उसाच्या तुटवड्याने यंदा गाळप हंगाम दोन महिन्यांचाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 04:12 PM2019-11-20T16:12:55+5:302019-11-20T16:15:55+5:30

मराठवाड्यातील १९ कारखान्यांची साखर उत्पादनाची तयारी

This sugar factory season is only two months after the shortage of sugarcane | उसाच्या तुटवड्याने यंदा गाळप हंगाम दोन महिन्यांचाच

उसाच्या तुटवड्याने यंदा गाळप हंगाम दोन महिन्यांचाच

googlenewsNext
ठळक मुद्दे उसाची उपलब्धता कमी असल्याने जानेवारीअखेरपर्यंतच कारखाने सुरू राहतील.  यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ५ कारखाने बंद राहणार आहेत.

- प्रशांत तेलवाडकर  

औरंगाबाद : सुरुवातीच्या काळात पावसाने मारलेली दडी व परतीच्या पावसाने दिलेला फटका यामुळे उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, यंदा मागील वर्षीच्या तुलनेत महिनाभर उशिराने गाळप हंगाम सुरू होणार आहे. औरंगाबाद विभागात २४ पैकी, १९ साखर कारखान्यांची ऊस गाळपासाठी आॅनलाईन परवानगी मागितली असून, त्यातही आजपर्यंत ९ कारखान्यांना मंजुरी देण्यात आली आहे. २५ तारखेनंतर बॉयलर पेटतील; पण उसाची उपलब्धता कमी असल्याने जानेवारीअखेरपर्यंतच कारखाने सुरू राहतील. 

औरंगाबाद विभागात प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या अंतर्गत औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांचा समावेश होतो. मागील हंगामात मार्च २०१९ पर्यंत या विभागातील २४ साखर कारखान्यांनी मिळून ८८ लाख ७३ हजार मेट्रिक टन उसाचा गाळप केला होता. त्यात ९३ लाख क्विंटल साखर तयार झाली. १०.४८ टक्के उतारा मिळाला. मागील वर्षी २४ आॅक्टोबरपासून साखर कारखान्यांचे बॉयलर पेटले होते. कृषी विभागाच्या मते, मराठवाड्यात १ लाख हेक्टरवर ऊस लावण्यात आला होता. यात पैठण, गंगापूर, अंबड, घनसावंगी, माजलगाव, गेवराई या भागांतच ऊस होता. पावसाळ्याच्या सुरुवातीला कमी पर्जन्यमानामुळे अनेक भागांतील ऊस वाळला, जळाला. ज्या ठिकाणी पाणी होते तिथे शेतकऱ्यांनी ऊस जगविला. मात्र, परतीच्या पावसाने फटका दिल्याने ऊस आडवा पडला. यामुळे किती ऊस उपलब्धता आहे याबाबत अजून पूर्ण आकडेवारी प्राप्त झाली नाही. 

या परिस्थितीमुळे यंदा २४ पैकी अवघ्या १९ साखर कारखान्यांनीच गाळपाची परवानगी साखर आयुक्तांकडे मागितली आहे. त्यातील ९ कारखान्यांनाच गाळपाची मंजुरी देण्यात आली. दरवर्षी साखर आयुक्त मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव पाठवत असतात. त्यात साखरेचा दर व हंगामाला मंजुरी दिली जात असते. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवटी सुरू आहे. पुण्यातील साखर आयुक्तांनी राज्यपालांकडे प्रस्ताव पाठविला त्यात २५ नोव्हेंबरपासून गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी मिळावी, असे म्हटले आहे. तोपर्यंत सरकार स्थापन झाले नाही, तर त्या खात्याचे सचिव याचा निर्णय घेतील. 
पाच कारखाने गाळप हंगाम करणार नाहीत, तसेच उसाचा ५० टक्के तुटवडा जाणवत आहे. यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत ५ कारखाने बंद राहणार आहेत. परिणामी, साखर उत्पादनही निम्म्याने कमी होऊन ४० ते ४६ लाख क्विंटलपर्यंत होण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. 


विभागात गत तीन वर्षांचे  गाळप, साखर उत्पादन, उताराची आकडेवारी 
 वर्ष                  कारखाने          ऊस गाळप                   साखर उत्पादन                            उतारा 
२०१४-२०१५         २२             ७४.३० लाख मे. टन           ७५.४४ लाख क्विंटल               १०.१५ टक्के
२०१५-२०१६        २२               ५१.२७ लाख मे. टन          ५०.७९ लाख क्विंटल                 ९.१९ टक्के
२०१६-२०१७        १७              २१.८२ लाख मे. टन           १९.६१ लाख क्विंटल                 ८.९९ टक्के
२०१७-२०१८        २३               ८५ लाख मे. टन               ८४.८३ लाख क्विंटल                 ९.९७ टक्के
२०१८-२०१९       २४                ८८.७३ लाख मे. टन          ९३ लाख क्विंटल                     १०.४८ टक्के 

या कारखान्यांना मिळाली गाळपाची मंजुरी 
अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, सागर सहकारी साखर कारखाना, मुक्तेश्वर शुगर मिल, अयान मल्टीट्रेड (नंदुरबार), बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड, छत्रपती संभाजीराजे साखर उद्योग, संत मुक्ताई शुगर लिमिटेड, श्रद्धा एनर्जी, संत एकनाथ साखर कारखाना, एनएसएल शुगर लिमिटेड, यांचा समावेश आहे. येत्या आठवडाभरात आणखी ९ कारखान्यांना गाळपाची परवानगी देण्यात येणार आहे, अशी माहिती प्रादेशिक सहसंचालक (साखर) विभागाकडून मिळाली.  

उसाला अतिवृष्टीचा फटका 
मागील हंगामात मराठवाड्यात सुमारे १ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली होती. गोदाकाठच्या भागात ऊस लागवड होत असते. सुरुवातीला पाणी नसल्याने ऊस जळाले व नंतर परतीचा अतिवृष्टीने उसाला फटका बसला. यामुळे यंदा उसाचे क्षेत्रात कमालीची घट झाली; पण मुबलक पाण्यामुळे पुढील हंगामात दोन ते अडीच लाख हेक्टरपर्यंत उसाचे क्षेत्र वाढेल.  -एस.के. दिवेकर, विभागीय कृषी सहसंचालक

Web Title: This sugar factory season is only two months after the shortage of sugarcane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.