुख गायक अजय देहाडे यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला.     

ही बारा बलुती जाती अठरा पगड सोबत चालती
मावळे खंबीर शूरवीर गडकिल्ले हे जिंकती
हिंदू-मुस्लिम भेदभावाचा गेला पुसुनी ठसा
कल्याणकारी समतेचा जपला त्यांनी वारसा
सांगा बरं शिवाजी राजा मुस्लिमविरोधी कसा.. 

 

असा सडेतोड सवाल करीत या कवालीतून शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष प्रतिमा आपल्या समोर येते. पनवेल येथील गीतकार अमोल कदम यांनी हृदयाचा ठाव घेणाऱ्या शब्दांत पहिल्यांदाच मराठी कवालीमधून शिवाजी महाराजांची सर्वधर्मसमभावाची प्रतिमा मांडली आहे. आज समाजात जातीपातीवरून द्वेष पसरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे शिवाजी महाराजांच्या मुस्लिम मावळ्यांनी गाजवलेले शौर्य पुन्हा एकदा सांगण्याची आवश्यकता निर्माण झाल्याने ही कवाली रचली गेली, असे गीतकार कदम सांगतात. कवालीचे संगीत संयोजन उज्ज्वल वळुंजे यांनी केले होते. मुस्लिम मावळ्यांचे वर्णन करताना गीतकार म्हणतात, 

महाराजांच्या सेवेला मदारी मेहतर
आरमार प्रमुख दर्यासारंग खंबीर तत्पर
सेनापती नूरखान बेग सारे जागले इमाना
सिद्धी इब्राहिम सांभाळतो महाराजांचा तोफखाना 
वकील काझी हैदर पराक्रमी सिद्धी हिलाल 
वाघ नखांचा कारागीर रुस्तमे जमाल

 

शिवरायांचे आरमार हे इंग्रज, सिद्दी आणि पोर्तुगीजांनादेखील धडकी भरविणारे होते. सामुद्रिक तटबंदी सुरक्षित ठेवण्यासाठी आरमार दलाची कामगिरी महत्त्वाची होती. अशा आरमार दलाच्या प्रमुखपदी शिवरायांनी दौलतखानची नेमणूक केली. शिवरायांकडे अत्याधुनिक तोफखाना होता. इब्राहिमखान हे शिवरायांच्या तोफखान्याचे प्रमुख होते. शिवरायांच्या स्वराज्यात सातशे निष्ठावान पठाणांची फौज होती. शिवरायांच्या स्वराज्याचा पहिला सरनौबत नूरखान बेग होता. घोडदळातील अत्यंत महत्त्वाच्या पदावर सिद्दी हिलाल आणि सिद्दी वाहवाह होते. शिवाजीराजांच्या अंगरक्षक दलात एकूण एकतीस अंगरक्षक होते. सिद्दी इब्राहिम हे शिवाजीराजांचे अंगरक्षक होते. शमाखान हे शिवरायांचे विश्वासू सरदार होते. मदारी मेहतर हे महाराजांच्या आगरा भेटीच्या वेळी आणि त्यांना तेथून बाहेर काढण्याच्या मोहिमेत अग्रभागी असणारे स्वराज्यनिष्ठ होते. अशा अनेक धाडसी, शूरवीर मुस्लिम मावळ्यांची आठवण या कवालीतून पुढे येते. 

शिवाजी महाराजांची लढाई कोणत्याही जातीधर्माविरुद्ध नव्हती, तर सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नायनाट यासाठी शिवरायांची तलवार तळपत होती. यावर समाजात अधिक प्रबोधन व्हावे, चर्चा व्हावी यावरच कवालीचा शेवट होतो तो पुढील शब्दांत... 

धर्मविरोधी शिवाजी राजा नका रंगवू आज रे  
मानवतेचे स्वराज्य आपले तोच आपला साज रे
जानो शिवाजी मानो शिवाजी दिखा दो शिवाजी
विचारो का इस जहाँ जो सीखा दो शिवाजी


शिवाजी महाराज आदर्श
शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. त्यांच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा प्रसार होणे अधिक आवश्यक आहे. कवालीचे रेकॉर्डिंग झाले असून, लवकरच ते आपल्या समोर येईल. 
- अजय देहाडे, गायक- संगीतकार

Web Title: Tera karam hai maula, I'm the mawala of Shivaji Maharaj, Swarajya is mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.