Summer is open in winter in the winter | खुलताबादेत हिवाळ्यातच उन्हाळ्याच्या झळा
खुलताबादेत हिवाळ्यातच उन्हाळ्याच्या झळा

सुनील घोडके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
खुलताबाद : अद्याप उन्हाळा सुरू झाला नसला तरी आताच तालुक्यात पाणीटंचाईने उग्र स्वरूप धारण केले आहे. येथील तब्बल २० गावांसाठी २४ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, २६ विहिरींचे अधिग्रहण करून १५ गावांना पाणी पुरविण्यात येत आहे. एक प्रकारे येथील जनतेला हिवाळ्यातच उन्हाळ्याच्या झळा सोसाव्या लागत असून, कडक उन्हाळ्यात काय परिस्थिती होईल याची चिंता प्रशासनाला असून, दुसरीकडे शासकीय टँकर सुरू करा, म्हणून गावागावांतून पंचायत समिती कार्यालयात प्रस्ताव दाखल होत आहेत.
यंदाच्या वर्षी अत्यल्प पाऊस झाला असल्याने तालुक्यात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पाण्याची मोठी टंचाई गावागावांत निर्माण झाली आहे. शेतात पीक नाही, हाताला काम नाही, त्यात प्यायला पाणी नसल्याने ग्रामीण भागातील जनता हंडाभर पाण्यासाठी भटकंती करीत असून, राज्य शासनाने दुष्काळ जरी जाहीर केला असला तरी त्याची कुठलीच अंमलबजावणी सध्यातरी सुरू झाली नाही.
खुलताबाद तालुक्यात ७८ गावे व ३९ ग्रामपंचायती असून, तालुक्यात जानेवारीपासूनच सर्वच गावात पाणीटंचाई सुरू झाली आहे. आजघडीला तालुक्यातील विरमगाव, देवळाणा, गदाणा- बोरवाडी, सराई, भडजी- ममनापूर, कानडगाव, कनकशीळ, इंदापूर, महंमदपूर, चिंचोली, चिंचोली शेतवस्ती, पळसवाडी, पळसवाडी वस्ती, पिंप्री, सोनखेडा, भांडेगाव, सुलतानपूर, वडगाव- झरी, गोळेगाव गल्लेबोरगाव, वडोद, माटरगाव, रसूलपुरा या २० गावांना २४ टँकरद्वारे दररोज ४५ खेपांनी पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर आजमपूर, आखतवाडा, सालुखेडा, वडोद- माटरगाव, चिंचोली, कसाबखेडा, आखातवाडा तांडा, निरगुडी, मंबापूर, धामणगाव, ममुराबाद, पळसगाव आदींसह १५ गावे इतर वाड्या-वस्तींना विहिरी अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
तालुक्यात गंधेश्वर प्रकल्प व अब्दुलपूर तांडा, निरगुडी परिसरातील तलावात जेमतेम पाणीसाठा असून, तालुक्यातील सर्वात मोठा असलेला गिरिजा मध्यम प्रकल्प कोरडाठाक पडला असल्याने गिरिजा मध्यम प्रकल्पावर अवलंबून असलेल्या खुलताबाद शहरासह तालुक्यातील २० गावे फुलंब्री तालुक्यातील ५ गावांना यावर्षी तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
गतवर्षी उन्हाळ्यात अशीच काही परिस्थिती असताना औद्योगिक क्षेत्र परिसरातील साजापूर-करोडी येथून टँकर भरून खुलताबाद शहरासहित तालुक्यात पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावेळीही साजापूर येथूनच पाणीपुरवठा करावा लागणार, हे जवळपास निश्चित आहे.

Web Title:  Summer is open in winter in the winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.