सोबलगाव फाटा ते सोबलगाव रस्त्याचे काम निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:05 AM2021-01-23T04:05:06+5:302021-01-23T04:05:06+5:30

बाजारसावंगी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या सोबलगाव ...

Sobalgaon fork to Sobalgaon road work inferior | सोबलगाव फाटा ते सोबलगाव रस्त्याचे काम निकृष्ट

सोबलगाव फाटा ते सोबलगाव रस्त्याचे काम निकृष्ट

googlenewsNext

बाजारसावंगी : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुरू असलेल्या सोबलगाव फाटा ते सोबलगाव या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने केले जात असल्यामुळे खडी उखडली आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने यात मिलिभगत असल्याचा आरोप नागरिक करू लागले आहेत.

सोबलगाव फाटा ते सोबलगाव या दीड किलोमीटर लांबीच्या व अंदाजित ७७ लाख रुपये खर्चाच्या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीत ठिसूळ दगडांच्या खडीचा जास्तीत जास्त वापर करण्यात आला आहे. पहिल्या खडी दबाईत डांबराचा अत्यंत कमी वापर केला गेल्याने खडी उखडली गेली आहे. मुरूम दबाईच्या कामातही पाण्याचा अत्यल्प वापर केला गेला असल्याचा आरोप सोबलगाव येथील नागरिकांनी केला आहे. दोन्हीही बाजुंनी रस्त्याची उंची जास्त असून पुलाची उंची कमी केल्याने पुलाच्या भागाचा रस्ता खड्डेमय झाला आहे. सोबलगाव फाट्याजवळील भागातील खडी पूर्णतः उखडली गेल्याने या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

चौकट

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून या कामाकडे वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करीत असल्याने या कामाचा दर्जा घसरला असल्याचे सोबलगाव येथील साहेबराव साळुंके, पोपटराव साळुंके, निवृत्ती साळुंके व इतर नागरिकांनी सांगितले. पुलाचा भाग खोलगट झालेला असून पुलाची उंची वाढविली जावी, अशी मागणीही येथील नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

फोटो :

सोबलगाव फाटा ते सोबलगाव या रस्त्याचे काम निकृष्ट केले जात असल्याने पाठीमागील खडी उखडली असल्याचे दिसत आहे.

Web Title: Sobalgaon fork to Sobalgaon road work inferior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.