धक्कादायक ! दारात बसण्याच्या वादातून प्रवाशाला लाथ मारून रेल्वेतून पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 05:52 PM2019-07-10T17:52:12+5:302019-07-10T17:54:38+5:30

जखमीने कसेबसे गाठले रेल्वेस्टेशन

Shocking ! passenger thrown out of the train due to dispute over seating in door | धक्कादायक ! दारात बसण्याच्या वादातून प्रवाशाला लाथ मारून रेल्वेतून पाडले

धक्कादायक ! दारात बसण्याच्या वादातून प्रवाशाला लाथ मारून रेल्वेतून पाडले

ठळक मुद्देनंदिग्राम एक्स्प्रेसमधील घटना पत्नी घटनेपासून अनभिज्ञच

औरंगाबाद : दारात बसण्यावरून झालेल्या वादात ४० वर्षीय प्रवाशाला सहप्रवाशाने लाथ मारून नागपूर-मुंबई नंदिग्राम एक्स्प्रेसमधून खाली पाडल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास छावणी रेल्वे उड्डाणपुलाजवळ घडली. यात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाने कसाबसा छावणी रेल्वे उड्डाणपूल गाठून रिक्षाने रेल्वेस्टेशन गाठले. त्यानंतर त्याला उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले.

सुदर्शन साहेबराव गवई (४०, रा. मेहकर) असे जखमी प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून सैतानसिंह जगजितसिंह राजपूत (३९, रा. ह.मु. सातारा परिसर, मूळ-चिपलाटा, राजस्थान) या आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. सुदर्शन गवई हे नाशिक येथे मजुरी काम करतात. काही दिवसांसाठी ते गावी गेले होते. नंदिग्राम एक्स्प्रेसने ते सोमवारी पत्नीसह पुन्हा नाशिकला जात होते. ते रेल्वेच्या दारात बसलेले होते. औरंगाबादहून रेल्वे रवाना झाल्यानंतर छावणी रेल्वे पुलाजवळ दारात बसण्यावरून आरोपीसोबत वाद झाला. वादानंतर आरोपीने थेट त्यांच्या पाठीत लाथ मारली. त्यामुळे गवई हे रेल्वेतून खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. प्रवाशांनी लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक देशमाने, हवालदार प्रधान यांनी घटनास्थळी धाव घेतली. 

पत्नी घटनेपासून अनभिज्ञच
गाढ झोपेमुळे पती रेल्वेतून पडल्याची बाब पत्नीला कळली नाही. रोटेगाव स्टेशनवर रेल्वे पोहोचल्यानंतर हा प्रकार तिला कळला. दारात बसल्याने मोबाईल चोरीच्या घटना होतात. तरीही दारात बसण्याचा प्रकार सुरू असून त्यातून वादाच्या घटना होत आहेत. प्रवाशांनी रेल्वेच्या दारात बसण्याचे टाळावे, असे लोहमार्ग ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप साबळे यांनी म्हटले.

Web Title: Shocking ! passenger thrown out of the train due to dispute over seating in door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.