शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी चळवळ उभारा : आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 11:50 AM2020-02-14T11:50:08+5:302020-02-14T11:53:22+5:30

जागोजागी साचलेला कचरा, तुटलेले दुभाजक, फुटपाथचा अभाव, रस्त्याच्या कडेला उभ्या भंगार वाहनांचा उल्लेख

Start Movement to make the city beautiful: Aditya Thackeray | शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी चळवळ उभारा : आदित्य ठाकरे

शहर स्वच्छ, सुंदर करण्यासाठी चळवळ उभारा : आदित्य ठाकरे

googlenewsNext
ठळक मुद्देशहरातील विविध विकासकामांचा आढावा ठाकरे यांनी घेतला.

औरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर जिकडेतिकडे कचरा दिसून येतोय. रस्त्यांच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाच्या लोखंडी जाळ्या तुटलेल्या आहेत. रस्त्याच्या कडेला भंगार गाड्या उभ्या आहेत. फुटपाथचा मोठ्या प्रमाणात अभाव दिसून येतोय. शहर स्वच्छ दिसावे यासाठी कचऱ्याची चळवळ उभी करा, असा सल्ला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांना दिला.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई, खा. इम्तियाज जलील, आ. अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले, माजी खा. चंद्रकांत खैरे, सभागृनेता विकास जैन, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची प्रमुख उपस्थिती होती. 

शहरातील विविध विकासकामांचा आढावा ठाकरे यांनी घेतला. प्रारंभी, आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील रस्ते, घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट बस, सफारी पार्कच्या कामांचे सादरीकरण केले. शहरातील ११३ रस्त्यांचा ४६२ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करण्यात आला असून, त्यात रोड फर्निचरचाही समावेश असल्याचे सांगितले. सातारा- देवळाई व शहरासाठी वेगवेगळे प्रस्ताव तयार करण्यात आले असले तरी शासनातर्फे शक्य तेवढा निधी दिला जाईल. मात्र, रस्त्यांची कामे अर्धवट न सोडता पूर्ण करा, असा टोला ठाकरे यांनी मारला. फुटपाथवर इमॉस काँक्रिटीकरणचा वापर करा, तुटलेल्या, उखडलेल्या, मोडकळीस आलेल्या दुभाजकांची दुरुस्ती करा, फुटपाथवर झाडे लावण्यासाठी कुंड्यांचा वापर करा, असा सल्ला त्यांनी दिला. वेरूळ ते घृष्णेश्वर मंदिरापर्यंतच्या बायपास रस्त्यासाठी पर्यटन विभागाकडून २२ कोटींचा निधी मिळावा, शहरातील महेमूद दरवाजा, मकाईगेट, बारापुल्लागेटच्या बाजूने रस्ता, पूल करण्यासाठी ३२ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केल्याचेही बैठकीत अधिकाऱ्यांनी सांगितले. दौलताबाद येथील घाटात गेटच्या बाजूने रस्ता करण्यासाठी केंद्राकडे ७८ कोटींचा प्रस्ताव दिला आहे. आजपर्यंत मंजूर झाला नाही. पंतप्रधान आवास योजनेसाठी येत्या आठ दिवसांत तीसगाव येथील जागा महापालिकेला देण्यात येईल, असे बैठकीत सांगण्यात आले. संत एकनाथ रंगमंदिराच्या सुशोभीकरणासाठी निधी देण्यात येणार, सलीम अली सरोवर परिसरात स्वच्छता ठेवा, अशा सूचना त्यांनी महापालिकेला केल्या. 

शिवरायांचा पुतळा दिसणार का? 
क्रांतीचौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यासाठी निधी मिळावा, अशी मागणी मनपातर्फे करण्यात आली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवरायांच्या पुतळ्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. मात्र, उंची वाढविल्यानंतर महाराजांचा पुतळा खाली उभ्या व्यक्तीला दिसणार का? उड्डाणपुलावरून तरी पुतळा दिसेल का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यासाठी चांगले डिझाईन तयार करा, अशी सूचना त्यांनी केली.

शहरात पाणी येण्यास चार वर्षे
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणीपुरवठा योजनेचे सादरीकरण करण्यात आले. योजना पूर्ण करण्यासाठी चार वर्षे लागतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या सुरू असलेल्या निविदा प्रक्रियेबद्दलही माहिती देण्यात आली.

कोणते खासदार...
स्मार्ट सिटी बसचे अधिकारी प्रशांत भुसारी बैठकीत माहिती देत होते. त्यांनी खासदारांच्या सूचनेनुसार बस फेऱ्या वाढविल्याचे सांगितले. हजरजवाबी आदित्य ठाकरे यांनी पटकन विचारले कोणते खासदार...येथे तर दोन खासदार बसले आहेत. एक आजी, तर दुसरे माजी आहेत. भुसारी यांनी चलाखीने दोन्हींच्या सूचनेनुसार म्हणून वेळ मारून नेली. त्यावरही आदित्य ठाकरे म्हणाले आता त्यांच्या खुर्चीचा वाद मिटला आहे. 

Web Title: Start Movement to make the city beautiful: Aditya Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.