औरंगाबादेतील उद्योगाची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 07:15 PM2020-10-16T19:15:15+5:302020-10-16T19:18:16+5:30

 सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडे नवीन वर्षापर्यंत ऑर्डर असून त्या पूर्ण करण्यासाठी तेही झपाटून कामाला लागले आहेत.

The state of the industry in Aurangabad is slowly recovering | औरंगाबादेतील उद्योगाची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

औरंगाबादेतील उद्योगाची परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनातून सावरताहेत उद्योग उत्पादन क्षमता ८० टक्क्यांपर्यंत 

- विजय सरवदे
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठप्प झालेली औरंगाबादची उद्योगनगरी हळूहळू पूर्वपदावर येत असून, या महिन्यात  जिल्ह्यातील मुख्य सहा औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांची जवळपास ८० टक्क्यांपर्यंत उत्पादन क्षमता पोहोचली आहे.

साधारणपणे जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. त्यामुळे शासनाच्या आदेशामुळे २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. परिणामी, केवळ औरंगाबादच नव्हे, तर संपूर्ण देश-विदेशातील उद्योगधंदे, बाजारपेठा ठप्प झाल्या. संपूर्ण अर्थचक्र कोलमडून पडले. लॉकडाऊनमुळे दोन महिने येथील संपूर्ण उद्योग शंभर टक्के बंदच होते. उपासमार आणि कोरोनाच्या भीतीपोटी येथील उद्योगांत कार्यरत परप्रांतीय कामगार गावी परतले. स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या परवानगीने जूनमध्ये काही उद्योग ५० टक्के मनुष्यबळावर सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, कामगारांना दुचाकीवर जाण्याची परवानगी नव्हती. चारचाकीमध्ये दोन, तर बसमध्ये २५ टक्के आसन क्षमतेने कामगार वाहतुकीस परानगी देण्यात आली. निर्यात करणाऱ्या कंपन्या, औषधी उत्पादन व अन्नप्रक्रिया करणारेच उद्योग सुरू होते. त्यानंतर औरंगाबादेतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू केला. त्यामध्येही उद्योगांना मोठा फटका बसला.तथापि, ऑगस्टपासून वाळूज, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा, शेंद्रा, ‘डीएमआयसी ऑरिक सिटी’ आणि पैठण या सहा मुख्य औद्योगिक वसाहतींतील उद्याेगांनी गती घेतली. 

सुरुवातीला ४० टक्के, ५० टक्के, ६० व ६५ टक्के उत्पादन क्षमतेने उद्योग सुरू झाले. दिवाळी व दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरपासून प्रामुख्याने ऑटोमोबाईल उद्योगांची यंत्रे ‘टॉप गीअर’ सुरू झाली. आता जवळजवळ सर्वच उद्योगांनी ८० टक्क्यांपर्यंत उत्पादन क्षमता गाठली आहे. याशिवाय,  सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांकडे नवीन वर्षापर्यंत ऑर्डर असून त्या पूर्ण करण्यासाठी तेही झपाटून कामाला लागले आहेत. असे असले तरी सध्या कुशल कामगारांची मोठी उणीव उद्योगांना भासत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रमुख सहा औद्योगिक वसाहतींमधील पहिले दोन महिने सर्वच उद्योग ठप्प होते. त्यानंतरही अवघ्या ५० टक्के मनुष्यबळावर उद्योग सुरू करण्यास परवानगी मिळाली. प्रशासनाच्या नियम व अटींमुळे त्यानंतरही दोन महिने अनेक उद्योग सुरूच झाले नाहीत. लॉकडाऊनमुळे जवळपास चार महिन्यांपर्यंत उद्योगांची घडी विसकटलेली होती. या काळात जिल्ह्यातील उद्योगांना ६ ते ७ हजार कोटींचा फटका बसल्याचा अंदाज ‘सीआयआय’चे  मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

‘सीआयआय’चे मराठवाडा अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी म्हणाले की, आता उद्योगांची परिस्थिती सुधारत आहे. यंदा चांगला पाऊस झाला असून, दसरा व दिवाळी सण तोंडावर आलेले असल्यामुळे टीव्ही, फ्रीज, कार, दुचाकींना चांगली मागणी आहे. या बाबी लक्षात घेता येथील उद्योग पूर्वपदावर येत आहेत. मध्यंतरीच्या काळात औरंगाबादेत अँटिजन्ट टेस्ट घेण्यात आल्या. त्यामुळे कामगारांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. अपेक्षा आहे, ही परिस्थिती अशीच राहील.

प्रामुख्याने लॉकडाऊनमुळे पहिले दोन महिने तर येथील सर्वच उद्योग बंद होते. त्यानंतरही दोन महिने उद्योग सुरू करण्यास फार कष्ट घ्यावे लागले; परंतु आता दिवाळी व दसरा या सणांमुळे बाजारात उठाव असून लॉकडाऊनच्या काळात उत्पादन  विक्रीमध्ये झालेली किमान एक महिन्याची तूट या काळात भरून निघेल. डिसेंबरनंतर काय परिस्थिती असेल, ते आताच सांगता येणार नाही, असे अभय हंचनाळ म्हणाले.

परराज्यातून ये-जा करणाऱ्या रेल्वे सुरू झाल्या पाहिजेत. सध्या उद्योगांनी गती घेतली आहे. ऑर्डर बऱ्यापैकी आहेत. मात्र, सध्या तरी कामगारांची मोठी टंचाई जाणवत आहे. काही टूल्स आणण्यासाठी लघु-मध्यम उद्योजकांना विमानाचा प्रवास परवडत नाही. त्यामुळे अडचणी येत आहेत. जसे की, हैदराबाद, दिल्लीसारख्या ठिकाणी जाण्यासाठी लवकरात लवकर रेल्वे सुरू व्हायला हव्यात, असे उद्योजक कुंदन रेड्डी यांनी सांगितले.
 

Web Title: The state of the industry in Aurangabad is slowly recovering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.