शहरात अजूनही कचऱ्याचे ढीग; आता बास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 06:42 PM2020-03-19T18:42:30+5:302020-03-19T18:44:53+5:30

संकलनासाठी कोट्यवधी खर्च; पण शिस्तीचा अभाव

Still piles of garbage in the city; enough now! | शहरात अजूनही कचऱ्याचे ढीग; आता बास !

शहरात अजूनही कचऱ्याचे ढीग; आता बास !

googlenewsNext
ठळक मुद्देदररोज निघतो ३५० मेट्रिक टन कचरा  इंदूरप्रमाणे नागरिक जागरूक हवेत...

- मुजीब देवणीकर

औरंगाबाद : शहरात दररोज ३५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. या कचऱ्याच्या संकलनासाठी मनपाने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या खाजगी कंपनीची नेमणूक केली आहे. प्रत्येक घरातील कचरा जमा करण्याची जबाबदारी या कंपनीवर आहे. कंपनी डोअर टू डोअर कलेक्शनमध्ये मागील एक वर्षांमध्ये अपयशी ठरली आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक चौकात आजही कचऱ्याचे छोटे-मोठे डोंगर दिसून येतात.

शहरातील १५ लाख नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब अतिशय गंभीर असली तरी याकडे सवयीनुसार दुर्लक्ष करण्यात येत आहे. शहरातील ११५ वॉर्डांमधील कचरा जमा करण्यासाठी ३५० रिक्षा आहेत. ३८ पेक्षा अधिक मोठी वाहने आहेत. जमा होणारा १५० मेट्रिक टन कचरा चिकलठाणा येथील प्रक्रिया केंद्रावर नेऊन टाकण्यात येतो. या ठिकाणी दररोज १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. पडेगाव येथेही १५० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.  पडेगाव येथे जमा होणाऱ्या १५० मेट्रिक टन कचऱ्यावर अजिबात प्रक्रिया होत नाही. या ठिकाणी कचऱ्याचे मोठ-मोठे डोंगर तयार झाले आहेत. शहरात जमा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी म्हणून राज्य शासनाने महापालिकेला अडीच वर्षांपूर्वी तब्बल १४८ कोटी रुपये दिले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मिळविणारी औरंगाबाद महापालिका राज्यात एकमेव आहे. निधी पडून असतानाही प्रकल्प उभारणी अपूर्ण  आहे. खाजगी कंपनीने शहरात १०० टक्के डोअर टू डोअर कलेक्शन केल्यास नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारच नाहीत. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना मनपाने दंडही लावला. त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

इंदूरप्रमाणे नागरिक जागरूक हवेत...
‘माझा कचरा माझी जबाबदारी’ हे घोषवाक्य घेऊन महापालिका मागील दोन वर्षांपासून काम करीत आहे. आजही शहर शंभर टक्के स्वच्छ झालेले नाही. स्वच्छ शहर ठेवण्याची जेवढी जबाबदारी महापालिकेची आहे, तेवढीच १५ लाख नागरिकांचीही आहे. इन्दूर शहर औरगाबादपेक्षाही घाण होते. अवघ्या दीड वर्षांमध्ये इन्दूर शहराने कात टाकली. कारण शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेचे महत्त्व कळाले. नागरिक शंभर टक्के कचरा घंटागाडीतच टाकतात. व्यापारीही दुकानासमोर कचरा टाकत नाहीत. आज इन्दूर शहर स्वच्छतेत देशात प्रथम क्रमांकावर आहे. नागरिकांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले.

कचरा कशातून निर्माण होतो..?
- घरातील सुका आणि ओला कचरा
- व्यापाऱ्यांकडील अनावश्यक कचरा
- भाजीमंडईत खराब झालेला भाजीपाला
- प्रमुख रस्ते झाडल्यावर जमा होणारा कचरा
- झाडांचा पालापाचोळा, फांद्या आदी.
- रुग्णालयातील  बायो मेडीकल वेस्ट.

