औरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 06:47 PM2020-01-23T18:47:32+5:302020-01-23T18:48:54+5:30

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कार्गो सेवा कार्यान्वित 

'Takeoff' of 3 tonnes of cargo daily from Aurangabad internationl airport | औरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’

औरंगाबाद विमानतळावरून रोज होतेय ३ टन कार्गोचे ‘टेकऑफ’

googlenewsNext
ठळक मुद्देमुंबई, दिल्लीला ऑटोपार्ट, औषधी होतात रवाना, मालाची आयातआंतरराष्ट्रीय कार्गोचे लक्ष्य

औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर महिनाभरापूर्वी देशांतर्गत कार्गो सेवा कार्यान्वित झाली आहे. या सेवेद्वारे दररोज सुमारे ३ टन विविध माल मुंबई, दिल्लीत पाठविला जात आहे, तर जवळपास १ टन माल या दोन्ही शहरांतून औरंगाबादेत दाखल होत आहे. विमानतळावर रोज २० टन माल ने-आण करण्याची क्षमता असून, लवकरच निर्यात-आयात होणाऱ्या कार्गो सेवेत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. 

जेट एअरवेज विमानसेवा बंद झाल्यानंतर मे महिन्यापासून चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरील देशांतर्गत कार्गो सेवा ठप्प झाली होती. सप्टेंबरपासून स्पाईस जेट, ट्रू जेट, एअर इंडियाने नव्या विमानसेवा सुरू केल्या. त्यामुळे ७ महिन्यांनंतर ३० डिसेंबर २०१९ पुन्हा एकदा देशांतर्गत कार्गो सेवेला सुरुवात झाली. विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो टर्मिनलमध्ये रूपांतर करून १ जून २०१६ पासून या ठिकाणाहून देशांतर्गत एअर कार्गो सेवेला सुरुवात करण्यात आली होती. एका एजन्सीच्या माध्यमातून ही सेवा सुरू होती; परंतु आता  स्वत: विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून ही सेवा सुरू आहे. या देशांतर्गत कार्गो सेवेने दिल्ली, मुंबई, बंगळुरू याठिकाणी सध्या माल वाहतूक केली जात आहे. एअर इंडिया आणि स्पाईस जेटच्या विमानसेवेद्वारे ही वाहतूक सध्या होत आहे. औरंगाबादहून विमानाद्वारे औद्योगिक, औषधी, टपाल, आॅटो पार्टस् आदी माल पाठविला जात आहे, तर कार्गो सेवेद्वारे शहरात मोबाईल, आॅटो पार्टस् प्रामुख्याने दाखल होत आहेत. 

रस्ते वाहतुकीने अधिक वेळ
शहरातून रस्ते वाहतुकीने मुंबई, दिल्ली येथे माल पाठविण्यासाठी बराच वेळ जातो. त्यामुळे उद्योजकांकडून कार्गो सेवेची अनेक वर्षांपासून मागणी केली जात होती. अखेर ही मागणी पूर्ण झाली. कधी ३ टन, कधी ४ टन, तर कधी ५ टनांपर्यंतही माल शहरातून रवाना होत आहे. सरासरी ३ टन पाठविला जातो. येणाऱ्या कार्गोचे प्रमाण सध्या कमी आहे. कार्गो सेवेचा उद्योजक, व्यावसायिकांनी अधिकाधिक वापर केला पाहिजे, असे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. 

आंतरराष्ट्रीय कार्गोचे लक्ष्य
चिकलठाणा विमानतळावर देशांतर्गत कार्गो सुरू झालेली आहे. एअर इंडिया, स्पाईस जेटच्या माध्यमातून ही सेवा सुरू आहे. आंतरराष्ट्रीय कार्गो सेवा लवकरच सुरू केली जाईल. त्यासाठी विमान कंपन्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. 
-डी.जी. साळवे, संचालक, चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ

Web Title: 'Takeoff' of 3 tonnes of cargo daily from Aurangabad internationl airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.