...तर औरंगाबादचे सुमारे एक हजार लघु उद्योग बंद पडण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 04:16 PM2020-07-09T16:16:27+5:302020-07-09T16:19:40+5:30

होऊ घातलेला लॉकडाऊन हा नऊ दिवसांचा आहे. त्यात दोन आठवडी सुट्या धरल्या, तर सात दिवस उत्पादन बंद राहील. असे असले तरी त्यानंतर उद्योग सुरळीत होण्यासाठी कमीत कमी दहा दिवस लागणार आहेत.

... so about a thousand small scale industries in Aurangabad are feared to close down | ...तर औरंगाबादचे सुमारे एक हजार लघु उद्योग बंद पडण्याची भीती

...तर औरंगाबादचे सुमारे एक हजार लघु उद्योग बंद पडण्याची भीती

googlenewsNext
ठळक मुद्देसततच्या लॉकडाऊनमुळे लघु उद्योजक हतबलउद्योगातील जवळपास १५ हजार कामगार झाले बेरोजगारउद्योगातील उत्पादनही घटले

- विजय सरवदे 

औरंगाबाद : आणखी पाच-सहा महिने कोरोनाचे संकट असेच राहिले, तर औरंगाबादेतील जवळपास एक हजार लघु उद्योग बंद पडतील, अशी भीती ‘मासिआ’ या उद्योग संघटनेने व्यक्त केली आहे. 

औरंगाबादेतील लघु उद्योगांना २४ मार्चपासून मेच्या पहिल्या आठवड्यार्यंत लॉकडाऊनची झळ बसली आहे. आता आणखी नऊ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नवीन सुरू झालेले उद्योग व लघु उद्योगांसाठी हा काळ अत्यंत कठीण असणार आहे. जिल्ह्यात ५ हजार लघु उद्योग असून, त्यामध्ये जवळपास एक लाख कामगार काम करीत आहेत. मागील तीन महिन्यांच्या काळात सरासरी १० ते २० टक्के उत्पादन घेण्यात आले असून, या उद्योगातील जवळपास १५ हजार कामगार बेरोजगार झाले आहेत. लघु उद्योजकांची आर्थिक परिस्थिती बिघडली आहे. एकीकडे, उत्पन्न नाही. हातात पैसा नाही. दुसरीकडे, ‘फिक्सड ओव्हरहेड’ मानगुटीवर बसलेले आहे. त्यापासून सुटका नाही. बँकेचा कर्जाचा बोजा, व्याज, कामगारांचे पगार, उद्योग बंद असला तरी विजेचे ‘फिक्सड चार्जेस्’ याची तरतूद करावीच लागते, ही चिंता लघु उद्योजकांना सतावत आहे. 

येथील लघु उद्योगांकडे मोठ्या प्रमाणात औरंगाबादबाहेरच्या आॅर्डर आहेत. एप्रिलमध्ये देशविदेशात लॉकडाऊन होते. त्यामुळे त्या महिन्यात परिणाम जाणवला नाही. मे महिन्यात बाहेरच्या उद्योगांनी सांभाळून घेतले. आता १० तारखेपासून लागू करण्यात येणाऱ्या लॉक डाऊनमध्ये बाहेरच्या आॅर्डर अन्य शहरांकडे वळण्याची भीती, ‘मासिआ’चे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी व्यक्त केली आहे. अखेर त्या उद्योगांनाही व्यवसाय करायचा आहे. स्पर्धेत टिकायचे आहे. त्यामुळे ते उद्योग औरंगाबादेतील लघु उद्योगांवर अवलंबून राहणार नाहीत. मागील लॉकडाऊनमुळे आतापर्यंत ४०-५० टक्के आॅर्डर येत होत्या. जवळपास ५० टक्के आॅर्डर कमी झाल्या होत्या. त्यात होऊ घातलेल्या लॉकडाऊनमुळे बाहेरच्या उद्योगांचा विश्वास टिकवून ठेवण्याचे मोठे संकट येथील लघु उद्योगांवर आहे. 

यासंदर्भात उद्योजक मनीष अग्रवाल यांनी लघु उद्योगांसाठी लॉकडाऊन जाचक ठरणार असल्याचे बोलून दाखविले. लघु उद्योजकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांप्रमाणे लघुउद्योजक हा घटक उद्योग क्षेत्रातील आर्थिक दुर्बल घटक आहे. तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे अर्थचक्र बंद पडले आहे. शासनाने सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी विनातारण कर्ज देण्याची योजना अमलात आणली आहे; पण दोन-तीन राष्ट्रीयीकृत बँका सोडल्या, तर अन्य बँका कर्ज देत नाहीत. त्यामुळे हतबल झालेल्या लघु उद्योजकांसमोर कामगारांचे पगार, मटेरिअल आणण्याचा प्रश्न आहे. कुटुंबाची जबाबदारी, कर्जाची परतफेड, या  ओझ्याखाली तो खचून गेला आहे. 

होऊ घातलेला लॉकडाऊन हा नऊ दिवसांचा आहे. त्यात दोन आठवडी सुट्या धरल्या, तर सात दिवस उत्पादन बंद राहील. असे असले तरी त्यानंतर उद्योग सुरळीत होण्यासाठी कमीत कमी दहा दिवस लागणार आहेत. म्हणजे या लॉकडाऊनमुळे १५ ते २० दिवस उत्पादन बंद राहणार आहे. त्यामुळे पूर्वपदावर येत असलेल्या उद्योगांसाठी हा लॉकडाऊन अतिशय जाचक आहे, अशी भावना उद्योजकांची झाली आहे. 

लॉकडाऊनमुळे आर्थिक गणित कोलमडले
वाळूज औद्योगिक परिसरात ‘शीट मेटल पार्टस्’चा उद्योग चालविणारे राजेश मानधनी यांनी आपली व्यथा ‘लोकमत’कडे मांडली. ते म्हणाले, वाळूज औद्योगिक वसाहतीत बहुसंख्य लघु उद्योगांकडे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील कंपन्यांच्या आॅर्डर आहेत. मागच्या लॉकडाऊनमुळे आमचे संपूर्ण अर्थचक्र थांबले आहे. त्यात आता १० तारखेपासून दुसऱ्या लॉकडाऊनची भर पडणार असल्यामुळे हाती असलेल्या आॅर्डर जाण्याची भीती आहे. माझ्या हाती असलेली आॅर्डर ११ तारखेपर्यंत पूर्ण नाही झाली, तर दिलेल्या डाय औरंगाबादबाहेर देण्याचा इशारा कंपनीने दिला आहे. लॉकडाऊन तोंडावर येऊन ठेपले आहे. मी आता आॅर्डर पूर्ण करू शकत नसल्यामुळे दोन कंपन्यांच्या डाय परत करण्यात येणार आहेत. औरंगाबाद वगळता पुणे, मुंबई, नाशिकसह सर्वत्र उद्योग सुरू आहेत. त्यामुळे औरंगाबादचे लघु उद्योग क्षेत्र अडचणीत सापडले आहे. ७२ दिवसांच्या लॉकडाऊननंतर आता कुठे इथले उद्योग हळूहळू पूर्वपदावर येत होते. होऊ घातलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक चक्र थांबणार आहे. माझ्याकडे सर्व मिळून ६०-७० कामगार काम करीत आहेत. त्यांचे वेतन, कर्जाचे हप्ते, वीज बिल कसे अदा करायचे, हा प्रश्न सतावत आहे. 

Web Title: ... so about a thousand small scale industries in Aurangabad are feared to close down

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.