कचरा साचतो तरी कसा ?
- घरातील प्रत्येक अनावश्यक वस्तू फेकून देण्यावर प्रत्येक नागरिकांचा भर असतो.
- मोकळे प्लॉट, दुभाजक, सार्वजनिक चौैकाच्या बाजूला हा कचरा गुपचूप नागरिकांकडून फेकून देण्यात येतो.
- शनिवार, रविवार सुट्यांमुळे आता हा कचरा उचललाच जात नाही. किमान तीन दिवस तो तसाच पडून राहतो.
- सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकला तर दंड होईल, ही भीतीच औरंगाबादकरांना राहिलेली नाही. 

काय होते कचऱ्याने ?
- ज्या ठिकाणी कचरा साचलेला असतो तेथे प्रचंड दुर्गंधी सुटलेली असते.
- साचलेल्या कचऱ्यामुळे साथरोग वाढण्याची दाट शक्यता असते.
- ओल्या कचऱ्यात जंतू तयार होतात व ते वेगाने वातावरणात पसरतात.
- कचरा साचून राहणे ही बाब सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणारी.
- मोकाट कुत्रे दिवसभर या कचऱ्याच्या आसपास असतात.

काय करता येईल ?
- कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणाऱ्यांवर जबर दंडात्मक कारवाई.
- मनपाच्या नागरी मित्र पथकासह कर्मचाऱ्यांनीही दंड आकारला पाहिजे. 
- प्रत्येक घरातून मनपाने सकाळी कचरा जमा करून नेलाच पाहिजे. 
- कचरा टाकणाऱ्या जागेवर वृक्षारोपण, रांगोळी काढल्यास पायबंद बसेल.
- मुख्य रस्त्यांवरील, खाजगी सीसीटीव्हीची मदत यासाठी घ्यावी.
- डोअर टू डोअर कलेक्शन न करणाऱ्या एजन्सीवरही दंडात्मक कारवाई हवी.
- नागरिकांसह शाळांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती केल्यास सार्वजनिक ठिकाणी अजिबात कचरा येणार नाही.

मनपात नियंत्रण कक्ष; अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा व्यापक उपाययोजना करत  आहे. मनपा मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. हा कक्ष २४ तास सुरू राहील. तसेच विविध उपाययोजना करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून शहर अभियंता एस. डी. पानझडे यांची नियुक्ती केली आहे. मनपाच्या नियंत्रण कक्षाचा हेल्पलाईन क्रमांक ८९५६३०६००७ असा आहे. नागरिकांना २४ तास कधीही संपर्क साधता येईल. आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर या समन्वयक नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 

कचरा वेचकांची भूमिका सर्वात महत्त्वाची
तीन वर्षांपासून शहरात कचऱ्याची समस्या आहे. शहरात जेव्हा रस्त्यांवर कचऱ्याचे मोठमोठे डोंगर साचले तेव्हा ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे काम गरीब कचरा वेचकांनी केले. आजपर्यंत महापालिकेने या कचरा वेचकांना मोबदलाही दिला नाही. मनपा कार्यालयाचे उंबरठे झिजवून आम्ही त्रस्त झालो. प्रशासनाला आमच्या घामाची किंमत कळाली नाही. जेव्हापर्यंत शहरातील कचरा प्रश्नात कचरा वेचकांना सामावून घेतले जाणार नाही, तोपर्यंत हा प्रश्न असाच कायम राहणार आहे. कचरा वेचक हे या समस्येचे एक अविभाज्य घटक आहेत, हे प्रशासनाला कळायला तयार नाही. आम्ही मनपासोबत काम करायला तयार आहोत.
-आशाबाई डोके, कचरा वेचक संघटना, औरंगाबाद

सकाळी, संध्याकाळी कचरा जमा करणार...
सकाळी अनेक नागरिकांना कचरा घंटागाडीत टाकता येत नाही. त्यांच्यासाठी प्रत्येक वॉर्डात आता सायंकाळी एक रिक्षा फिरविण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी आमच्या वेळेत कचऱ्याची गाडी येत  नाही, अशी तक्रार समोर येते. शहरातील ११५ वॉर्डांसाठी हे नियोजन करण्यात आले आहे. पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये मोठा बदल दिसून येईल. व्यापाऱ्यांसाठी सायंकाळी ३५ रिक्षा नेमण्यात आल्या आहेत. नियमितपणे त्या कचरा जमा करीत आहेत.
- नंदकिशोर भोंबे, सहआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका

Web Title: Still piles of garbage in the city; enough now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.