राज्यात प्रथमच दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा ड्रोन कॅमेऱ्याच्या निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2020 09:18 AM2020-11-15T09:18:36+5:302020-11-15T09:20:02+5:30

बारावीच्या पुरवणी परीक्षा २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर रोजी होणार आहेत

Tenth, twelfth supplementary exams under the surveillance of drone cameras | राज्यात प्रथमच दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा ड्रोन कॅमेऱ्याच्या निगराणीत

राज्यात प्रथमच दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा ड्रोन कॅमेऱ्याच्या निगराणीत

googlenewsNext
ठळक मुद्देदक्षता समितीत जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा चित्रीकरणासह ड्रोन कॅमेऱ्याच्या निगराणीत होणार आहेत. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले.

बारावीच्या पुरवणी परीक्षा २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर रोजी होणार असून, या कालावधीत जिल्ह्यातील १५ केंद्रांवर २ हजार ७९५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे गोपनीय साहित्य व संकलनासाठी ८ परीरक्षक केंद्र स्थापन केले आहेत. विभागीय मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांची भरारी पथके तैनात केली आहेत, तसेच तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पथक कार्यरत असणार आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान होणार आहेत. या परीक्षेसाठी  १५ परीक्षा केंद्रे असून, २ हजार ४०२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेतही विशेष अभियान राबवीत अनेक ठिकाणी कॉपीबहाद्दरांवर कारवाई केली होती. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून दबावही टाकण्यात आले होते. मात्र, या अभियानाला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओंसह प्रशासनाने सहकार्य केल्यानंतर कॉपीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचा दावा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले.

असे असणार नियम
- ५० टक्के पर्यवेक्षक हे शिक्षण विभागाच्या व्यक्तिरिक्त असावेत, असे सीईओंनी सांगितले. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली.
-  दहावी, बारावी परीक्षेचे चित्रीकरण करण्यासह ड्रोन कॅमेऱ्याचा वापर पहिल्यांदाच होणार.
-  परीक्षा केंद्रांवर बैठे पथक असणार.
-  कोरेानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार.
-  परीक्षा केंद्रावर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक नेमणे बंधनकारक.

Web Title: Tenth, twelfth supplementary exams under the surveillance of drone cameras

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.