धक्कादायक ! सरकारी व्हेंटिलेटर गेले शहरातील ‘खाजगी’ रुग्णालयामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 12:31 PM2020-08-10T12:31:41+5:302020-08-10T12:40:08+5:30

सद्य:स्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत असल्याची परिस्थिती आहे.

Shocking! The government's ventilator went to a ‘private’ hospital in the city | धक्कादायक ! सरकारी व्हेंटिलेटर गेले शहरातील ‘खाजगी’ रुग्णालयामध्ये

धक्कादायक ! सरकारी व्हेंटिलेटर गेले शहरातील ‘खाजगी’ रुग्णालयामध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारकडून तब्बल ६० व्हेंटिलेटर प्राप्त झाले.विविध ७ खाजगी रुग्णालयांना दिले २६ नग

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : शहरातील विविध खाजगी रुग्णालयांत सरकारी म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागाचे तब्बल २६ व्हेंटिलेटर आहेत.  ज्या रुग्णांना हे व्हेंटिलेटरवर लावले जातात, त्यांना कोणताही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत नाही, त्यातून गंभीर रुग्णांना फायदा होत आहे, असा दावा आरोग्य यंत्रणेकडून केला जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दररोज कोरोनामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. यात गंभीर रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने व्हेंटिलेटरच्या प्रतीक्षेत त्यांना जीव गमवावा लागत असल्याचे वास्तव आहे. सध्या जिल्ह्यावर कोरोनाचे मोठे संकट ओढवले आहे. रुग्णांमध्ये कोरोनासोबतच इतरही गंभीर स्वरूपाच्या आजारांची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांची प्रकृती गंभीर असते. परिणामी, त्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता भासते. त्यानुसार डॉक्टरही रुग्णाला व्हेंटिलेटर लावण्याचा सल्ला देतात; परंतु सद्य:स्थितीत गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने उपलब्ध व्हेंटिलेटर अपुरे पडत असल्याची परिस्थिती आहे.

कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रणासाठी राज्याप्रमाणेच केंद्र सरकारकडूनही विविध स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये व्हेंटिलेटर पाठविले. त्यात औरंगाबादचाही समावेश झाला. काही दिवसांपूर्वीच तब्बल ६० व्हेंटिलेटर प्राप्त झाले. त्यामुळे मोठा आधार मिळाला. खाजगी रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर नसल्याचे कारण पुढे करून रुग्णांना परत पाठविण्याचा प्रकार यापूर्वी झालेला आहे. या सगळ्यात जिल्हा शल्यचिकित्सकांतर्गत असलेले म्हणजेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे २६ व्हेंटिलेटर विविध ७ खाजगी रुग्णालयांना देण्यात आले आहेत. रुग्णांच्या सुविधेसाठीच ती देण्यात आली आहेत. हे व्हेंटिलेटर लावण्यात येणाऱ्या रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत नसल्याचे सांगितले जाते, घाटीला ३२ व्हेंटिलेटर दिले आहेत. 

ग्रामीण भागांत ओटूकडेच भर
ग्रामीण भागांत तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव आहे. त्यामुळे बहुतांश सरकारी रुग्णालयांत व्हेंटिलेटर ठेवणे अवघड होत आहे. तेथील व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालय, घाटीला दिले जात आहेत. कन्नड, अजिंठा, सिल्लोड, पाचोड, वैजापूर आदी ठिकाणी ऑक्सिजन बेडवरच (ओटू) भर आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता
रुग्णाला व्हेंटिलेटर लावल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांची संपूर्ण यंत्रणा त्यावर देखरेख करते. किती प्रमाणात ऑक्सिजन द्यायचा, प्रत्येक मिनिटाला किती श्वास, शरीरातून बाहेर पडणारे कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण आदींवर देखरेख करण्यासाठी  तज्ज्ञ डॉक्टर काम करतात; परंतु तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने व्हेंटिलेटर देण्याची वेळ ओढवत आहे.

दीड कोटीचे व्हेंटिलेटर : एक व्हेंटिलेटर साधारण ६ ते १५ लाख रुपयांना येते. २६ व्हेंटिलेटरसाठी ६ लाख रुपयांच्या हिशोबाने किमान १ कोटी ५६ लाख रुपये शासनाचे खर्च झाले; परंतु हे व्हेंटिलेटर खाजगी रुग्णालयांत वापरले जात आहेत. 

कोरोना संपल्यानंतर व्हेंटिलेटर परत घेऊ
शहरातील विविध खाजगी रुग्णालयांत २६ आणि घाटी रुग्णालयास ३२, असे ५८ व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. घाटीला आणखी २० व्हेंटिलेटर देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने हे व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. कोरोनाची साथ संपल्यानंतर व्हेंटिलेटर परत घेतले जातील. खाजगी रुग्णालयांना १० दिवसांपूर्वीच व्हेंटिलेटर देण्यात आले आहेत. हे व्हेंटिलेटर लावल्यानंतर त्याचे शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.
- डॉ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Shocking! The government's ventilator went to a ‘private’ hospital in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.