मराठवाड्यात सोयाबीनचा विक्रमी भाव कोसळला; ११ हजारांवरून साडेतीन हजार भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 01:46 PM2021-10-29T13:46:56+5:302021-10-29T13:53:03+5:30

मराठवाड्यातील सोयाबीनच्या दराचा आढावा घेतला असता जालना जिल्ह्यात सोयाबीनला गेल्यावर्षी ९३०० एवढा विक्रमी भाव प्रतिक्विंटल मिळाला होता.

Record price of soybean falls in Marathwada; Prices from 11 thousand to three and a half to four thousand | मराठवाड्यात सोयाबीनचा विक्रमी भाव कोसळला; ११ हजारांवरून साडेतीन हजार भाव

मराठवाड्यात सोयाबीनचा विक्रमी भाव कोसळला; ११ हजारांवरून साडेतीन हजार भाव

googlenewsNext

औरंगाबाद : ऑगस्ट महिन्यात सोयाबीनने विक्रमी पाच आकडी दर गाठत प्रतिक्विंटल भाव मराठवाड्यात दहा ते अकरा हजारांपर्यंत गेला होता. हा भाव बघून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि त्यांनी सोयाबीनला प्रथम पसंती देत मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचा पेरा केला, परंतु वाढलेले हे विक्रमी भाव साडेतीन ते चार हजारांपर्यंत कोसळले आणि शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशा आली आहे.

मराठवाड्यातील सोयाबीनच्या दराचा आढावा घेतला असता जालना जिल्ह्यात सोयाबीनला गेल्यावर्षी ९३०० एवढा विक्रमी भाव प्रतिक्विंटल मिळाला होता. यंदा नवीन सोयाबीन बाजारात दाखल झाल्यावर हे भाव कोसळले आहेत. सद्यस्थितीत जालना बाजार समितीत सोयाबीनची आवक बऱ्यापैकी असून, ४ हजार ३०० ते ५ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने आणि दर्जात घट झाल्याने हा भाव सध्या कोसळला असल्याचे सांगण्यात आले.बीड जिल्ह्यात सोयाबीनला सर्वाधिक भाव सरासरी १० हजार होता. आता सरासरी ३५०० ते ४८०० रुपये आहे. सध्या ओले झालेले सोयाबीन, पावसाने डाग पडलेले सोयाबीन विक्रीला येत आहे. या मालाला दर्जा नाही म्हणून भाव कमी आहे, असे व्यापारी सांगतात. उस्मानाबाद जिल्ह्यात यावर्षी ऑगस्ट महिन्यात सोयाबीनला सर्वोच्च १० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. तो आता निम्म्याने घटला आहे. बुधवारी मोंढ्यात सोयाबीनला ४९०० रुपये दर मिळाला. दरम्यान, गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात कमाल ४२६१ रुपये दर मिळाला होता.
हिंगोली जिल्ह्यात सध्याचा साेयाबीन भाव ५००० ते ६००० रुपयांपर्यंत आहे. सर्वाधिक भाव ११ हजार रुपयांपर्यंत गेला होता. गतवर्षी ऑक्टाेबरमधील भाव ३ हजार ८०० रुपयांपर्यंत होता. बहुतांश शेतकऱ्यांनी साेयाबीनची मळणी करून बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जात असून, आवक वाढल्याने भाव कमी हाेत आहेत. शेतकऱ्यांना दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी घरी आलेला भाव विकणे गरजेचे असल्याने कमी भावात साेयाबीन विक्री करावी लागत आहे.

परभणी जिल्ह्यात सोयाबीनला यावर्षी सर्वाधिक ७ हजार रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे. सध्या ४२०० ते ४७०० पर्यंत भाव मिळत आहे. जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाल्याने शेत जमिनीत पाणी साचून राहिले. सोयाबीन वाळले नाही. त्यामुळे मॉइश्चर अधिक असल्याने दर घटले आहेत. मागील वर्षी ५५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता.

केंद्राच्या आयातीमुळे सोयाबीनचे भाव पडले : सचिन सावंत
नांदेड : सुरुवातीच्या काळात सोयाबीनला अकरा हजारांचा भाव मिळत होता; परंतु केंद्र सरकारने ब्राझीलकडून तब्बल दहा लाख टनांनी सोयाबीनची आयात वाढविली. पर्यायाने सोयाबीनचे भाव पडले असून, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देण्याचे काम भाजप सरकारने केले आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.

Web Title: Record price of soybean falls in Marathwada; Prices from 11 thousand to three and a half to four thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.